IndvsEng : इंग्लंड संघाला रोटेशन पॉलिसीची संगीतखुर्ची महागात पडली का?

फोटो स्रोत, England cricket twitter
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला आणि इंग्लंडचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.
इंग्लंडला आता घरच्या मैदानावर अर्थात क्रिकेटची पंढरी मानलं जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळता येणार नाही.
गेल्या दशकभरात इंग्लंडचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. इंग्लंडने भारतीय उपखंडातही मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र यंदा इंग्लंडला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
इंग्लंडने चेन्नईतली पहिली टेस्ट जिंकून जोरदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याच मैदानावर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अहमदाबाद इथे झालेल्या टेस्टमध्ये तर अवघ्या दोन दिवसात त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. इंग्लंडच्या पराभवात रोटेशन पॉलिसीची भूमिका निर्णायक ठरली आहे का?
इंग्लंडचा भरगच्च कार्यक्रम
इंग्लंडच्या संघाला यंदाच्या वर्षात 17 टेस्ट खेळायच्या आहेत. याव्यतिरिक्त इंग्लंडच्या संघाला या आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी व्हायचं आहे.
वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकाही आहेत. याव्यतिरिक्त इंग्लंडचे प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेतही खेळतात. तसंच इंग्लंडमधील प्रथम श्रेणी सामने आहेत.

फोटो स्रोत, England cricket twitter
इंग्लंडने भारतात दाखल होण्याआधी श्रीलंकेत दोन टेस्टची मालिका जिंकली. भारताविरुद्ध भारतात 4, न्यूझीलंडविरुद्ध 2, भारताविरुद्ध मायदेशी 5 खेळणार आहेत. दमून जायला होईल असं हे वेळापत्रक आहे.
रोटेशन पॉलिसी काय आहे आणि का आहे?
रोटेशन पॉलिसी म्हणजे खेळाडूंना मिळणाऱ्या संधी आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखणं. सोप्या शब्दात खेळाडूंना आळीपाळीने खेळवणं. रोटेशन पॉलिसी अमलात आणण्यामागे अनेक कारणं आहेत.
कोरोना काळात होत असलेल्या मालिकांसाठी खेळाडूंना महिनोंमहिने बायोबबल मध्ये राहावं लागतं.

फोटो स्रोत, England cricket twitter
मैदान-हॉटेल एवढ्यापुरतच त्यांचा वावर मर्यादित असतो. या काळात कुटुंबीयांची साथ नसते. सातत्याने बायोबबलमध्ये राहून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये तसंच भरगच्च वेळापत्रकामुळे दुखापती वाढू नयेत यासाठी वर्कलोड मॅनेजमेंट आणि रोटेशन पॉलिसी अंगीकारण्यात आली आहे.
इंग्लंडचे बहुतांश खेळाडू टेस्ट, वनडे, ट्वेन्टी असे तीन प्रकार, आयपीएलसारख्या स्पर्धा, देशांतर्गत स्पर्धा खेळतात. बर्नआऊट म्हणजे अतिथकवा, तोचतोचपणा, सतत जिंकण्याचं दडपण यासारख्या गोष्टींना दूर ठेवण्यासाठीही रोटेशन पॉलिसी स्वीकारण्यात आली आहे.
रोटेशन पॉलिसीसाठी काय केलं?
इंग्लंडने दोन संघ तयार केले आहेत. प्रत्यक्ष मॅचमध्ये 11च खेळाडू खेळू शकतात. पण इंग्लंडने पर्यायी संघ मेहनतीने घडवला आहे. प्रत्यक्ष मॅचमध्ये थेट खेळवता येऊ शकतील अशा 20-22 खेळाडूंची फळीच इंग्लंडने तयार केली आहे.
हे करतानाही लाईक अ लाईक रिप्लेसमेंट याचाही विचार करण्यात आला आहे. फास्ट बॉलर, स्पिन बॉलर, विकेटकीपर, बॅट्समन, ओपनर असे सेट तयार करण्यात आले आहेत. समान गुणकौशल्यं असणाऱ्या खेळाडूंचे संच सज्ज ठेवण्यात आले आहेत. या खेळाडूंना आळीपाळीने अंतिम अकरात खेळण्याची संधी दिली जाते.
रोटेशन पॉलिसीचा गोंधळ
श्रीलंकेत दोन टेस्टची मालिका खेळून इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला. तिथे दोन आणि इथल्या तीन अशा पाच टेस्ट मिळून इंग्लंडने 19 खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आहे.
-श्रीलंका दौऱ्यासाठी अष्टपैलू बेन स्टोक्स आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर यांना विश्रांती देण्यात आली. हे दोघे थेट भारतात दाखल झाले.
-श्रीलंकेत दोन आणि चेन्नईतली पहिली टेस्ट खेळून विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर मायदेशी रवाना झाला. बटलर दुखापतग्रस्त नव्हता. त्याला सक्तीच्या विश्रांतीसाठी मायदेशी रवाना करण्यात आलं.
-विकेटकीपर बॅट्समन जॉनी बेअरस्टो आणि फास्ट बॉलर मार्क वूड श्रीलंकेत संघाचा भाग होते. तिथून ते मायदेशी रवाना झाले. भारतातल्या पहिल्या दोन टेस्टसाठी त्यांची निवड करण्यात आली नाही. तिसऱ्या टेस्टआधी हे दोघं भारतात दाखल झाले.
-श्रीलंका दौऱ्यात अष्टपैलू सॅम करन खेळला. तिथून त्याला मायदेशी धाडण्यात आलं. भारतातल्या तिसऱ्या टेस्टपासून तो संघात असणार होता. मात्र व्हिसाच्या कारणांमुळे तो टेस्ट सीरिजसाठी उपलब्ध नसेल असं सांगण्यात आलं.
- श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर मोईन अलीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तो प्रदीर्घ काळ क्वारंटीनमध्ये होता. तो दोन्ही टेस्ट खेळला नाही. तो भारतात दाखल झाला. पहिली टेस्ट खेळला नाही. दीड वर्षानंतर मोईनला चेन्नई इथे झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये संधी देण्यात आली. मोईनने 8 विकेट्स आणि उपयुक्त रन्सही केल्या. मात्र मोईनने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे असं इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मॅचनंतर सांगितलं. यावर वादंग झाला. त्यानंतर रूट आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी माफी मागितली. मोईनला रोटेशन पॉलिसीअंतर्गत मायदेशी पाठवण्याचा निर्णय आमचा होता असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, England cricket twitter
-पस्तिशी ओलांडलेल्या स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना एकत्रित खेळवण्यात येत नाही. ब्रॉड खेळला तर अँडरसन नसतो आणि अँडरसन खेळला तर ब्रॉड नसतो. प्रचंड अनुभव आणि विकेट्सचं मोठं गाठोडं नावावर असलेले हे दोघं एकत्रित प्रतिस्पर्धी संघाला भारी पडू शकतात. मात्र वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत त्यांना आलटून पालटून खेळवलं जातं. योगायोग म्हणजे दोन दिवसात आटोपलेल्या अहमदाबाद टेस्टमध्ये अँडरसन-ब्रॉड दोघंही खेळले. मात्र खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने या जोडगोळीला एकही विकेट मिळाली नाही. हे दोघं एकत्रित 120 टेस्ट खेळले आहेत. पहिल्यांदाच या जोडीवर विकेटविरहित राहण्याची नामुष्की ओढवली.
-रोटेशन पॉलिसी लागू करण्यात आल्याने प्रत्येक मॅचला संघ बदलण्यात येतो. चांगलं खेळूनही सगळ्या मॅच खेळता येईल याची शाश्वती नाही. वाईट कामगिरीनंतर डच्चू मिळेल असंही नाही.
रोटेशन पॉलिसीवर टीका का होतेय?
खेळाडूंना विश्रांती तसंच घरच्यांबरोबर वेळ मिळावा हा उद्देश चांगला असला तरी महत्त्वाच्या मालिकेत सर्वोत्तम संघ न खेळवल्यामुळे इंग्लंड संघव्यवस्थापन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका होत आहे. इंग्लंडला प्राधान्य ठरवता न आल्याने रोटेशन पॉलिसीचा फज्जा उडाला आहे अशी टीका होत आहे.

