You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समिया सुलूहू हसन : टांझानियात पहिल्यांदाच महिलेला मिळणार राष्ट्राध्यक्षपद
टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मेगुफूली यांचं बुधवारी निधन झालं. त्यामुळे सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या समिया सुलूहू हसन या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. सुलूहू हसन यांच्या रुपाने प्रथमच एखादी महिला टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडली जाणार आहे.
समिया हसन या 2015 मध्ये पहिल्यांदाच उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समोर आल्या होत्या. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून त्याच या पदावर आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही जॉन मेगुफूली-समिया हसन जोडीने पुन्हा विजय मिळवला होता.
पण आता जॉन मेगुफूली यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन यांची वर्णी लागणार आहे.
टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिया सुलूहू हसन या सध्याच्या काळातील आफ्रिकेतील एकमेव महिला राष्ट्रप्रमुख ठरतील. (इथियोपियाच्या राष्ट्राध्यक्षही महिला आहेत, पण हे पद औपचारिक स्वरुपाचं मानलं जातं.)
समिया सुलूहू हसन कोण आहेत?
आगामी राष्ट्राध्यक्ष समिया हसन या 61 वर्षांच्या आहेत. टांझानियात त्यांना ममा समिया नावाने ओळखलं जातं. टांझानियाच्या संस्कृतीत समिया यांना मिळणारा सन्मान यामधून दिसून येतो.
2015 च्या निवडणुकीत मेगुफूली यांनी समिया हसन यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.
मेगुफूली-हसन यांनी त्यावेळी चामा चा मॅपिंडूझी (CCM) या पक्षाला पराभूत करून सत्ता हस्तगत केली. 1961 मध्ये टांझानिया स्वतंत्र झाल्यापासून बहुतांश काळ हाच पक्ष सातत्याने सत्तेत होता, त्यामुळे याकडे परिवर्तन म्हणून पाहिलं गेलं.
समिया हसन या 2000 साली पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर टांझानियातील प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता.
पण व्यक्तिमत्वाचा विचार केल्यास राष्ट्राध्यक्ष मेगुफूली यांच्या तुलनेत त्या पूर्णपणे वेगळ्या असल्याचं सांगितलं जातं.
मेगुफूली आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जायचे. ते कोणतीही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे बोलत होते. मात्र समिया हसन या अत्यंत विचारशील आणि शांत स्वभावाच्या असल्याचं म्हटलं जातं.
सक्षम नेत्या
समिया हसन यांच्यासोबत काम करत असलेले खासदार जॅन्यूअरी मकांबा यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.
मकांबा यांच्या मते, समिया सुलूहू हसन या टांझानियातील सर्वांत अंडररेटेड राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही. पण त्या सक्षम आहेत..
मकांबा हे उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयातच समिया यांचे सहकारी आहेत.
ते पुढे सांगतात, "मला त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. त्या अतिशय मेहनती आहेत. निर्णय प्रक्रिया आणि दृष्टीकोन यांचा विचार केल्यास त्या अत्यंत सक्षम नेत्या आहेत."
पण आगामी काळात समिया यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.
राष्ट्राध्यक्ष मेगुफूली यांच्या निष्ठावान म्हणून त्या ओळखल्या जायच्या याबाबत शंका नाही. पण आपलं मत स्पष्टपणे मांडायला त्या कधीच घाबरत नाहीत.
2017 मध्ये टांझानियाचे विरोधी पक्षनेते टुंडू लिसू यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती, हे विशेष.
या भेटीची जोरदार चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. या घटनेनंतर लिसू आता बेल्जियमला स्थायिक झाले आहेत. एकामागून एक जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली होती.
वैयक्तिक आयुष्य
समिया यांची 2015 मध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर निवड होण्याआधी त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे.
पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी माहिती लोकांना नाही.
समिया यांचा जन्म जानेवारी 1960 मध्ये झिंजीबार बेटांवर झाला होता. हा भाग टांझानियाच्या मूळ भूमीपासून थोडा वेगळा असून स्वायत्त असल्याचं मानलं जातं.
पुढील शिक्षणासाठी समिया टांझानियात दाखल झाल्या. तर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण युकेमध्ये घेतलेलं आहे.
1987 मध्ये त्यांचा विवाह कृषिविषयक तज्ज्ञ प्रा. हाफीद आमेर यांच्याशी झाला होता. आमेर यांच्याबाबतही फारशी माहिती उपलब्ध नाही.
समिया उपराष्ट्राध्यक्ष झाल्यापासून दोघेही सार्वजनिक जीवनात एकत्रितपणे फिरताना कधीच आढळून आले नाहीत.
समिया-आमेर दांपत्याला चाल मुलं असून त्यापैकी म्वानू हाफीद आमेर हा झिंजीबारच्या विधानसभेचा सदस्य आहे.
आफ्रिकेतील आजपर्यंतच्या महिला राष्ट्राध्यक्ष
1993-1994 : सिल्व्ही किनिगी - बुरूंडी देशाचे राष्ट्राध्यक्ष मेलकोईल दादाई यांच्या हत्येनंतर काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची कमान सांभाळली होती.
2006-2018 : एलेन जॉनसन सिरलिफ - लायबेरियाच्या लोकनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष
2009 : रोझ फ्रान्सिन रोगोम्बे - राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो यांच्या निधनानंतर गॅबन देशाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष
2012 : मोनिक ओहसन बेलापियू - मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष सर अनिरूद जगन्नाथ यांच्या राजीनाम्यानंतर सूत्र स्वीकारली.
2012-2014 : जॉयस बांडा - बिंगू वा मुथारिका यांच्या निधनानंतर मालवी देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
2014-2016 : अमिना गरीब-फकीम - मॉरिशसच्या संसदेकडून निवडण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष
2018-सध्या : सेहल वर्क ज्वेड - इथिओपियाच्या राष्ट्राध्यक्ष
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)