आँग सान सू ची : म्यानमारच्या लष्कराने ताब्यात घेतलेल्या नेत्या कोण आहेत?

फोटो स्रोत, PA Media
आँग सान सू ची यांची ओळख मानवी हक्कांसाठी लढणारा दीपस्तंभ म्हणून होती. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपलं स्वातंत्र्य झुगारून देत. त्यांनी म्यानमारवर वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या लष्करी राजवटीविरोधात बंड पुकारलं.
1991 मध्ये आँग सान सू ची यांना नोबल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्या नजरकैदेत होत्या.
सू ची यांनी 2015 मध्ये नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसी पक्षाचं निवडणुकीत नेतृत्व केलं. त्यांच्या पक्षाने जबरदस्त विजय मिळवला. म्यानमारमध्ये 25 वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
पण, 2021 च्या सुरूवातीलाच म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केला. लष्कराने सू ची आणि त्यांच्या पक्षाशी जोडल्या गेलेल्या अनेक नेत्यांना अटक केली आहे.
म्यानमारमध्ये अल्पसंख्याक रोहिंग्या मुसलमानांबाबतच्या त्यांच्या प्रतिसादामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमा खराब झाली. पण, म्यानमारमधील बौद्ध धर्मियांमध्ये सू की लोकप्रिय आहेत.
सत्तेचा मार्ग
आँग सान सू ची 1989 ते 2010 जवळपास 15 वर्ष अटकेत होत्या. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात लढा देऊन देशात लोकशाही प्रस्तापित करण्यासाठी त्यांचा लढा जागतिक पातळीवरही गाजला. जुलूमी राजवटीविरोधात शांतीपूर्ण मार्गाने त्यांनी आंदोलन केलं.
2015 च्या निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवूनसुद्धा त्यांची मुलं परदेशी नागरिक असल्याने म्यानमारच्या राज्यघटनेनुसार त्यांना राष्ट्राध्यक्ष होता आलं नाही. पण, 75 वर्षांच्या सू ची यांच्याकडे म्यानमारचा नेता म्हणून पाहिलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
म्यानमारमध्ये त्यांची ओळख स्टेट काउन्सिलर म्हणून होती. त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी विन माईंट म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष होते.
साल 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत, सू ची यांच्या पक्षाला 2015 पेक्षा जास्त मतं मिळाली.
पण, लष्कराने निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. म्यानमार संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दिवशीच लष्कराने सू ची आणि इतर नेत्यांना अटक केली.
देशात आपात्कालीन परिस्थिती अंतर्गत एक वर्षासाठी सत्ता लष्कराकडे सूपूर्द करण्यात आली.
कोण आहेत सू ची?
सू ची म्यानमारच्या स्वातंत्र्य लढ्याचे हिरो जनरल अंग सान यांच्या कन्या आहेत.
सू ची फक्त दोन वर्षांच्या असताना जनरल अंग सान यांची हत्या करण्यात आली होती. म्यानमारला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर त्यांची हत्या झाली.
सू ची 1960 मध्ये आईसोबत भारतात आल्या. त्यांची आई भारतात म्यानमारच्या राजदूत होत्या.
त्यानंतर चार वर्षांनी त्या लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या. त्यांनी फिलॉसॉफी, राजकारण आणि अर्थकारणाचा अभ्यास केला. त्याठिकाणी त्यांची भेट त्यांचे भावी पती मायकल एरिस यांच्यासोबत झाली.
जपान, भूतानमध्ये काम केल्यानंतर त्या आपल्या दोन मुलांसोबत इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. पण, म्यानमार त्यांच्या मनातून कधीच गेला नाही.
आईची तब्येत खालावत असल्याने सू ची 1988 साली यंगूनमध्ये परतल्या. त्यावेळी म्यानमारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत होती.

फोटो स्रोत, AFP
बौद्ध धर्मगुरू, विद्यार्थी आणि सामान्यांनी लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात सुरूवात केली.
"सद्यपरिस्थिती पाहाता मी वेगळी राहू शकत नाही," असं म्हणत सू ची यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल ने विन यांच्याविरोधात बंड पुकारलं.
घरातच अटक
अमेरिकेतील मानवी हक्कांचे पुरस्कर्ते मार्टिन लूथर किंग आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वांनी सू ची प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला. लोकशाही आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी भर दिला.
पण, लष्कराने आंदोलन दडपून टाकलं. 18 सप्टेंबर 1988 साली लष्कराने सत्ता उलथून टाकली. सू ची यांना त्यांच्या घरी अटक करण्यात आली.

फोटो स्रोत, AFP
लष्करी राजवटीच्या सरकारने 1990 मध्ये निवडणूक जाहीर केली. सू ची यांच्या पक्षाने निवडणूक जिंकली. पण, लष्कराने सत्ता हस्तांतरण करण्यात नकार दिला.
सू ची यंगूनमध्ये सहा वर्ष घरात अटकेत राहिल्या. त्यानंतर जुलै 1995 ला त्यांना मुक्त करण्यात आलं.
सप्टेंबर 2000 मध्ये त्यांना मंडालेला प्रवास करताना पुन्हा अटक करण्यात आली.
मे 2002 मध्ये त्यांची बिनशर्त सुटका करण्यात आली. पण, एका वर्षातच सू ची यांचे कार्यकर्ते आणि सरकार यांच्या झालेल्या झटापटीनंतर पुन्हा त्यांना अटक करण्यात आली.
त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पण, घरात अटकेत ठेवण्यात आलं.
घरात कैदेत असताना त्यांना पक्षाचे नेते आणि काही अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी होती. पण, सुरुवातीला त्यांना एकटं ठेवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांना त्यांची मुलं आणि पतीला भेटण्यासाठी परवानगी नव्हती.
एप्रिल 2012 मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 45 पैकी 43 जागा जिंकल्या. सू ची खासदार झाल्या आणि विरोधीपक्ष नेत्या सुद्धा.
त्यानंतर मे महिन्यात पहिल्यांदा 24 वर्षांनी त्यांनी म्यानमार सोडलं. या विचाराने की नवीन सरकार त्यांना परतण्याची परवानगी देईल.
रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न
म्यानमारच्या स्टेट काउन्सिलर झाल्यानंतर, रोहिंग्या मुसलमानांना देण्यात आलेल्या वागणुकीबाबत त्यांचं नेतृत्व चर्चेत राहिलं.
साल 2017 मध्ये लष्कराच्या कारवाईनंतर हजारो रोहिंग्या मुसलमान पळून बांग्लादेशमध्ये आले.

रोहिंग्या मुसलमानांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात म्यानमारवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरू आहे.
सू ची यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देणाऱ्यांनी त्यांच्यावर या प्रकरणी काहीच न केल्याचा आरोप केला. बलात्कार, खून यांच्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं नाही.
पण, म्यानमारमध्ये सू ची अजूनही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत.
सत्तेत असताना सू ची यांच्या सरकारवर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी टीका झाली.
म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली असली. तरी, संसदेतील 25 टक्के जागा लष्कराच्या ताब्यात आहेत. तर, महत्त्वपूर्ण मंत्रालयं लष्कराकडेच आहेत.
अमेरिकेचे माजी राजदूत डेरेक मायकल बीबीसीशी बोलताना सांगतात, "आँग सान सू ची यांची गोष्ट, त्यांच्यासोबत आपली देखील आहे. त्या बदललेल्या नसतील. पण, त्या खऱ्या कोण आहेत. याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








