वृद्धांचे आरोग्यः म्हातारपणात मदत करणारे हे रोबोट तुम्ही पाहिलेत का?

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फ्रँक स्वेन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वृद्धांची संख्या वाढते आहे. अशा वेळी त्यांना प्रतिष्ठा जपणारं व स्वतंत्र जीवन जगता यावं यासाठी कमी श्रमात जास्त काम होणारी साधनं उपयुक्त ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर सरकारं व उद्योगविश्व प्रगत तंत्रज्ञानाद्वारे वृद्धांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला पॉला टिंक्लर स्वतःची कारकीर्द नव्या दिशेने नेण्यासाठी तयार होती. असे निर्णय असाधारण नसतीलही कदाचित- पण तिने ज्या वेगाने स्थित्यंतर केलं ते असाधारण होतं. तिने इंग्लंडमधील वर्किंग्टन इथे एका केअररकडून आठवडाभर प्रशिक्षण घेतलं. आणि महिन्याभरात तिने स्वतः केअरर म्हणून काम करायला सुरुवात केली.

तिचं प्रशिक्षण वेगाने झालं, एवढंच नव्हे तर सगळं प्रशिक्षण तिने स्वतःच्या घरातच पूर्ण केलं. "प्रवेशप्रक्रिया ई-मेलद्वारे पार पडली आणि मी माझ्या मूल्यांकनही ऑनलाइनच केलं, त्यानंतर एक मुलाखत झाली आणि संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः डिजीटल होतं," ती सांगते.

युनायटेड किंगडममधील 'सेरा केअर' या कंपनीच्या माध्यमातून तिने हे प्रशिक्षण पूर्ण केलं. 'तंत्रज्ञानाधारित काळजी सेवा पुरवणाऱ्या' या कंपनीची स्वतःची काळजी सेवागृहं नाहीत किंवा अशी काही सेवागृहं या कंपनीद्वारे चालवलीही जात नाहीत.

कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांकरिता घरगुती काळजी-सेवेची तजवीज करता यावी, यासाठी डिजिटल मंच पुरवण्याचं काम ही कंपनी करते. कंपनीशी संलग्न उपलब्ध काळजी-सेवाकर्त्यांमधून आपल्याला अनुरूप व्यक्ती निवडणं ग्राहकांना शक्य असतं. ठरलेल्या वेळी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेऊन आणण्यासाठी 'उबर'चा वापर करणं आणि मागणीनुसार औषधांच्या दुकानातून ग्राहकांना औषधं आणून देणं, अशाही सेवा ही कंपनी पुरवते.

2016 साली स्थापन झालेल्या या संस्थेने आत्तापर्यंत दोन कोटी पौंड (दोन कोटी 60 लाख डॉलर) इतकी गुंतवणूक उभी केली आहे आणि दर महिन्याला सुमारे पाच लाख घरांना केअरर उपलब्ध करून देते. टिंक्लर यांचं घरही यातच येतं.

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

येत्या काळात अशा प्रकारच्या त्वरित सेवा अधिक आवश्यक ठरण्याची शक्यता आहे. युरोपीय संघामध्ये दर पाचांपैकी जवळपास एक नागरिक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे, येत्या दशकांमध्ये ही संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. जगभरात असाच कल दिसतो आहे. जगामधील साठीपलीकडच्या लोकांची संख्या 1980 पासून आतापर्यंत दुप्पट झाली आहे. सध्या जगभरात साठ वर्षांहून अधिक वयाचे एक अब्ज लोक आहेत. 2050 या वर्षापर्यंत ही संख्या आणखी दुप्पट होईल.

या आव्हानाला सामोरं जाताना वृद्ध लोकांच्या सुदृढ व स्वतंत्र आयुष्यासाठी नवीन प्रारूपं घडवावी लागतील. वृद्धांना स्वतंत्रपणे व सुदृढपणे जगता येईल यासाठी सहकार्य पुरवणारं तंत्रज्ञान विकसित करणारी 'सेरा केअर' ही अजूनतरी एकमेव कंपनी आहे.

