You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जो बायडन यांच्या पायाला कुत्र्याशी खेळताना दुखापत, 'वॉकिंग बूट'च्या वापराची शक्यता
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती त्यांच्या डॉक्टांनी दिली आहे.
शनिवारी आपल्या 'मेजर' नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले.
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नेवार्कमधील अस्थिरोगतज्ज्ञांकडे जाऊन उपचारही घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अॅम्ब्युलन्समधून नेण्यात आलं.
बायडेन यांचे डॉक्टर केविन ओकॉर्नर म्हणाले, "प्राथमिक एक्स-रे मध्ये फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलेलं नाही. पण वैद्यकीय तपासणीसाठी सीटी स्कॅन करण्यात येणार आहे."
"त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये जो बायडन यांच्या उजव्या पायाला 'हेअरलाईन' फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलं," अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बायडन यांचे डॉक्टर केविन ओकॉर्नर पुढे म्हणतात, "पुढील काही आठवडे बायडन यांना चालण्यासाठी 'वॉकिंग बूट'चा वापर करण्याची गरज असल्याची शक्यता आहे."
जो बायडन यांना दुखापत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी "लवकर बरे व्हा" असं ट्वीट केलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव केल्यानंतर, बायडन यांना सोमवारी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे.
ट्रंप सरकारकडून अमेरिकेची सूत्र बायडन यांच्याकडे देण्यासाठी अमेरिकेत हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली आहे.
78 वर्षांचे जो बायडन अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. 20 जानेवारीला ते राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतील. मात्र, जो बायडन यांच्या तब्येतीवर त्यांच्या पक्षातील नेते आणि विरोधकांची नजर रहाणार आहे.
"बायडन यांची तब्येत उत्तम आहे. ते राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी सुदृढ आहेत," अशी माहिती त्यांच्या डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात दिली आहे.
जो बायडन यांच्यासोबत त्यांचे जर्मन शेफर्ड जातीचे दोन कुत्रे, मेजर आणि चॅम्प देखील व्हाईट हाऊसमध्ये येतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)