You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओरल सेक्सचा योनी संसर्गाशी काय संबंध असतो?
ओरल सेक्समुळे bacterial vaginosis (BV)ची स्थिती निर्माण होऊ शकते, असं PLoS Biology या जर्नलमधील संशोधनात सांगण्यात आलं आहे.
BV हा लैंगिक संक्रमणातून होणारा संसर्ग नाहीये. ते योनीमार्गात आढळणाऱ्या जीवाणूंचं एक असंतुलन आहे.
BV असलेल्या महिलांना कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी त्यांच्या योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव होऊ शकतो.
योनीमध्ये जिवंत राहतात आणि वाढतात अशा सूक्ष्मजंतूंवर तोंडातील जीवाणूंचा काय परिणाम होतो, याविषयी तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे.
BV म्हणजे नेमकं काय?
BV सामान्यत: गंभीर नसतो, पण त्यावर उपचार केले पाहिजेत. कारण यामुळे स्त्रिया लैंगिक संक्रमणापासून होणाऱ्या आजारांना बळी पडू शकतात. तसंच मूत्रमार्गाचा संसर्गही उद्भवू शकतो.
जर महिला गर्भवती असेल तर यामुळे बाळंतपण ठरलेल्या तारखेआधीच होऊ शकतं.
BV झाल्याचं कसं ओळखायचं?
जर अंगावर जात असेल आणि त्याला दुर्गंध येत असेल तर BV झाल्याचं लक्षात येऊ शकेल.
योनीमार्गातून होणाऱ्या स्रावाच्या रंगात आणि सुसंगततेत बदल दिसून येईल. जसं तो रंग राखाडी-पांढरा किंवा पातळ असू शकेल.
तुमचे डॉक्टर किंवा लैंगिक आरोग्य क्लिनिक तुम्हाला BV आहे की नाही, हे तपासण्यासाठी स्वाब चाचणीची व्यवस्था करू शकतात.
जर तुमचा BVचा निकाल पॉझिटिव्ह असेल, तर त्यावर अँटीबायोटिक गोळ्या, जेल किंवा क्रीम वापरता येऊ शकते.
नवीन संशोधनात काय समोर आलं?
BV नसलेल्या महिलांमध्ये लॅक्टोबॅसिली नावाचे 'चांगले' जीवाणू असतात आणि ते कमी पीएचसहित योनीमार्ग अधिक आम्लधर्मी ठेवतात.
कधीकधी हे आरोग्य संतुलन बिघडतं आणि त्यामुळे योनीमध्ये इतर सूक्ष्मजीव वाढू शकतात.
हे असं कशामुळे होतं, हे पूर्णपणे माहिती नसलं तरी तुम्हाला खालील कारणांमुळे BV व्हायची शक्यता असते.
- तुम्ही सेक्सुअली अॅक्टिव्ह असाल तर (पण ज्या महिला सेक्स करत नाही त्यांनाही होऊ शकतो)
- तुम्ही आपला पार्टनर बदलत असाल तर
- तुम्ही IUD सारखं गर्भनिरोधक साधन वापरत असाल तर
- तुम्ही तुमच्या योनीभोवती परफ्यूम वापरत असाल तर
तोंडात आढळणारा सामान्य प्रकारचा जीवाणू जो हिरड्यांचा आजार आणि दाताच्या फळ्यांशी संबंधित असतो, तो कशाप्रकारे बीव्हीला कारणीभूत ठरतो, हे PLoS Biology अभ्यासातून समोर आलं.
या जीवाणूच्या वर्तनाकडे लक्ष वेधण्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी योनीमार्गातील जीवाणूंचे नमुने आणि उंदरांवर प्रयोग केले.
यात तोंडात आढळणारा Fusobacterium nucleatum हा जीवाणू BVमधील इतर जीवाणूंच्या वाढीस मदत करताना दिसला.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. अमांडा लुईस आणि त्यांचे सहकारी संशोधक म्हणतात की, या संशोधनातून ओरल सेक्स BV साठी कशाप्रकारे कारणीभूत ठरू शकतो, हे समोर येतं.
BV हा सेक्समुळे होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी आधीच सांगितलं आहे. मग हा सेक्स महिलांमधील असला तरीही.
ब्रिटीश असोसिएशन फॉर सेक्सुअल हेल्थ अँड एचआयव्हीचे प्रवक्ते प्रा. क्लाउडिया एस्टकोर्ट म्हणतात की, BV विषयीची माहिती जाणून घेण्याकरता यासारखे संशोधन महत्त्वाचे आहे.
"आपल्याला माहिती आहे की BV ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे, ज्यात बरेच घटक असतात."
त्या पुढे म्हणाल्या, "तोंडावाटे केलेल्या लैंगिक संबंधातून संसर्ग होऊ शकतो, तसंच इतर जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो, जे आरोग्यासाठीच्या इतर बाबींमध्ये महत्त्वाचे असूही शकतात किंवा नसूही शकतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)