उदाहरणार्थ, हिअरिंग-एड उपकरणामध्ये आता पडण्याच्या शक्यतेची पूर्वसूचना देणारी सुविधा वाढवण्यात आली आहे. शर्टावर विविध ठिकाणी सेन्सर लावून त्याद्वारे कार्यरत होणारा आल्फ्रेड नावाचा एक आभासी सेवक युरोपीय संघाने विकसित केला. वृद्धांशी संवाद साधून आल्फ्रेड त्यांना दैनंदिन कामकाजात समतोल राखण्यासाठी व व्यायामासाठी सूचना करतो. दरम्यान, 'लीन एम्पावरिंग असिस्टंट' किंवा 'ली' हा रोबोटिक वॉकर तयार करण्यात आला असून तो आभासी सहायक म्हणून आणि अगदी सोबत नाचण्यासाठीही कामाला येतो.

जागतिक वार्धक्य

आपण वृद्ध होत आहोत, ही वस्तुस्थिती या सगळ्या गोष्टींची गरज अधोरेखित करते.

"आज जन्माला येणाऱ्या दर तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती 100 वर्षांपर्यंत जगेल," असं 'सेरा केअर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक बेन मारुथप्पू म्हणतात. "बाजारपेठ वाढत असताना मनुष्यबळ मात्र मर्यादित आहे, हे उद्योगविश्वासमोरचे आव्हान आहे. मागणी पुरवठ्याला ओलांडून गेली आहे- प्रत्येकासाठी पुरेशी काळजी सेवागृहं आपल्याकडे नाहीत." एवढंच नव्हे, तर अनेक लोक निवासाची जागा बदलण्याऐवजी राहत्या घरातच काळजी घेतली जाणं पसंत करतात.

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

सेरा कंपनीने 'मार्था' ही आभासी सहायकही विकसित केली आहे. काळजी घेण्याची सेवा पुरवणाऱ्यांना दैनंदिन कामकाजात 'मार्था' मदत करते. "आमचे ग्राहक व काळजी सेवा कर्मचारी यांच्या गरजा लक्षात घेऊन मार्था तयार करण्यात आली आहे," असं मारुथप्पू सांगतात. "काळजी सेवा कर्मचाऱ्यांना सल्ला घेण्यासाठी जाता येईल असा चॅट-मंच म्हणून मार्थाची सुरुवात झाली. केअरर ज्या ग्राहकांना सेवा देत असतील, त्या संदर्भात मिळवलेल्या पूर्वमाहितीच्या आधारे भविष्यात संबंधित केअररला शिफारसी पुरवणं व सूचना करणं, यांसाठीचा इन्टरफेसही आम्ही तयार केला आहे."

लोकांच्या घरांमध्ये लिडार सेन्सर (असे सेन्सर अनेकदा स्वयंचलित वाहनांवर लावलेले असतात) बसवून चाचणी घेण्यासाठी आयबीएमसोबत सेरा कंपनीने 2019 साली भागीदारी केली होती. एखाद्या घरातील निवासी घरात कितपत फिरतात यासंबंधीचा डेटा हे सेन्सर संकलित करतात आणि महत्त्वाचं म्हणजे संबंधित निवासी खाली पडल्यास त्याबद्दल केअररला संकेत देतात. "ही आठवड्याचे 24 तास दिली जाणारी सुविधा आहे, केवळ केअरर घरी येतील तेवढ्यापुरती ती मर्यादित राहत नाही," असं मारुथप्पू सांगतात.

रुग्णालयांमधील वास्तव्याचा अंदाज बांधून ते टाळणं, हे 'सेरा'चं एकंदरित उद्दिष्ट असल्याचं मारुपुथ्थू सांगतात. आरोग्यविषयक सेवेचा सर्वाधिक संसाधनं वापरणारा घटक रुग्णालयं हा आहे आणि रोगग्रस्ततेलाही त्याने गंभीर हातभार लागतो.

परंतु, कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यासंदर्भात सावधानतेचे इशारेही देण्यात आले आहेत. नफिल्ड कौन्सिल ऑन बायोएथिक्स या एका स्वतंत्र वैद्यकीय सल्लागार गटाने 2018 साली या विषयावर एक विवरणात्मक टिपण प्रकाशित केलं.

