कार्लोस सोरिया : 81 वर्षांचे गिर्यारोहक, साठी उलटल्यावर पादाक्रांत केली 11 शिखरं

कार्लोस सोरिया माद्रिदबाहेरच्या पर्वतरांगांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी घर सोडतात, तेव्हा चेहऱ्यावरील मास्क त्यांच्या मनात हिमालय मोहिमेसंबंधीच्या आठवणी जागृत करतो.

मास्कमुळे श्वास घेणं अवघड जातं. यामुळे मला मी उंचीवर असल्याची जाणीव होते, असं ते हसतहसत सांगतात.

81 वर्षीय कार्लोस यांची पुन्हा एकदा हिमालयातील विरळ हवा अनुभवण्याची इच्छा आहे. वसंत ऋतुत नेपाळमधील धौलागिरी पर्वतावर चढण्याची योजना आखत असताना ते ही इच्छा पूर्ण करणार आहेत.

त्यानंतर शरद ऋतुत तिबेटमधील शिशपंग्मा सर करण्याची त्यांची इच्छा आहे. जर त्यांनी ही दोन्ही शिखरं सर केली तर ते सर्वोच्च 14 शिखरं पादाक्रांत करणारे जगातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ठरतील.

कार्लोस यांचा जन्म माद्रिदच्या एव्हिला इथं झाला. ते जन्मभर गिर्यारोहण करत आले आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी त्यांच्या म्हातारपणात केलेल्या कामगिरीमुळे उल्लेखनीय ठरत आहेत.

वयाच्या साठीनंतर त्यांनी जगातील सर्वोच्च 14 पैकी 11 शिखरं सर केली आहेत. वयाच्या 62व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढणारे ते जगातील वयस्कर व्यक्ती ठरले. तर वयाच्या 70व्या वर्षी सातही खंडातील सर्वोच्च शिखरं चढण्याचं काम पूर्ण केलं.

'माझ्या स्वत:च्या पायांवर'

स्वत:च्या पायांनी ही शिखरं पादाक्रांत करण्याचा त्यांना अभिमान आहे.

"मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो ती गोष्ट म्हणजे मला कधीही गंभीर फ्रॉस्टबाईटचा सामना करावा लागला नाही. तसंच कुठे अडकून पडल्यामुळे सोडवण्याची वेळही आली नाही. मी प्रत्येक शिखर माझ्या स्वत:च्या दोन पायांनीशी चढलो आणि तसंच खालीही आलो.

गेल्या वर्षी त्यांना 14वं सर्वोच्च शिखर गाठायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांना तसं करता आलं नाही. पण, जेव्हा ते शिखर पादांक्रात करायला निघतील, तेव्हा कोरोनामुळे बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

"कोरोनामुळे जगभरात मरण पावलेल्या माझ्या वयाच्या लोकांना मला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तसंच केअर होम्समध्ये ज्या माणसांना त्रासाला सामोरं जावं लागत आहेत आणि ती घाबरली आहेत, त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करायच्या आहे"

"कोरोनाच्या महाभयंकर संकटात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी माझ्यासोबत फुलांचा गुच्छ घेऊन जाणार आहे आणि तो शिखरावर ठेवणार आहे," ते पुढे सांगतात.

सध्या ते माद्रिदजवळच्या Sierra de Guadarramaपर्वतरांगामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या घरामागे जीम आहे. ज्यात बाईक, वेट्स, तसंच पर्वत चढण्यासाठीच्या लहान शिड्याही आहेत.

जगातल्या कुणीही असं काम केलेलं नाहीये, कार्लोस यांच्यासोबत शिखर मोहीमेवर जाणारे सीटो कार्कविल्ला सांगतात.

"सेवानिवृत्तीनंतर कंटाळवाणं आयुष्य जगणाऱ्यांपैकी कार्लोस नव्हता. त्यामुळे मग त्यानं पर्वतारोहण करण्याचा निर्णय घेतला. तो एक अनुभव गिर्यारोहक आहे, जो अद्याप सक्रिय आहे. सहा दशकांपासून सर्वोच्च स्तरावर सक्रिय असलेला त्याच्यासारखा दुसरा कोणताही खेळाडू नाही."

कार्लोस आता वसंत आणि शरद ऋतुतील मोहिमेसाठी आवश्यक असलेला निधी जमवत आहेत आणि कोरोनाच्या साथीनं पुन्हा मोहीम थांबवायची वेळ यायला नको, अशी आशा करत आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. असं असलं तरी शारीरिक तंदुरुस्ती ही समस्या नसल्याचं ते सांगतात.

ते म्हणतात, "मी माझ्या पायातील स्थिरता थोड्या प्रमाणात गमावली आहे. तसंच थोडी शक्तीही कमी झाली आहे. पण मी जेव्हा हिमालयात जाईल तेव्हा एक म्हातारा हे करू शकेल का, अशा भावना कधीच माझ्या मनात येणार नाहीत."

"आता कोणताही खेळ खेळण्याचं वय राहिलं नाही, अशी भावना वयस्कर लोकांच्या मनात असते. मी आता सत्तरी गाठलीय, असे अनेक जण म्हणतात. पण, त्यानं काय फरक पडतो, सत्तरीही काही कमी सुंदर नसते," असं ते पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)