अखेर सौदी अरेबियातल्या महिलांना मिळालं प्रवासाचं स्वातंत्र्य

सौदी अरेबियामध्ये आता महिलांना कोणत्याही कर्त्या पुरुषाच्या परवानगीशिवाय परदेश प्रवास करता येणार आहे. या विषयीचा शाही आदेश शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

या नव्या नियमानुसार आता 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना आता कोणत्याही पुरुष पालकाच्या परवानगीशिवाय पासपोर्टसाठी अर्ज करता येईल.

म्हणजे आता सौदी अरेबियामधल्या सर्व सज्ञान महिलांना परदेश प्रवासासाठी पासपोर्टसाठी अर्ज करता येईल आणि याबाबतीत स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव नसेल.

शाही आदेशानुसार आता महिलांना त्यांच्या मुलांचा जन्म, त्यांचं लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करण्याचा अधिकार असेल.

सोबतच महिलांना नोकरीच्या संधी जास्त देण्याचंही सांगण्यात आलंय. नव्या नियमांनुसार देशातल्या सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय काम करण्याचा अधिकार असेल. आतापर्यंत सौदी अरेबियामध्ये महिलांना परदेश प्रवासाला जाण्यासाठी किंवा पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी कर्त्या वा पालक पुरुषाची (नवरा, वडील किंवा इतर पुरुष नातेवाईक) परवानगी घ्यावी लागत असे.

सौदी अरेबियाचे शासक राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी याआधीही विविध प्रकारच्या अनेक सुधारणांची घोषणा केली होती. यामध्ये महिलांवर असणारी गाडी चालवण्यावरची बंदी हटवण्याचाही समावेश आहे.

देशाची अर्थव्यवस्था 2030पर्यंत सुधारण्याची घोषणा त्यांनी 2016मध्ये केली होती. कामकाजातला महिलांचा सहभाग 22 टक्क्यांवरून वाढून 30 टक्के करण्याचं उद्दिष्टं याद्वारे मांडण्यात आलं होतं.

पण सौदी अरेबियामध्ये अशा अनेक हाय-प्रोफाईल घटना उघडकीस आल्या आहेत ज्यामध्ये महिलांनी फसवणूक झाल्याचा आरोप करत कॅनडासारख्या इतर देशांकडे आसरा मागितला आहे.

याचवर्षी जानेवारी महिन्यात कॅनडाने 18 वर्षांच्या रहाफ मोहम्मद अल कुनूनला आसरा दिला. तिने सौदी अरेबियातून पळ काढत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा प्रयत्न केला होता. पण थायलंडची राजधानी बँकाकमध्ये एअरपोर्टजवळच्या एका हॉटेलमध्ये ती अडकली आणि तिने मदत मागितली.

अनेक मानवी हक्क संघटनांचं असं म्हणणं आहे की सौदी अरेबियामध्ये महिलांना खालच्या दर्जाची वागणूक देण्यात येते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)