संशोधन व वैद्यक क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा वापर होत असल्याबद्दलचं हे टिपण होतं. अशा वापरामुळे वैद्यकीय निर्णयांमधील पारदर्शकता कमी होऊ शकते, रुग्णाच्या खाजगीपणाबद्दलचे प्रश्न उपस्थिती होऊ शकतात आणि सामाजिक वगळणुकीची शक्यताही वाढू शकते, असं या टिपणात नमूद केलं होतं.

चांगल्या तऱ्हेने वृद्धत्वाकडे जाणं

आपण दीर्घ काळ जगतोय, हे सर्वसाधारणतः मान्य केलं जातं, पण ही केवळ अर्धीच कहाणी आहे. गेल्या शतकामध्ये वयाची 80 वर्षं गाठणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, पण 90 ते 100 वर्षं वयापर्यंत जगणाऱ्यांची संख्या त्याच प्रमाणात वाढलेली नाही.

आपण दीर्घकाळ जगत असलो, तरी ती जास्तीची वर्षं सुदृढ अवस्थेतच जातात असं नाही.

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

लोकसंख्येचं सरासरी वय वाढतं त्यानुसार आपल्यापैकी अनेकांना संधिवात, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षाघात, हृदयविकार, श्वसनविषयक आजार आणि अल्झायमर्स व ग्लउकोमा यांसारखे मज्जासंस्था कमकुवत करणारे आजार सातत्याने सतावतात.

आपण एकूण किती वर्षं जगलो हे आपलं आयुर्मान असतं, तर आपण दीर्घकालीन आजाराविना किती वर्षं जगलो हे आपलं आरोग्यमान असतं. प्रत्येकाला आरोग्यमान पुढे न्यायचं असतं. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडम सरकारने 2019 सालच्या औद्योगिक धोरणामध्ये एक "महाआव्हान" जाहीर केलं, त्यानुसार 2035 सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुदृढ आयुष्यात पाच वर्षांची भर घालण्याचं ध्येय ठेवण्यात आलं.

दरम्यान, गुगलच्या गोपनीय 'कॅलिको' ('कॅलिफोर्निया लाइफ कंपनी'चं संक्षिप्त रूप) या प्रकल्पामध्ये गेली सात वर्षं व 2 अब्ज डॉलर खर्च कपेशींरून "लोकांना दीर्घ व सुदृढ जीवन जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या" उपचारांवर संशोधन करण्यात आलं.

या प्रश्नावरील वैद्यकीय उपायांवर बरंच लक्ष देण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, रपामायसिन व मेटफॉर्मिन यांसारखी सेनोलाइट्स म्हणून ओळखली जाणारी औषधं मृतपेशी काढून टाकून शरीराला नवसंजीवनी देऊ शकतात- किमान उंदरांमध्ये तरी हे घडलं. परंतु, अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथल्या बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंग'मधील जैववार्धक्यशास्त्राच्या प्राध्यापिका आणि सिनोलिटिक औषधं तयार करणाऱ्या युनिटी या कंपनीच्या सहसंस्थापक ज्युडी कॅम्पिसी यांनी अधिक आरोग्यसेवेचे काही साधे पर्यायही अस्तित्वात असल्याचं नमूद केलं.

"आहारामध्ये सुधारणा, व्यायाम व सामाजिक संपर्क यातून बराच उपकारक परिणाम होतो," असं त्या म्हणतात. "बौद्धिक आव्हानं देणं, संपर्क किंवा इतर मानसिक कृतीही उपकारक ठरतात."

सामाजिक संपर्क व संवाद कोण साधणार, हा प्रश्न तरीही उरतोच. निवृत्त झालेल्यांच्या तुलनेत एकूण सक्रिय लोकसंख्या रोडावली असताना आरोग्यसेवेसाठी स्वतःच्या कराचा हिस्सा उपलब्ध करून देणाऱ्या लोकांची संख्याही कमी होईल. या सेवा थेट पुरवण्यासाठी डॉक्टर, नर्स, थेरपिस्ट व केअरर यांची संख्याही कमी झालेली असेल. थोडक्यात, संसाधनं व आरोग्याचे अर्थसंकल्प मर्यादित झाले असतानाही गरजूंची संख्या वाढेल.

