You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विकिलिक्सचे ज्यूलियन असांज यांच्या अमेरिका प्रत्यार्पणाला ब्रिटनची मंजुरी
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी विकिलिक्सचे संस्थापक ज्यूलियन असांज यांच्या अमेरिका प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्यूलियन असांज यांना या निर्णयाविरोधात अपील करायचं असेल, तर त्यासाठी 14 दिवसांची मुदत आहे.
या घडामोडींवर विकिलिक्सने ट्विट करून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा माध्यम स्वातंत्र्य आणि ब्रिटनची लोकशाही यांच्यासाठी काळा दिवस आहे. या प्रकरणात ज्यूलियन असांज यांना अमेरिकेत 175 वर्षांची शिक्षा भोगावी लागू शकते."
विकिलिक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलं, "ज्यूलियन असांज यांच्या सुटकेचा मार्ग वेळखाऊ आणि अतिशय अवघड आहे. आज या लढाईचा अंत झाला नाही. तर नव्या लढाईची ही सुरुवात आहे. आम्ही कायद्यानुसार उच्च न्यायालयात धाव घेऊ. आपण एकत्र येऊ, मजबुतीने लढा देऊ. ज्यूलियन असांज यांची कहाणी सर्वांना सांगू."
अमेरिका बऱ्याच काळापासून ज्यूलियन असांज यांच्यावर खटला चालवण्याची मागणी करत आहे. 2010 मध्ये असांज यांची वेबसाईट विकिलिक्सने अमेरिकेन लष्कराचे काही गुप्त दस्तऐवज प्रकाशित केले होते.
सध्या ज्यूलियन असांज हे लंडनच्या कारागृहात कैदेत आहेत. यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये इक्वाडोरच्या उच्चायुक्त कार्यालयात सात वर्षे घालवली होती.
पूर्वी मागणी फेटाळली होती..
लंडनच्या एका कोर्टाने जानेवारी 2021 मध्ये ज्युलियन असांज यांना अमेरिकेत नेण्यास मज्जाव केला होता.
असांज यांची मानसिक स्थिती आणि आत्महत्येची भीती यामुळे कोर्टाने त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या प्रत्यार्पण अपिलाला फेटाळलं होतं.
2010-11 साली हजारो गुप्त दस्तावेज प्रसिद्ध केल्याबद्दल 49 वर्षीय असांज यांचा तपास सुरू आहे.
दस्तावेज प्रसिद्ध करून असांज यांनी आपले कायदे मोडले आहेत असा अमेरिकेचा दावा आहे तसंच त्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे.
या प्रत्यार्पण मागणीला विरोध करत हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं असांज सांगत आहेत.
कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण अपील करू, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
जिल्हा न्यायाधीश वॅनेसा बरायटसर यांनी म्हटलं, "अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीकडे पाहिलं तर असांज आत्महत्या करू शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही."
जर अमेरिकेत ते दोषी आढळले तर त्यांना 175 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांच्यामते त्यांना 4 ते 6 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होणार नाही.
इराक आणि अफगाणिस्तान युद्धाशी संबंधित गुप्त दस्तावेज उघड केल्याचा आरोप असांज यांच्यावर आहे. त्यातून अमेरिकन सैनिकांनी तेथे शोषण केल्याचं स्पष्ट होतं असं असांज सांगतात.
असांज यांनी जामिनाच्या अटींचा भंग केला म्हणून मे 2019मध्ये त्यांना 50 आठवड्यांची शिक्षा झाली. 2012 ते 2019 ते लंडनमधील इक्वेडोरच्या दुतावासात राजकीय आश्रित म्हणून राहिले होते.
एप्रिल 2019मध्ये त्यांना अटक झाली होती.
त्यांच्यावर एका महिलेच्या लैंगिक छळाचा आरोप होता, त्यामुळे अटक होऊन त्यांना स्वीडनकडे त्यांना प्रत्यार्पित करावं लागलं असतं, असे होऊ नये म्हणून त्यांनी एक्वेडोरच्या लंडनस्थित दूतावासात आश्रय घेतला.
पण आता त्यांच्याविरोधातला लैंगिक छळाचा आरोप मागे घेण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)