IndvsEng: 5 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेल बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

अक्षर पटेल, गुजरात, भारतीय क्रिकेट संघ, आयपीएल, इंडिया ए

फोटो स्रोत, MICHAEL BRADLEY

फोटो कॅप्शन, अक्षर पटेल

भारतासाठी टेस्ट खेळणारा अक्षर पटेल 302वा क्रिकेटपटू ठरला आहे. अक्षरने सलग दोन टेस्ट मध्ये डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली आहे. चेन्नईत पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या होत्या आता अहमदाबादमध्ये घरच्या मैदानावर खेळताना पुन्हा पाच विकेट्स घेतल्या.

'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' ही संकल्पना क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. समान गुणकौशल्यं असणाऱ्या एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूची जागा घेणे. दुखापत किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव एखाद्या क्रिकेटपटूला खेळता येऊ शकत नसेल तर तो ज्याकरता ओळखला जातो तशी कौशल्यं असणाऱ्या खेळाडूला प्राधान्य मिळतं. जेणेकरून संघाचं संतुलन आणि समीकरण बदलावं लागत नाही.

रवींद्र जडेजा स्थानिक क्रिकेटमध्ये सौराष्ट्रसाठी खेळतो. अक्षर पटेल गुजरातसाठी खेळतो. अक्षर पटेलची कारकीर्दीत सदैव जडेजाचा लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून गणना केली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने जडेजा खेळू शकणार नसल्याने अक्षरचा भारतीय संघासाठी टेस्ट खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जडेजाच्या छायेतून बाहेर पडत वेगळी छाप उमटवण्यासाठी अक्षर सज्ज आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग, त्यातही शिस्तबद्ध असा विकेट टू विकेट मारा, झटपट ओव्हर संपवण्याची हातोटी, बॅटिंगची चांगली क्षमता, उत्तम फिल्डर या सगळ्यासाठी गुणवैशिष्ट्यांसाठी जडेजा ओळखला जातो. हेच सगळं अक्षर पटेलही करतो. एकाच कालखंडात समान कौशल्यं असणारी माणसं एकत्र काम करणं अवघड असतं.

शेन वॉर्न ऐन भरात असताना स्टुअर्ट मॅकगिल होता. मुथय्या मुरलीधरन असताना रंगना हेराथ होता. मॅकगिलची कारकीर्द बहरलीच नाही तर हेराथने मुरलीधरन निवृत्त झाल्यानंतर आपला दबदबा प्रस्थापित केला. हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे टेस्ट क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी स्पिन बॉलिंगचा गड समर्थपणे सांभाळला आहे.

अक्षर पटेल, गुजरात, भारतीय क्रिकेट संघ, आयपीएल, इंडिया ए

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, अक्षर सहकाऱ्यांसह विकेटचा आनंद साजरा करताना

मायदेशात या दोघांच्या बॉलिंगसमोर प्रतिस्पर्धी बॅट्समनची अक्षरक्ष: फेफे उडते. या दोघांनी विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं या दोन्ही आघाड्यांवर सुरेख भागीदारी रचली आहे. हे दोघे सुसाट फॉर्ममध्ये खेळत असल्याने अमित मिश्रा, जयंत यादव, कुलदीप यादव आणि शाहबाझ नदीम यांना खेळण्याची संधी अभावानेच मिळते.

एकाचं नुकसान दुसऱ्याची संधी ठरू शकते या उक्तीचा प्रत्यय अक्षरच्या निवडीत आहे. 27वर्षीय अक्षरने याआधी 38 वनडे आणि 11 ट्वेन्टी-20 मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र आता क्रिकेटमधल्या पारंपरिक प्रकारासाठी त्याची निवड झाली आहे.

सातत्यपूर्ण प्रदर्शन

गुजरात संघासाठी बॉलिंग ऑलराऊंडर ही भूमिका गेली अनेक वर्ष चोख सांभाळतो आहे. गुजरातसाठी खेळताना दुसऱ्याच सामन्यात अक्षरने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली होती. रन्स देण्यात अत्यंत कंजुषी हे अक्षरच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य आहे. छोटाश्या रनअपमुळे अक्षर अतिशय वेगात ओव्हर पूर्ण करतो

2013 मध्ये आशियाई इमर्जिंग कप U23 स्पर्धेत सात विकेट्सह भारताला जेतेपद मिळवून देण्यात अक्षरचा महत्त्वाचा वाटा होता.

