You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक : निकाल अजून जाहीर का झालेले नाहीत?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातला मुकाबला चुरशीचा होतो आहे.
तर मग अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे?
याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. डोनाल्ड ट्रंप किंवा जो बायडन यांच्यापैकी एकाला विजयी घोषित करता येईल एवढ्या मतांची मोजणी झालेली नाही. कोरोना संकटामुळे अनेक मतदारांनी पोस्टल बॅलट पद्धतीद्वारे मतदान केलं. यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हायला काही दिवसही लागू शकतात.
आणि घोषित झालेल्या निकालाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं तर अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरायला काही आठवडेही लागू शकतात. हे सगळंच विचित्र आणि गुंतागुंतीचं आहे.
काही संकेत?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी उमेदवाराला पॉप्युलर व्होट जिंकण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी उमेदवाराने इलेक्टोरॉल कॉलेज पद्धतीद्वारे बहुमत मिळवणं आवश्यक असतं. इलेक्टोरॉल कॉलेज म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसंख्येनिहाय ठराविक मतं म्हणजेच इलेक्टॉर्स मिळतात.
जर तुम्ही ते राज्य जिंकलंत तर राज्याची मतं तुमच्या मतपेटीत येतात. (हा नियम नेब्रास्का आणि मेइन राज्यांना लागू नाही) अमेरिकेत एकूण 538 अशी राज्यांची मतं आहेत. जो उमेदवार 270 किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळवतो तो राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो.
यंदा विक्रमी मतदान होऊनही, काही महत्त्वाची राज्यं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवू शकतात.
आतापर्यंत डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन हे दोघे ज्या राज्यांमध्ये आघाडीवर असतील अशी शक्यता होती तिथे तशीच परिस्थिती दिसते आहे.
काही निर्णायक ठिकाणी अटीतटीची चुरस पाहायला मिळते आहे.
ज्या ठिकाणी मुकाबला निर्णायक आहे, त्यापैकी काहीठिकाणी पोस्टल बॅलटद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरूच झालेली नाही.
मग निकाल कधी स्पष्ट होणार?
ओहायो आणि फ्लोरिडाच्या मताधिक्यानुसार डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरू आहे तिथे संवेदनशील परिस्थिती आहे. तिथे दोन्ही उमेदवारांसाठी विजयाचा मार्ग बरोबरीचा असू शकतो.
विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया, मिशीगन या राज्यातल्या मतमोजणीकडे लक्ष केंद्रित झालं आहे. विस्कॉन्सिनमध्ये काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. काही ठिकाणी पोस्टल बॅलटद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी सुरू आहे. त्यामुळे निकालासाठी काही दिवस लागू शकतात.
अरिझोना राज्याने 1996 नंतर डेमोक्रॅट उमेदवाराला निवडून दिलेलं नाही. बायडन यांना इथे फायदा होऊ शकतो अशी स्थिती आहे. बायडन यांनी तरुण लॅटिन नागरिकांच्या मतांकडे लक्ष केंद्रित केलं होतं.
नेवाडा, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यांमध्ये काही ठिकाणी कडवी टक्कर पाहायला मिळते आहे तर काही ठिकाणी मतमोजणीला नुकतीच सुरुवात झाली आहे.
एका शब्दात सांगायचं तर?
डोनाल्ड ट्रंप अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत तर जो बायडन यांना ज्या राज्यांमध्ये विजय मिळेल असं वाटलं होतं तिथे जिंकू शकलेले नाहीत. त्यामुळेच अनिश्चिचतता बळावली आहे, आणखी काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे.
त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
जो बायडन म्हणाले, आम्ही जिंकत आहोत. पण संयम ठेवा. डोनाल्ड ट्रंप यांनी रिपब्लिकन पक्षाने निवडणूक जिंकल्याचा दावा केला. निवडणूक प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. पण घोटाळा किंवा फेरफार झाल्याचा पुरावा स्पष्ट झालेला नाही.
आपण थांबावं का?
मतमोजणी प्रक्रियेतले रंजक टप्पे बाकी आहेत.
फ्लोरिडा आणि ओहायो इथली मतं ट्रंप यांच्यासाठी महत्त्वाची आहेत. यामुळे अमेरिकेच्या मध्य पश्चिमकडे लक्ष केंद्रित झालं आहे.
ट्रंप यांचे सहकारी लिंडसे ग्रॅहम हे दक्षिण कॅरोलिनात जेइम हॅरिसन यांच्याविरुद्ध विजयी होतील अशी शक्यता आहे. ग्रॅहम हरू शकतात असं एकाक्षणी चित्र होतं.
क्यूऑन कटाच्या गृहितकाला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या मार्जोरी टेलर ग्रीन यांनी विजय मिळवला आहे.
सिनेटवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्दिष्टाने डेमोक्रॅट्सने अलाबामा राज्य गमावलं आहे, मात्र कोलरॅडो राज्यात रिपब्लिकन पक्षावर आघाडी मिळवली आहे.
वैयक्तिक वापरासाठी मारिजुआनाच्या सेवनाला कायदेशीर परवानगी देण्यात यावी या मागणीकरता अॅरिझोना, न्यूजर्सी आणि साऊथ डकोटा यांनी मतदान केलं आहे.
आता पुढे काय?
निकालाच्या प्रक्रियेत वकिलांचा सहभाग असू शकतो. निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्यास निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ ,असं डोनाल्ड ट्रंप यांनी आधीच सूचित केलं आहे. बायडन यांच्या चमूनेही वकील साथीला असल्याचं म्हटलं आहे.
अनिश्चिततेमुळे अस्वस्थता वाढेल का? निकालासंदर्भात अनिश्चितता नक्कीच आहे मात्र अस्वस्थता वाढीस लागेल की नाही याविषयी इतक्यात बोलणं घाईचं होईल असं अनेक अमेरिकन नागरिकांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)