प्रतिष्ठा जपणारं वार्धक्य असावं यासाठी कमी श्रमात अधिक परिणामकारक कामकाज साधण्याचे मार्ग शोधायला हवेत. ही उणीव भरून काढायला लोक स्वाभाविकपणे तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत.

यांत्रिक साथी

उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममधील 'नेस्टा' या अभिनवतेशी निगडीत विचारगटाने 2018 साली 'स्मार्ट एजिंग' पुरस्कार नॉर्वेतील 'कॉम्प' या टॅब्लेट उपकरणाला दिला- विशेषतः वृद्ध वापरकर्त्यांची सोय होईल अशा रितीने या टॅब्लेटला केवळ एकच बटण ठेवलेले आहे.

गतकालीन दूरचित्रवाणी-संचासारखं रूप असणारा हा टॅब्लेट आहे आणि छायाचित्रांची देवाणघेवाण करण्यासाठी व कुटुंब व मित्रपरिवाराला व्हिडिओ-कॉल करण्यासाठी या टॅब्लेटवर सोपा मार्ग दिलेला आहे.

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

क्वचित प्रसंगी 'फेस-टाइम'सारख्या सुविधा वापरण्याहून अधिक नियमित संपर्काची गरज असणाऱ्या लोकांना आयुष्याच्या संधिकाळात रोबोटच्या रूपातील घनिष्ठ मित्रांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपने तयार केलेला पेपर हा अँड्रॉइड आहे. प्रागमधील 'लाइफ 90' सोशल क्लबमध्ये पाहुण्यांचे मनोरंजन या रोबोटद्वारे केले जात होते- तिथे उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीने या रोबोटचे वर्णन "अतिशय मूर्ख, तरी खूप मजेशीर" असं केलं हतं.

जगभरातील सेवा केंद्रांमध्ये 'पारो' हे रोबोटिक सील मिळतं. ज्येष्ठ व्यक्ती त्याला कुरवाळतात तेव्हा ते म्याव आवाज करतं, स्वतःला गुंडाळून घेतं. अविश्वसनीय वाटावं इतक्या मोहक रूपातलं हे जपानी 'केअरबोट' (बॅटरी चार्ज करण्यासाठी हे सीलचं पिलू साखळीने बांधलेला पॅसिफायर चोखतं) डिमेन्शिआच्या रुग्णांना उपचारांसाठीही उपयुक्त ठरावं अशा रितीने तयार केलेलं आहे. अशा रुग्णांपैकी अनेकांना आपण हातात रोबोट धरलेला आहे, ते जिवंत सील पिल्लू नाही याचीही जाणीव नसते, त्यामुळे ते खरा प्राणी असल्याप्रमाणे त्या रोबोटशी नातं जोडतात.

युरोपीय संघाच्या निधीवर सुरू झालेल्या 'एनरिच्मी' प्रकल्पाद्वारे, स्पेनमधील पाल रोबोटिक्स या कंपनीने तयार केलेले तिआगो रोबोट वृद्धांच्या घरी पाठवण्यात आले.

मोठ्या आकाराचे हे रोबोट चार्ज केल्यानंतर अवजडपणे फिरायला लागत आणि संबंधितांना त्यांच्या ठरलेल्या कामांची व औषधविषयक वेळापत्रकाची आठवण करून देत, व्यायामाचं वेळापत्रक पाळायला मदत करत आणि हरवलेल्या वस्तूही शोधून देतं. पण कुठेतरी हरवलेल्या चाव्या शोधून देण्याची क्षमता त्यांच्यात होतीच, तितकीच त्यांची सोबतही महत्त्वाची ठरली होती.

हा प्रयोग संपला तेव्हा संबंधित घरांमधील लोकांनी नवीन मित्र गमावल्यासारखा शोक केला. रोबोट गेल्याने निर्माण झालेली मोकळी जागा भरून काढण्यासाठी एका घरातील फर्निचरची पुनर्रचना करण्यात आली.

वृद्ध

फोटो स्रोत, Getty Images

अन्तोनिओ कुंग हे फ्रान्सस्थित टायलॉग या अभिनव तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वृद्ध लोकांशी संबंधित रोबोट विकसित करायच्या एका तीन वर्षांच्या प्रकल्पाचं नेतृत्व त्यांनी 2016 साली केलं.

