रिव्हेंज पॉर्नः न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकून कसा बदला घेतात?

    • Author, हेना प्राइस आणि थिए डे गालिएर
    • Role, बीबीसी थ्री

'लोकांनी मला पसंत करावं, त्यांनी माझं कौतुक करावं, अशी माझी इच्छा होती. लोकांच्यात मी लोकप्रिय झाले पाहिजे, यासाठी मी ते सगळं केलं. पण मला जे काही वाटलं, सगळं त्याच्या उलटं घडलं.'

ब्रिटमधील डेटिंग रिअॅलिटी शो लव आयलँडची माजी स्पर्धक झारा मॅकडरमॉट सांगत होती.

ती 14 वर्षांची असतानाचे ते दिवस होते. हा काळ तिच्या आयुष्यात एक दुःस्वप्नाप्रमाणे राहिल्याचं तिला अजूनही वाटतं.

त्यावेळी झाराच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलाच्या दबावामुळे तिने आपली काही खासगी छायाचित्रे त्याला पाठवून दिली होती.

शाळेत घालवलेले ते दिवस साराला बिलकुल आवडत नाही. त्यावेळी तिच्यावर दबाव टाकला जात होता. तिला एकटेपणा वाटायचा.

एखादा मुलगा मला पसंत करू लागला तर इतरांच्या नजरेत माझी प्रतिमा उंचावली जाईल, या गैरसमजातून तिने त्या गोष्टी केल्या. पण त्या मुलाने संपूर्ण शाळेत तिचे फोटो शेअर केले. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होत गेली.

झूम कॉलदरम्यान या गोष्टी सांगताना झारा भावनिक झाली होती. आपण त्यावेळी असं का करत होतो, हे आपल्याला कळत नव्हतं, असं ती म्हणाली.

झारा सांगते, "हे सगळं आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना घडलं होतं. तुम्ही वयात येत असता, स्वतःचा शोध घेत असता, असा तो काळ होता."

आत्महत्येचे विचार

झारा पुढे सांगते, "तो माझ्या आयुष्यातील अत्यंत अंधःकारमय काळ होता. मी त्यावेळी सगळ्यांपासून लपून राहण्याचा प्रयत्न करत होते. ते फोटो पसरल्यानंतर काही दिवस मी अत्यंत त्रासले होते. मी नीट जेवत नव्हते. झोपही यायची नाही. माझी वागणूक विचित्रच बनली. मी अत्यंत खचले होते. यातून पुन्हा उभारी घेऊ शकेन की नाही, असं मला वाटायचं."

"नंतर नंतर माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तो माझ्यासाठी किती वाईट काळ होता, ते तुम्ही समजू शकता. हे फोटो बाहेर आल्यानंतर मला आणखी जास्त धमकावलं जाईल, हे मला माहीत होतं. मी हे सगळं सहन करू शकले नाही. त्या गोष्टीचा प्रभाव आजही माझ्यावर आहे," असं तिने सांगितलं.

बीबीसी थ्रीच्या 'झारा मॅकडरमॉट: रिव्हेंज पॉर्न' या डॉक्युमेंटरीमध्ये झारावर रिव्हेंज पॉर्नच्या झालेला परिणाम दाखवण्यात आलेला आहे.

रिव्हेंज पॉर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय तिचे खासगी फोटो सार्वजनिकरित्या शेअर करणं होय.

हा प्रकार नेहमी वाईट हेतूने अथवा बदला घेण्याच्या मानसिकतेतून केला जातो. लोकांना रिव्हेंज पॉर्नचा शिकार कसं बनवलं जातं, हे या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं आहे.

अशा प्रकारांना बळी पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी काय पर्याय आहेत, हेसुद्धा या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं आहे.

झारासोबत अशा प्रकारे विश्वासघात झाल्याची ती एकमेव घटना नाही. तर 2018 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी ती लव आयलँड कार्यक्रमात सहभागी झाली, त्यावेळीही तिला अशा प्रकारच्या घटनेचा सामना करावा लागला.

त्यावेळीही झाराचे फोटो कित्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवण्यात आले. पण लव आयलँड व्हिलामध्ये तिच्याकडे फोन नव्हता. त्यामुळे झाराला या प्रकाराची खबर नव्हती.

झारा शोच्या बाहेर पडल्यानंतर तिला याची माहिती मिळाली. तोपर्यंत माध्यमांनीही त्याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

डॉक्युमेंट्रीच्या सुरुवातीला झारा म्हणते, "त्यावेळी मला काय वाटत होतं हे आता सांगणं खूप अवघड आहे. तुमचे आई-वडील तुमच्यामुळे लज्जित झाले आहेत. त्यांच्यासमोर वाढलेली आधीची झारा आता राहिलेली नाही. हे सगळं प्रचंड लज्जास्पद होतं. आता मी मरून जावं, असं मला वाटत होतं."

दोनवेळा खासगी फोटो व्हायरल

लव आयलँडमध्ये येण्याआधी एका व्यक्तीशी भेटणं झाराने सुरु केलं होतं. त्यानेच हे फोटो पसरवल्याचं ती सांगते. याबाबत जाब विचारताच त्या व्यक्तीने तसं केल्याचं फेटाळून लावलं.