फोटो स्रोत, England cricket twitter
भारतात टेस्ट सीरिज जिंकणं अत्यंत खडतर आहे. या मालिकेसाठी तुम्ही सर्वोत्तम संघ खेळवणार नसाल तर मग कुठे खेळवणार? हा इंग्लंडचा ब संघ आहे अशा शब्दात इंग्लंडचा माजी धडाडीचा बॅट्समन आणि कर्णधार केव्हिन पीटरसनने टीका केली आहे.
भारताविरुद्धची मालिका अॅशेसपेक्षाही महत्त्वाची आहे. अशा मालिकेत सर्वोत्तम संघ खेळवणं हे प्राधान्य हवं. देशासाठी खेळणं हा सन्मानाचा क्षण असतो. खेळाडू ऐन भरात असताना त्याला रोटेशन पॉलिसीअंतर्गत मायदेशी कसं पाठवलं जाऊ शकतं. प्रत्येक मॅचला संघ बदलला की अख्खं समीकरण बदलतं, लय जाते असं इंग्लंडचा माजी बॅट्समन इयान बेलने म्हटलं आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेनने मात्र रोटेशन पॉलिसीचं कौतुक केलं आहे. इंग्लंड संघाचं भरगच्च वेळापत्रक लक्षात घेतलं तर रोटेशन करणं योग्य आहे. खेळाडूंना विश्रांती मिळायला हवी. घरच्यांसाठी वेळ मिळायला हवं. रोटेशन करण्यासाठी इंग्लंडने पर्यीयी खेळाडूंची फौज उभी केली आहे हे महत्त्वाचं आहे असं स्टेनला वाटतं.
या मालिकेपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही इंग्लंड राबवत असलेल्या रोटेशन पॉलिसीचं कौतुक केलं होतं. कोव्हिड काळात अनेक महिने घरापासून-घरच्यांपासून दूर राहणं कठीण आहे. भरगच्च वेळापत्रक असल्याने दुखापतींचा धोकाही असतो. अशा परिस्थितीत रोटेशन पॉलिसी हा चांगला पर्याय इंग्लंडने स्वीकारल्याचं संगकाराचं म्हणणं होतं.
चेन्नईत पहिल्या टेस्टमध्ये दमदार प्रदर्शनानंतरही अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसनला दुसऱ्या टेस्टसाठी वगळण्यात आलं. यासंदर्भात विचारलं असता अँडरसन म्हणाला, संघाबाहेर होणं निराशानजक आहे. पण मी मोठ्या चित्राचा विचार करतो. खेळाडूंच्या हितासाठी रोटेशन पॉलिसी अंगाीकारण्यात आली आहे.
वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकाराचा वर्ल्ड कप असतो. त्याच धर्तीवर टेस्ट मॅचेसची लोकप्रियता वाढावी यासाठी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपची आखणी केली. कोरोनामुळे या कार्यक्रमात काही बदल करण्यात आले. न्यूझीलंडचा संघ जूनमध्ये होणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र अहमदाबाद टेस्टमध्ये पराभवासह इंग्लंडचे चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं आहे. एवढी मोठी संधी गमावल्याने पराभवाची मीमांसा होणार आणि रोटेशन पॉलिसीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








