You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मटाराच्या दाण्याएवढा सरडा तुम्ही पाहिलात का?
मादागास्करच्या जंगलात मटाराच्या दाण्याच्या आकाराएवढा सरडा आढळला आहे. हा जगातला सर्वांत छोटा सरपटणारा प्राणी असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
जर्मन-मॅडागास्कन शोध पथकातल्या शास्त्रज्ञांना मादागास्करमध्ये हे दोन पिटुकले सरडे आढळले. यापैकी नर सरड्याचं शरीर केवळ 13.5 मिमी लांबीचं आहे. तर डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंतची लांबी 22 मिमी आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 11 हजार 500 प्रजाती आहेत. त्यातला हा सर्वांत छोटा सरडा आहे, असं म्युनिचमधल्या बॅव्हरियन स्टेट कलेक्शन ऑफ झुओलॉजीच्या संशोधकांचं म्हणणं आहे.
नराच्या तुलनेत मादी जरा मोठी आहे. मादीची लांबी 29 मिमी आहे. शोध पथकाला हे दोनच सरडे आढळून आले आहेत. बरेच प्रयत्न करूनसुद्धा अजूनतरी त्यांना या जातीचे इतर सरडे आढळलेले नाहीत.
सायंटिफिक रिपोर्ट जर्नलमधल्या वृत्तानुसार, "हा सरडा उत्तर मादागास्करमधल्या रेनफॉरेस्टमध्ये आढळला आहे आणि ही सरड्याची प्रजाती कदाचित नष्ट होण्याच्या मार्गावर असावी."
हॅम्बर्गमधल्या सेंटर ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधले शास्त्रज्ञ ऑलिव्हर हॉलीचेक म्हणतात, "ज्या भागात हा छोटा सरडा आढळला आहे ते जंगल आता नष्ट होतंय. मात्र, तो भाग सध्या संरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे ही प्रजाती टिकेल."
हे सरडे छोटे किडे खातात आणि रात्रीच्या वेळी शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गवतांमध्ये लपून बसतात, असं संशोधकांना आढळून आलं आहे.
या शोध मोहिमेतील शास्त्रज्ञांपैकी एक डॉ. मार्क शेरज यांनी आपल्या ब्लॉगमध्ये "अत्यंत छोट्या जीवाचा नेत्रदीपक नजारा", असा या सरड्याचा उल्लेख केला आहे.
शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालात या सरड्याच्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीत यांचा समावेश करावा, अशी शिफारस केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)