आपले अत्यंत खासगी क्षण दोनवेळा सार्वजनिक जगात बाहेर पडल्याने झारावर जी परिस्थिती ओढवली, त्यामुळे तिचा राग आपण समजू शकतो.

तिचा राग फक्त ज्यांनी फोटो शेअर केले, त्यांच्यावर नाही. तर या प्रकारानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यावरूनही ती नाराज होती.

ऑनलाईन ट्रोलिंग, सहमतीशिवाय फोटो शेअर करणं वगैरे गोष्टींनी ती त्रस्त होती. झाराने हे फोटो पाठवलेच कसे, असा प्रश्न सगळे जण विचारत होते.

कुणी आपल्या पार्टनरला असे फोटो कसं काय पाठवू शकतो, असं विचारलं जाऊ लागलं. पण सध्याच्या काळात असे फोटो पाठवणं साधारण मानलं जातं.

मात्र, समाजात याला मान्यता नसल्यामुळे ही गोष्ट टॅबू मानली जाते. त्यामुळे हे सर्वांच्या पचनी पडत नव्हतं.

झारा म्हणते, "मी असं का केलं, असं जेव्हा लोक विचारतात, त्यावेळी मला जास्त त्रास होतो. हे बोलून लोक नाक उंच करून निघून जातात. मी एका लेखाखालची कमेंट वाचली होती.

"झारा रिव्हेंज पॉर्नबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामात कशी लागली आहे. इंस्टाग्रॅमवर तर ती बिकिनीवर पोझ देत फिरते."

"मला अपमानित करण्यात आलं हे लोकांना कळत कसं नाही. माझा विश्वास तोडण्यात आला. हे कृत्य करून एका व्यक्तीने कायद्याचं उल्लंघन केलं. त्याने गुन्हा केला. पण बिकिनी घालून इंस्टाग्रॅमवर फोटो टाकणं हा अपराध नाही. मग मला का दोष दिला जातो," असा प्रश्न झारा विचारते.

माझ्या आधीच्या प्रियकराने माझे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर टाकले

अशा घटनांना सामोरे जाणारी झारा ही एकटीच नाही.

लैंगिक अत्याचार प्रकरणात काम करणाऱ्या सेफलाईन सामाजिक संस्थेने याबाबत अधिक माहिती दिली.

रिव्हेंज पॉर्नचा प्रकार सगळ्यात जास्त 20 ते 30 वर्ष वयोगटातील तरूणांमध्ये पाहायला मिळतो, असं त्यांनी सांगितलं.

क्लोई नामक एका तरूणीचं उदाहरण त्यांनी दिलं.

क्लोई त्यावेळी कुमारवयीन होती. एके दिवशी कामावरून घरी परतत असताना तिला स्नॅपचॅटवर एक मेसेज आला. ते अकाऊंट तिच्या ओळखीचं नव्हतं.

तिने मेसेज पाहिला तर तिला धक्काच बसला.

त्या मेसेजमध्ये तिचा न्यूड फोटो होता. आज रात्री आठपर्यंत अशा प्रकारचे आणखी फोटो पाठवले नाहीत, तर हा फोटो ठिकठिकाणी पोस्ट करू, अशी धमकी सोबत दिली होती.

तिच्या आधीच्या प्रियकराला तिने पाठवलेले फोटोच तिला परत मिळत असत. काही तासांतच तिला एका मित्राने फोन केला.

इंस्टाग्रामवर अशा प्रकारचा फोटो का पोस्ट केला, असा प्रश्न मित्राने विचारला.

क्लोईच्या माजी प्रियकराला तिचा मानसिक छळ करायचा असल्याने त्याने हे कृत्य केलं होतं. त्याने माझं अकाऊंट हॅकसुद्धा केलं होतं.

माझ्या कुटुंबीयांनी हा फोटो पाहिला तर काय होईल, हा प्रश्न सर्वप्रथम माझ्या मनात आला. माझ्या मित्रांना या गोष्टी कळतील. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातील. माझी बदनामी होईल. ही चर्चा माझ्या ऑफिसपर्यंत येईल. यातून मला नोकरीसुद्धा गमवावी लागेल, अशा कित्येक विचारांनी क्लोईच्या मनात थैमान घातलं होतं.

आता पुढे काय करावं, तिला काहीच कळत नव्हतं.

तिला आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगताना प्रचंड भीती वाटत होती.

ती सांगते, "मला अजूनही आठवतं. त्यादिवशी मी उशिरा घरी आले. माझ्या खोलीत बसून विचार करत होते. आता आयुष्यात काय ठेवलं आहे. माझ्यासोबत जे काही घडलं ते स्वीकारणं माझ्यासाठी कठीण होतं. मी आता पुन्हा कुणावर विश्वास ठेवू शकेन किंवा नाही?"

त्यानंतर क्लोई कित्येक दिवस घराबाहेर पडलीच नाही. अखेर एका मित्राने तिला पबला जाण्यासाठी राजी केलं. पण तिथं मुलांचा एक ग्रुप आला होता. त्यांनी तिच्या स्तनांकडे पाहत कमेंट केली. तिचे फोटो आमच्याकडे आहेत, असं ती मुलं म्हणत होती.

