डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात अमेरिकन काँग्रेसनं कोणतं पाऊल उचललं?

अमेरिकन काँग्रेसनं मंजूर केलेल्या एका विधेयकावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपला नकाराधिकार वापरला होता.

पण अमेरिकन संसदेने या मुद्द्यावर मतदान घेऊन ट्रंप यांचा नकाराधिकारच फेटाळून लावला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या कार्यकाळात असं पहिल्यांदाच घडलं असून हा ट्रंप यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संसदेने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक विशेष सत्र बोलावलं होतं.

तत्पूर्वी, अमेरिकन काँग्रेसच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह' या कनिष्ठ सभागृहातही विधेयकावर आधीच मतदान झालं होतं.

विधेयकानुसार, येत्या वर्षात अमेरिकेच्या सुरक्षा विषयक धोरणावर 740 अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत.

संसदेने नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट (ADAA) या विधेयकाला 81 विरुद्ध 13 मतांच्या फरकाने मंजुरी दिली. अमेरिकेतील संविधानानुसार, राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार फेटाळून लावण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत असणं बंधनकारक आहे. पुरेशा बहुमतामुळे हे विधेयक फेटाळण्यात संसदेला यश आलं.

विशेष म्हणजे अमेरिकन संसदेत सध्या ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाची सत्ता असल्याने ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे अफगाणिस्तान आणि युरोपातील अमेरिकन सैन्याची संख्या कमी करण्याच्या विरोधात आहेत. तसंच विधेयकातील सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी ठरवणाऱ्या तरतुदीही ट्रंप यांना हटवायच्या होत्या.

हे विधेयक मंजूर होईल, अशी खात्री असल्याचं रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल यांनीच चर्चा सुरू होण्याआधी म्हटलं होतं.

अमेरिकन काँग्रेसने हे पाऊल का उचललं?

अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या विधेयकाला कायद्याचं स्वरूप मिळण्यासाठी राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असते.

काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये राष्ट्राध्यक्ष विधेयकावर स्वाक्षरी करण्यास नकार देऊ शकतात. याला 'व्हेटो पॉवर' (नकाराधिकार) असंही संबोधलं जातं. धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद असतील, तर असं घडताना दिसू शकतं.

पण संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमत मिळालं तर विधेयक मंजूर होऊ शकतं. या फरकाने बहुमत मिळालं असेल तर राष्ट्राध्यक्षांचा व्हेटोपण फेटाळता येऊ शकतो.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी या विधेयकावर नकाराधिकार वापरल्यामुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आल्याचं अमेरिकन काँग्रेसमध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या सर्वात बलाढ्य नेत्या आणि हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांनी म्हटलं होतं.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी बुधवारी (30 डिसेंबर 2020) या विधेयकावर आपला नकाराधिकार वापरला होता. त्यांच्या सल्लागारांनी या विधेयकाविरुद्ध जाऊ नका, असा इशाराही त्यांना दिला होता, हे विशेष.

डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या कार्यकाळात 8 विधेयकांवर आपला नकाराधिकार वापरला होता. हे सगळे नकाराधिकार प्रभावी ठरले होते. पण यंदाच्या वेळी मात्र त्यांचा व्हेटो फेटाळण्यात आला आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा कार्यकाळ 20 जानेवारी 2021 रोजी संपत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)