यातून दोन प्रारूपांमधील रोबोट तयार करण्यात आले: एक, बडी- कुत्र्याइतका आकार असलेला "भावनिक सोबत" पुरवणारा भावूक प्राणी, आणि दोन, अॅस्ट्रो- चालायला मदत करणारा जवळपास एटीएम यंत्राइतका मोठा कणखर सहायक.

या प्रकल्पाअंतर्गत अनेक सेवागृहांना भेट देण्यात आली आणि तिथल्या रहिवाशांच्या गरजांना रोबोट अनुरूप कसे ठरतील याबद्दल संवाद साधण्यात आला. "वापरकर्त्यांकडून प्रतिसाद घेऊन त्यांच्या अपेक्षेच्या जवळ जाईल अशी व्यवस्था पुरवता येईल का, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं?" असं कुंग सांगतात. "आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर अजून फारसं काही केलं गेलेलं नाही."

तंत्रज्ञानाद्वारे काय साध्य करता येईल याच्या मर्यादांचं सूचनही कुंग यांच्या संशोधनातून झालं. अॅस्ट्रोबद्दलचा प्रतिसाद उदासीन होता- हा रोबोट खूप मोठा आहे, असं लोक म्हणाले- 'बडी'चं प्रकरण वेगळं होतं. "माणसाप्रमाणे त्यांना चांगलं समजून घेणारा, अधिक सहज वावर असलेला, चांगला तोंडी संवाद साधणारा रोबोट त्यांना हवा होता," कुंग म्हणाले. "त्यांना अधिक मानवी रोबोट हवा होता."

शेवटी, रोबोट इतपतच सामाजिक अलगीकरण रोबोट दूर करू शकतो. सहायक म्हणून रोबोटचं काहीएक स्थान आहे, पण अजून त्यांचा गाभा खेळण्यांचाच आहे, पण तेही उपयुक्त ठरण्याइतपत आहे, असं कुंग सांगतात. त्यांच्या मते, एखाद्या अधिक मुख्यप्रवाही उत्पादनालाच पुरवणी म्हणून वृद्धांची काळजी घेणारा लक्षणीय रोबोट तयार होईल- प्रत्येकाच्या इच्छेइतका तो चांगला असू शकेल.

आपल्या संबंधांच्या गाभ्याशी मानवी संपर्क असतो. "मला माझं नवीन काम अगदी पुरेपूर आवडतंय, हे मी शपथेवर सांगू शकते, आणि यातून खूप संतुष्ट वाटतं," टिंक्लर सांगते. "माझ्या आणि या भागातील 'सेरा'शी संलग्न इतर केअररच्या घराबाहेर उभं राहून आमचे शेजारी टाळ्या वाजवतात आणि आम्ही कुणाच्या सहकार्यासाठी जात असलो की लोक सातत्याने वाटेत थांबवून चहा देऊ करतात किंवा आभार मानतात.

इतर लोकांनाही काळजी पुरवणाऱ्या सेवेचं हे करिअर स्वीकारण्यासाठी असे अनुभव प्रेरणादायी ठरतील, अशी मला आशा आहे."

टिंक्लरसारख्या लोकांची गरज कधीही इतकी तीव्र झाली नव्हती. अमेरिकेत मागणी पूर्ण करण्यासाठी 2025 सालापर्यंत 23 लाख काळजी सेवाकर्ते भरती करून घ्यावे लागतील, तर ऑस्ट्रेलियामध्ये अशा 1 लाख सेवाकर्त्यांची गरज भासेल. इतरही विकसित देशांमध्ये अशाच प्रकारचा तुटवडा भासणार आहे.

ऑनलाइन प्रशिक्षण घेतलेलं व आभासी सहायकांसोबत काम करणारं, तंत्रज्ञानात सक्षम असलेलं मनुष्यबळ, दूरस्थ उपस्थिती असणारे डॉक्टर, सेन्सर लावलेली घरं आणि विश्वासू सोबती ठरणारे रोबोट हे भवितव्य लवकरच वास्तवात येतं आहे.

वेगाने जुन्या होत चाललेल्या जगामध्ये असा बदल लवकरात लवकर व्हायला हवा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)