अक्षर पटेल, गुजरात, भारतीय क्रिकेट संघ, आयपीएल, इंडिया ए

फोटो स्रोत, JEKESAI NJIKIZANA

फोटो कॅप्शन, अक्षर अपील करताना

2014मध्ये अक्षरने भारतासाठी वनडे पदार्पण केलं. 2015 वर्ल्डकपवेळी अक्षरची भारतीय संघात निवड झाली होती.

आयपीएल स्पर्धेत अक्षर सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडे होता. मात्र तिथे त्याला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत. 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने अक्षरला ताफ्यात समाविष्ट केलं. मुख्य स्पिनर, उपयुक्त बॅट्समन आणि उत्तम फिल्डर अशा तिन्ही आघाड्या अक्षरने पंजाबसाठी समर्थपणे सांभाळल्या. त्याच हंगामात अक्षरला इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

2016मध्ये आयपीएल स्पर्धेत अक्षरने पाच बॉलमध्ये चार विकेट्स घेण्याचा विक्रम केला. यादरम्यान त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. 2018मध्ये पंजाबने अक्षरचं योगदान लक्षात घेऊन त्याला संघात कायम राखलं होतं.

2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने अक्षरला संघात समाविष्ट केलं. दिल्लीच्या सुधारलेल्या प्रदर्शनात अक्षरच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे.

आयपीएल स्पर्धेत अक्षरच्या नावावर 913 रन्स आणि 80 विकेट्स आहेत.

जेव्हा धोनीने केला होता पालापाचोळा

ही घटना आहे 2016मधली. विशाखापट्टणम इथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स मॅच होती. पंजाबने 172 रन्सची मजल मारली. सातत्याने विकेट्स पडत गेल्याने पुण्यासाठी मॅच जिंकणं अवघड होत गेलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याला 23 रन्स हव्या होत्या. समीकरण कठीणच होतं पण त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनी होता.

अक्षर पटेल, गुजरात, भारतीय क्रिकेट संघ, आयपीएल, इंडिया ए

फोटो स्रोत, Scott Barbour

फोटो कॅप्शन, अक्षर बॅटिंग करताना

हंगामी कर्णधार मुरली विजयने शेवटची ओव्हर फास्ट बॉवर कायले अबॉटऐवजी स्पिनर अक्षर पटेलला देण्याचा निर्णय घेतला.

अक्षरला बॉलिंगला येताना पाहूनच धोनी खूश झाला. पहिल्या बॉलवर एकही रन झाली नाही तर दुसरा बॉल वाईड पडला. फार नुकसान झालं नाही. मात्र त्यानंतर धोनीने 6,0,4,6,6 अशी लूट करत पुण्याला सनसनाटी विजय मिळवून दिला. या वादळी आक्रमणाने अक्षर खचून गेला नाही. आयपीएलमधल्या शिस्तबद्ध टप्प्यावर बॉलिंग करणाऱ्या बॉलर्समध्ये अक्षरचं नाव घेतलं जातं.

डरहॅमसाठी खेळण्याचा अनुभव

अक्षर पटेल इंग्लंडमधील काऊंटी संघ डरहॅमसाठी खेळला आहे. इंग्लंड संघातील काही खेळाडूंबरोबर आणि विरुद्ध खेळण्याचा अनुभव अक्षरकडे आहे. त्यांच्या खेळातील कच्चे दुवे तो जाणतो.

पटेल वारसा

भारतीय क्रिकेटला पटेल आडनावाच्या खेळाडूंचा वारसा आहे. भरुच एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा मुनाफ पटेल, 17व्या वर्षी पदार्पण करणारा आणि प्रदीर्घ काळ खेळणारा विकेटकीपर बॅट्समन पार्थिव पटेल, पद्मश्री पुरस्कारप्राप्त बॉलर जसू पटेल, अल्प आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर क्रिकेट प्रशासक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रिजेश पटेल यांच्यासह अशोक पटेल, रशीद पटेल भारतासाठी खेळले आहेत.

भारताव्यतिरिक्त दीपक पटेल आणि जीतन पटेल (न्यूझीलंड), मीनल पटेल आणि समीत पटेल (इंग्लंड), ब्रिजल पटेल, राकेश पटेल, हिरल पटेल, आशिष पटेल, मल्हार पटेल, जितेंद्र पटेल हे खेळाडू केनिया तसंच कॅनडासाठी खेळले आहेत.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)