कोरोना लस : फायझरच्या लशीला युकेत मान्यता, पुढच्या आठवड्यात वापर सुरू

फायझर - बायोएनटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आलीय. कोव्हिड 19वरच्या एखाद्या लशीला मान्यता देणारा युनायटेड किंग्डम हा जगातला पहिला देश ठरलाय.

कोव्हिडपासून 95% पर्यंत संरक्षण देणारी ही लस वापरासाठी सुरक्षित असल्याचं युकेच्या औषध नियामक - MHRA ने म्हटलंय.

या लशीला मान्यता मिळाल्याने आता 'हाय प्रायॉरिटी' गटांसाठी म्हणजेच कोव्हिड होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांसाठीची लसीकरण मोहीम युकेमध्ये काही दिवसांतच सुरू होऊ शकेल.

फायझर - बायोएनटेकच्या लशीचे 4 कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना ही लस देता येईल.

यापैकी 1 कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत.

10 महिन्यांच्या कालावधीत ही लस विकसित करण्यात आलीय.

दुसरी औषध उत्पादक कंपनी मॉडर्नानं कोरोना व्हायरसच्या लशीच्या व्यापक वापरासाठी अमेरिका आणि युरोपच्या नियामकांकडे मंजुरी मागितली आहे.

नियामक या एमआरएनए लशीच्या ट्रायलशी संबंधित आकडेवारी पाहून ही लस वापरणं सुरक्षित आहे की नाही याचा निर्णय घेईल.

या लशीचा वापर सर्वांवर करण्यासाठी मंजुरी द्यायची की नाही याचाही निर्णय नियामकांकडून घेतला जाईल.

क्लीनिकल चाचण्यांमधून मॉडर्ना लस 94 टक्के सुरक्षित असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

चाचणीचा डेटा

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं विकसित केलेल्या लशीचा आपात्कालीन वापर होऊ शकतो का याची चाचपणी केली जात आहे.

मॉडर्नानं म्हटलं की, त्यांना ब्रिटनकडून लवकरात लवकर परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.

त्यांच्याकडे 30 हजारहून अधिक स्वयंसेवकांच्या चाचणीचा डेटा उपलब्ध आहे. या स्वयंसेवकांमध्यो कोरोना संसर्गाचा धोका असलेले वृद्ध लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.

त्यांच्यावर ही लस परिणामकारक असल्याचं दिसून आलं. या तिन्ही लशींची आपापली खासं वैशिष्ट्यं आहेत.

लशीची प्री-ऑर्डर

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनकानं संयुक्तरीत्या तयार केलेल्या लशीची किंमत मॉडर्ना आणि फायझर लशीच्या तुलनेत कमी आहे.

मॉडर्ना लशीची किंमत 15 डॉलर आहे, तर फायझर लशीची किंमत 25 डॉलर इतकी आहे. अॅस्ट्राझेनकाच्या लशीची किंमत मात्र केवळ तीन डॉलर इतकी आहे.

मॉडर्ना लशीचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं वितरणही खूप सोपं आहे. कारण ही लस अत्यंत कमी तापमानाला साठवून ठेवण्याची गरज नाहीये.

फायझर आणि मॉडर्ना कंपनीची लस चाचणीदरम्यान परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 62 ते 90 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे.

ब्रिटननं तिन्ही कंपनींच्या लशीची प्री-ऑर्डर दिली आहे.

मॉडर्ना- 70 लाख लशी

फायझर- चार कोटी लशी

एस्ट्राझेन्का- दहा कोटी लशी

युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंगमधील बायोमेडिकल टेक्नॉलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अलेक्झांडर एडवर्ड्स यांनी म्हटलं, "ही निश्चितच एक महत्त्वाची बातमी आहे. चाचण्यांची जितकी जास्त आकडेवारी आपल्याकडे असेल, तेवढीच ही लस कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याचा विश्वास निर्माण होईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)