प्रिन्स हॅरी-मेगन मर्कल : ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत उलगडली अनेक रहस्यं

प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीनंतर त्याची बरीच चर्चा सुरू झाली आहे. या मुलाखतीत मेगन मर्कल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पण त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर ब्रिटिश राजघराण्याकडून मात्र अजून अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तुमच्या मुलाचा वंश काय? असा प्रश्न मला विचारण्यात आला असं मेगन यांनी सांगितलं. मी यासंदर्भात जे संभाषण झालं ते सांगणार नाही असं त्या म्हणाल्या. तो प्रसंग माझ्यासाठी खूपच अवघडून टाकणारा होता. मला धक्का बसला होता. हॅरी आणि माझं नातं उमलत होतं तेव्हाच हा प्रश्न विचारण्यात आला असंही त्यांनी सांगितलं.

प्रत्येकाला हिरो आणि व्हिलन अशा स्टोरीत स्वारस्य आहे. हे असं का आहे मला माहिती नाही. प्रत्येकाला हिरो आणि व्हिलन अशा स्वरुपाच्या कहाण्यांमध्ये स्वारस्य आहे असं मेगन मर्कल यांनी ऑप्रा विन्फ्रे यांच्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

मेगन आणि हॅरी राजघराण्यासंदर्भात आणि त्यांच्या स्वतंत्र राहण्याबाबत मुलाखतीत काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.

राणीने माझं स्वागत केलं. त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो. राजघराण्यातील प्रत्येकाने माझं स्वागत केलं असं मेगन यांनी सांगितलं.

प्रसिद्ध मुलाखतकार ऑप्रा विन्फ्रे यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांची मुलाखत घेतली.

ऑप्रा विन्फ्रे यांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाचं प्रसारण 25 वर्षांनंतर थांबवण्यात आलं. मात्र आजही अमेरिकेतील टीव्ही क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.

2018 मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ऑप्रा यांनी केलेल्या भाषणानंतर, त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असतील अशी चिन्हं होती.

मायकेल जॅक्सन, लान्स आर्मस्ट्राँग, सारा फर्ग्युसन अशा वलयांकित व्यक्तिमत्वांना कारकीर्दीतील अवघड टप्प्यांबाबत बोलतं करणं ऑप्रा यांची खासियत आहे.

मेगन आणि हॅरी यांनी मुलाखतीदरम्यान अनेक संवेदनशील विषयावर भाष्य केलं. काय आहेत हे मुद्दे, जाणून घेऊया.

1.तीन दिवसांपूर्वीच केलं होतं लग्न

प्रिन्स हॅरी आणि माझं लग्न थाटामाटात झालं. मात्र जाहीर लग्नाआधी तीन दिवस आधी आम्ही छोटेखानी पद्धतीने विवाहबद्ध झालो होतो. आर्चबिशप ऑफ कँटरबरी यांना आम्ही सांगितलं की लग्नसोहळा हा जगासाठी असेल. आमचं लग्न वेगळ्या पद्धतीने व्हावं असं आम्हाला वाटतं.

2. केट यांच्याशी झालेला वाद खरा होता?

फ्लॉवर गर्लच्या पोशाखासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या सनसनाटी स्वरुपाच्या होत्या. प्रत्यक्षात त्याच्या उलट घडलं होतं. केट फ्लॉवर गर्ल कपड्यासंदर्भात खूश नव्हत्या. त्यामुळे मलाच कसंतरी वाटलं, माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मात्र त्यानंतर केट यांनी माझ्यासाठी फुलांचा गुच्छ आणि आणि नोटही पाठवली. त्यांनी माझी माफीही मागितली. त्यांना उणं लेखण्यासाठी हा उल्लेख मी करत नाहीये. केट एक चांगल्या माणूस आहेत.

3. 'मला एकटं वाटत असे'

लग्नानंतर शाही राजघराण्याचा भाग झाल्यानंतर अनेकदा मला एकटं वाटत असे. मला याआधी कधीच असं वाटलं नव्हतं. माझ्या वागण्यावर अनेक निर्बंध आले होते. मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जेवणासाठी जाऊ शकत नव्हते. हॅरी बरोबर असताना मला एकटेपणा वाटत नसे. मात्र कामानिमित्ताने त्याला बाहेर जावं लागत असे, तेव्हा मात्र मला एकाकी वाटत असे.

