You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्राणी संग्रहालयात चणचण आली, लांडगा म्हणून ठेवला कुत्रा आणि ट्विटरवर दिवाळी झाली
तुम्ही एखाद्या प्राणीसंग्रहालयात प्राणी पाहायला गेलात आणि लांडग्यांच्या पिंजऱ्यात तुम्हाला कुत्रा दिसला तर...?
अर्थात, कुत्रा आणि लांडग्यातील फरक तुम्ही ओळखाल. मात्र, चीनमधील प्राणीसंग्रहालयाला तुमच्या 'प्राणी ओळखी'वर विश्वास नाहीय. म्हणून त्यांनी लांडग्याच्या पिंजऱ्यात बिनदिक्कीतपणे कुत्र्याला ठेवलंय.
चीनमधील हुबेई प्रांतातील जुंबिगमध्ये जियांगशुआन नावाचं प्राणीसंग्रहालय आहे. या संग्रहालयातला सर्व प्रकार आहे.
हा प्रकार उघडकीस सोशल मीडियावरील एका व्हीडिओमुळे. प्राणी पाहायला गेलेल्या एका पर्यटकाने लांडग्याच्या पिंजऱ्यात रॉटवेलर जातीच्या कुत्र्याला पाहिलं. या पर्यटकानं त्याचा व्हीडिओ बनवला. यात पर्यटक कुत्र्याला उद्देशून विचारतो, "व्हूप! तुम्ही लांडगा आहात का?"
या व्हीडिओमुळे प्राणीसंग्रहालयाची सोशल मीडियावर टर उडवली जातेय खरी, पण यावेळी हाही प्रश्न उपस्थित केला जातोय की, कोरोनानंतर लगेच प्राणी संग्रहालयात जाणं योग्य आहे का?
पण असं नाही की, या प्राणीसंग्रहालयात कधी लांडगा नव्हताच. ज्या पर्यटकाने व्हीडिओ बनवला, त्यानं बीजिंग न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीनं प्राणीसंग्रहालयाला याबाबत माहिती विचारली. तेव्हा प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की, इथं आधी एक लांडगा होता, मात्र वयामुळे त्याचा मृत्यू झाला.
लांडग्यांच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेला कुत्रा या प्राणीसंग्रहालयातच असे. त्याला तात्पुरतं त्यात ठेवण्यात आलंय, असंही प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
शाईन डॉट सीएन न्यूजच्या माहितीनुसार, हे प्राणीसंग्रहालय सध्या आर्थिक चणचणीत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या देखभालीचा खर्च निघावा इतके पैसे मिळतील, एवढेही पर्यटक आता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
या प्राणीसंग्रहालयात 15 युआन आकारले जातात. इथं सिंह आणि वाघ यांसारखे प्राणी असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, या सर्व प्रकाराची चीनमधील सोशल मीडियावर रंगतदार चर्चा झाली. काहीजणांनी आपल्याला हसायला आल्याचं सांगितलं, तर काहीजणांना अजूनही विश्वास बसत नाहीय की असा काही प्रकार होऊ शकतो!
याआधीही असे प्रकार समोर आले आहेत. त्यांचाही उल्लेख बरेचजण करतायेत. उदाहरणादाखल सांगायचं तर इजिप्तमध्ये गाढवांना झेब्रा दिसण्यासाठी त्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवल्या होत्या.
असं एकीकडे असताना, चीनमधील प्राणीहक्क कार्यकर्ते सातत्याने प्राणीसंग्रहालयातील दुरावस्थेबाबत टीका करत आहेत. द साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं 2017 साली तर याबाबतचा मुद्दा लावूनच धरला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)