आपल्या खासगी फोटोंचा दुरुपयोग एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी किती हानीकारक असू शकतो हे लोकांनी समजून घ्यावं, असं क्लोईला वाटतं.

कायदा काय सांगतो?

कोणत्याही व्यक्तीच्या सहमतीशिवाय खासगी फोटो किंवा व्हीडिओ इतरांना पाठवणं हा गुन्हा आहे.

पण हे कृत्य एखाद्या व्यक्तीला लज्जित करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी शेअर करण्यात आलेला हे यामध्ये सिद्ध व्हावं लागतं.

हा कायदा युकेमध्ये 2015 मध्ये आणला होता. त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.

केट आयजॅक नॉट यूअर पॉर्न हे कॅम्पेन चालवतात.

कमर्शिअल पॉर्न व्यावसायिकांनी नियमावली तयार करण्याची मागणी त्या कित्येक दिवसांपासून करत आहेत.

या माध्यमातून कोणाच्याही सहमतीशिवाय इंटरनेटवर अशा प्रकारचे व्हीडिओ किंवा फोटो पसरवणं रोखता येऊ शकतं.

अशा प्रकारच्या कृत्यांविरुद्ध व्यावहारिक स्वरुपात कायदा लागू करणं अत्यंत अवघड आहे. हा फोटो वाईट हेतूने शेअर करण्यात आला, हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. खरंतर कोर्टात हे सिद्ध होणं अवघड आहे. या प्रकरणात आरोपीचा बचाव सोपा आहे. माझा वाईट हेतू नव्हता. मित्रांना फक्त दाखवायचं होतं. चुकून शेअर झाले, वगैरे युक्तिवाद बचावासाठी केला जातो.

ज्या व्यक्तींचे अशा प्रकारचे फोटो शेअर झाले आहेत, त्यांना यासाठी दोषी मानलं जाऊ नये. तरच ते पुढे येऊन तक्रार दाखल करतील.

रिव्हेंज पॉर्न एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवू शकतो. यात आपली चूक नसतानाही आयुष्यभर लज्जास्पद जगणं आणि त्रास या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो.

आपल्या समोर फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपला तो फोटो किंवा व्हीडिओ पाहिला आहे, असं मनात सतत वाटत राहतं. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

बीबीसी थ्रीने मिळवलेल्या आकडेवारीनुसार, युकेमध्ये 2020 वर्षात रिव्हेंज पॉर्न हेल्पलाईनमध्ये अशा प्रकारच्या फोटो शेअर करण्याच्या घटनांमध्ये 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत 3136 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशा घटनांना तोंड दिलेल्या लोकांना मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवून देण्यात आलं. त्यापैकी 45 लोकांना आत्महत्येचे विचार येत होते.

स्वतःला दोष देणं

क्लोईने आपल्या माजी प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पण पोलिसांनी तिलाच एक इशारा दिला. तिचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि असं असतानाही तिने आपले खासगी फोटो पाठवले. त्यामुळे त्याने दबाव टाकल्यास चाईल्ड पॉर्नोग्राफीअंतर्गत तुझ्यावरही गुन्हा दाखल होईल, असं पोलिसांनी क्लोईला सांगितलं.

पोलिसांनी हे सांगितल्यानंतर ही माझी चूक होती का, याबाबत मी विचार करू लागले, असं क्लोई सांगते.

यानंतर ती याचा दोष स्वतःलाच देऊ लागली होती. बरेच दिवस तिची मानसिक स्थिती बिघडलेली होती. आता हळुहळु ती यातून बाहेर पडत आहे.

क्लोईप्रमाणेच झारानेही 14 व्या वर्षी स्वतःला अपराधी मानणं सुरू केलं होतं. त्यावेळी तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण ज्याने तो फोटो शेअर केला त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही.

झारा सांगते, "त्या प्रकरणात मीच दोषी होते. जो पीडित आहे, त्यालाच अशा वेळी जबाबदार धरलं जातं. त्यामुळे तो व्यक्ती न्याय मागायलाही घाबरतो."

रिव्हेंज पॉर्नचा बळी ठरल्यास काय कराल?

आपल्या डॉक्युमेंट्रीमुळे लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी झाराला अपेक्षा आहे.

ती म्हणते, "या डॉक्युमेंट्रीने लोकांना बळ द्यावं, असं मला वाटतं. फक्त तुम्ही अशा प्रकारच्या घटनांना तोंड दिलेलं नाही तर जगात तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे."

अशा प्रकारच्या प्रकरणात अनेक महिलांचे मेसेज झाराला येतात. ती त्यांना याबाबत मार्गदर्शन करत असते.

"रिव्हेंज पॉर्नच्या प्रकरणात महिलांना मदत मिळाली पाहिजे. लोकांनी जास्त खुलेपणाने याबाबत चर्चा करायला हवी. या घटनांचा बळी ठरलेल्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं सर्वप्रथम बंद केलं पाहिजे. त्यांना दोषी ठरवू नये," असं ती म्हणते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)