4.आई उपाधी माझ्यासाठी महत्त्वाची

आमचा मुलगा आर्चीला प्रिन्स ही उपाधी मिळणार हे सांगण्यात आलं तेव्हा आम्हाला धक्का बसला. कारण प्रश्न फक्त उपाधीचा नाही तर त्याच्या सुरक्षिततेचाही आहे. माझ्यासाठी सगळ्यात मोठी उपाधी आई हीच आहे. शाही राजघराण्यातला पहिला कृष्णवर्णीय नातू-पणतू असणार आहे. बाकी मुलामुलींना राजघराण्यात जे स्थान आहे ते आमच्या मुलाला मिळणार नाही. मी गरोदर होते तेव्हा प्रिन्स उपाधीसंदर्भात नियम बदलण्यात आला. माझा प्रश्न हाच होता की का?

5. बाळाचा रंग काळा असेल का?

मी गरोदर असताना आमच्या बाळाला सुरक्षा मिळणार का यासंदर्भात निर्णय झाला. त्याला उपाधी मिळणार नाही हेही स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यावेळी जी कुजबूज मी ऐकली त्याने मला धक्का बसला. बाळाचा रंग काळा असेल का यासंदर्भात लोक बसत असत. हे कोण बोललं हे मी सांगणार नाही. मी नाव सांगितलं तर त्यांची प्रतिमा मलिन होईल. हॅरीने मला ही गोष्ट सांगितली कारण लोक त्याच्याशी यासंदर्भात बोलत असत.

6. 'मला जगायचं नव्हतं'

मला तिथे राहायचं नव्हतं. मला जगावंसं वाटत नव्हतं. हॅरीला हे सांगताना मला खजील झाल्यासारखं वाटत होतं. कारण त्याने आयुष्यात जवळच्या माणसाला गमावलं आहे. हा घाबरवून टाकणारा विचार माझ्या मनात सतत डोकावत असे. या भीतीसाठी संस्थात्मक मदत घेऊ शकते का असं मी विचारलं. मात्र माझी मागणी फेटाळण्यात आली. माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. मला वाटायचं मी हे केलं तर बाकीच्यांसाठी सगळं सुरळीत होईल.

7. 'आमच्याबाबत खोटंनोटं पसरवण्यात आलं'

शाही राजघराण्याच्या व्यवसाय-व्यापाराचं काम पाहणाऱ्या फर्मने आमच्याबाबत अनेक खोट्यानाट्या गोष्टी पसरवल्या. त्यानंतर आम्ही गप्प बसू अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. खरं बोलण्याची वेळ आली होती. यात खूप काही गमावण्याचा धोका होता. पण आम्ही त्याआधीच बरंच काही गमावलं होतं.

8. राणीने केली विचारपूस

राणी एलिझाबेथ माणूस म्हणून खूपच चांगल्या आहेत. त्यांनी नेहमी मला चांगली वागणूक दिली. त्यांनी मला अलंकार भेट म्हणून दिला. राजघराणं सोडण्याच्या निर्णयापूर्वी त्यांनी तीनवेळा दूरध्वनीद्वारे माझ्याशी संवाद साधला. हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी दोनवेळा फोन केला आणि त्यानंतर त्यांनी माझे फोन घेणं बंद केलं.

9. 'इतिहासाची पुनरावृत्ती नको होती'

माझ्या आईबरोबर जे झालं ते मेगनच्या वाट्य़ाला येऊ नये असं मला वाटत होतं. गोष्टी त्याच दिशेने चालल्या होत्या. मेगनच्या बाबतीत वंशसंदर्भात मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. आताच्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड आहे. सातत्याने एखाद्यावर टीका करणं योग्य नाही. सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी असणं, लादली गेलेली बंधनं यामुळे राजघराण्याशी संबंधित भूमिकेतून आम्ही बाजूला झालो. मेगनचा वंश हा राजघराण्यातील अनेकांसाठी संवेदनशील मुद्दा होता. यासंदर्भात कोणाशी बोलू शकेन असं कोणीच नव्हतं. मला याची लाज वाटत असे. या मुद्यावर राजघराण्याने एकीचं बळ दाखवायला हवं होतं. मात्र तीन वर्षात राजघराण्यातल्या कोणीही यावर काहीही बोललं नाही.

राजघराण्याची अजून प्रतिक्रिया नाही

या मुलाखतीनंतर राजघराण्यानं त्यांचं म्हणणं अजून मांडलेलं नाही. ते मांडल्यावर आम्ही इथे अपडेट करू.

पण राणी एलिझाबेथ यांचे माजी माध्यम सचिव चाल्स अँन्सन यांनी बीबीसीला सांगितलं की राजघराण्यात वंशद्वेषाचा लवलेशही नाहीये.

राजघराण्याच्या चरित्रकार पेनी जुनोर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की "त्यांना खासगी आयुष्य जगायचं होतं म्हणून ते तिकडे गेले. पण जाहीर मुलाखत देऊन खासगी आयुष्य कसं जगता येईल हे मला कळत नाही. ते शांत बसून शांतपणे जगू शकले असते. या मुलाखतीमुळे ब्रिटिश राजघराण्यातल्या प्रत्येकाचं नुकसान झालं आहे."पण प्रिन्स हॅरी यांनी आपली आजी राणी एलिझाबेथ यांच्याविषयी आजही आदर आणि प्रेम वाटत असल्याचं सांगितलं. पण वडील प्रिन्स चार्ल्स यांच्या वागण्यामुळे मी नाराज असल्याचं ते म्हणाले. याआधी हॅरी यांची आई प्रिन्सेस डायना यांनाही काहीशा अशाच परिस्थितीतून जावं लागलं होतं. पुढे त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर अपघातात निधन झालं. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आपण बाहेर पडलो, असं हॅरी म्हणाले. ब्रिटनमध्ये 21व्या शतकातही राजेशाही कशी, असा प्रश्न विचारणाऱ्यांना या मुलाखतीमुळे बळ मिळालं आहे. रिपब्लिक नावाच्या राजेशाहीविरोधी समूहाने म्हटलं आहे - "ब्रिटनच्या भल्यासाठी आणि राजघराण्यातल्या तरुणांच्या भल्यासाठी ही सडकी राजेशाहीची संस्था जाणं गरजेचं आहे."

36 वर्षीय हॅरी हे इंग्लंडच्या राणींचे नातू असून, राजघराण्याचे सहावे वारसदार आहेत.

त्यांच्या आई प्रिन्सेस डायना, यांचा मृत्यू हॅरी 12 वर्षांचे असताना झाला. इतक्या लहान वयात मातृछत्र गमावणं हा हॅरी यांच्यासाठी खूपच मोठा धक्का होता. गेल्या 20 वर्षात या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला असं हॅरी म्हणाले होते.

हॅरी यांनी 10 वर्ष लष्करात काम केलं. ते अफगाणिस्तानमध्येही दोनदा कार्यरत होते. 2015मध्ये लष्करातून बाजूला झाल्यानंतर त्यांनी चॅरिटी सेवेवर भर दिला आहे.

2016मध्ये त्यांची मेगन मर्कल यांच्याशी भेट झाली. दोन वर्षांनंतर हॅरी आणि मेगन मर्कल यांचं लग्न झालं. या दांपत्याला आर्ची नावाचा मुलगा आहे.

गेल्या वर्षी, हॅरी आणि मेगन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य या भूमिकेतून बाजूला होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मेगन या अभिनेत्री, ब्लॉगर तसंच विविध चळवळींसाठी कार्यरत आहेत. अमेरिकेत टीव्हीवर प्रदर्शित सूट्स या मालिकेत वकील रचेल झेन यांची भूमिका मेगन यांनी साकारली होती.

महिलांच्या हक्कांसाठी मेगन गेली अनेक वर्ष काम करत आहेत. लिंगसमानता या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या महिलांसाठीच्या बैठकीत बोलताना त्यांना मानवंदना मिळाली होती.

हॅरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर मेगन यांनी अभिनय क्षेत्राला अलविदा केला.

हॅरी यांच्याबरोबरचं लग्न हे मेगन यांचं दुसरं लग्न. चित्रपट निर्माते ट्रेव्हर एंगलसन यांच्याशी मेगन यांनी लग्न केलं होतं. दोन वर्षांनंतर ते विभक्त झाले.

मेगन पती हॅरी, मुलगा आर्ची यांच्यासह अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे राहतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)