Ball pen: लेखनाचं वळण कायमचं बदलून टाकणारं स्वस्तातलं 'बॉल-पेन'

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
पूर्वी फाउंटन पेन वैशिष्ट्यपूर्ण ढंगासाठी ओळखले जात, पण ते हाताळायला अवघड आणि वापरायला गैरसोयीचे होते. त्यांची जागा घेण्यासाठी अवतरलेले बॉल-पेन म्हणजे विलक्षण प्रतिभाशक्तीचा नमुना होता. शिवाय, विपुल उत्पादनाच्या युगाशी त्यांची अचूक सांगड बसली.
गिम्बेल्स डिपार्टमेन्ट स्टोअरच्या न्यूयॉर्क शाखेने 29 ऑक्टोबर 1945 रोजी एक नवीन उत्पादन बाजारात आणलं. त्याच धर्तीवर नंतर अब्जावधी उत्पादनं निर्माण झाली.
गिम्बेल्सने पहिल्यांदाच नवीन प्रकारचं शाईचं पेन विक्रीला ठेवलं. या पेनाच्या रचनेकरिता काही दशकं खर्च झाली होती. 'रेनॉल्ड्स इंटरनॅशनल पेन कंपनी'ने तयार केलेल्या या पेनांमुळे फाउंटन पेन वापरणाऱ्यांची गैरसोय दूर होणार होती- शाई गळणं, डाग पडणं, अशा अडचणी संपुष्टात येणार होत्या.
या नवीन बॉल-पॉइंट पेनांमध्ये विशेष घट्ट प्रकारची शाई वापरण्यात आली होती, ती सुकायचीही लवकर आणि तिचे डागही पडायचे नाहीत. अत्यंत कळीचा ठरलेला निबजवळचा फिरता छोटासा बॉल- आणि गुरुत्वशक्ती, यामुळे शाई सतत व स्थिरपणे बाहेर येणं शक्य झालं आणि कागदावर शाईचे भरीव डागही उमटायचे नाहीत.
असं हे नवीन बॉल-पेन वापरताना स्वच्छ राहायचं आणि त्याचा वापर सोयीस्करही होता. पण ते स्वस्त मात्र नव्हतं.
रेनॉल्ड्सच्या या बॉल-पेनाची किंमत 12.50 डॉलर इतकी होती- 2020 सालच्या चलनामध्ये त्याचा हिशेब केला तर 180 डॉलरांहून अधिक होईल. आज आपण एकगठ्ठा पेन विकत घ्यायला गेलो, तर इतक्याच रकमेत एक हजारांहून अधिक बॉल-पेन मिळतील.

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
अमेरिकेत विक्री झालेलं हे पहिलं बॉल-पेन असलं, तरी हे काही पहिलंवहिलं बॉल-पॉइंट पेन नव्हतं. अमेरिकेतलं पेन तयार करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष व्यावसायिक कामासाठी दक्षिण अमेरिकेला गेले असताना, त्यांना अशा प्रकारचं एक पेन तिथे दिसलं होतं.
पण त्यात केलेल्या बदलांमुळे पूर्ण सामर्थ्यानिशी हे पेन वापरात येणं शक्य झालं. अर्थातच प्लास्टिकचा वाढता वापर आणि विपुल उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांसारख्या बाह्य घटकांचा उदयही बॉल-पेनांच्या या क्रांतिकारी डिझाइनला पूरक ठरला.
मोठी झेप आणि मग परत शांतता
बॉल-पेनाच्या निर्मितीचं श्रेय सर्वसाधारणतः हंगेरियन-अर्जेन्टिनियन शोधक लास्लो बायरो यांना दिलं जातं. आधुनिक बॉल-पॉइंट पेनांना सामावून घेणारा शब्दही त्यांच्याच नावावरून आलेला आहे. पण वास्तविक या पेनांचा उदय याहून बराच आधी झाला.
जॉन जे. लाऊड या अमेरिकी व्यक्तीने 1888 साली बॉल-पेनाचं पहिलं पेटंट घेतलं होतं. अमेरिकन वकील असलेले लाऊड अशा प्रकारच्या शोधांमध्ये अधूनमधून रस घेत असत. कागदासोबतच लाकूड आणि चामडं यांसारख्या खडबडीत सामग्रीवरही लिहू शकेल असं शाईचं पेन त्यांना हवं होतं. खोबणीत बसेल असा फिरता छोटा पोलादी बॉल शोधून त्यांनी अशा पेनाच्या शोधासंदर्भात मोठीच झेप घेतली. 1888 साली पेटंटसाठी अर्ज करताना त्यांनी लिहिलं होतं की:
"एका सुधारित शाईसाठ्याचा किंवा फाउंटन पेनाचा शोध मी लावलाय. लाकूड, खरखरीत आवरणांचा कागद इत्यादींसारख्या खडबडीत पृष्ठभागांवर लिहिण्यासाठी सर्वसामान्य पेन उपयोगी पडत नाही, तिथे हे मी शोधलेलं पेन विशेष उपयुक्त ठरतं."
लाऊड यांनी शोधलेलं पेन खरोखरच चामड्यावर आणि लाकडावर लिहीत असे, पण कागदावर ते खूप खरखरीत व्हायचं. या वस्तूला कोणतंही व्यावसायिक मूल्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि अखेरीस हे पेटंटही रद्द झालं.
त्यानंतरच्या दशकामध्ये लाऊड यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न अनेक शोधकांनी केला, पण कोणालाही त्यातून उत्पादनापर्यंतची पातळी गाठता आली नाही. अखेरीस 1930 च्या दशकात बायरो यांनी ही कामगिरी करून दाखवली. हंगेरीत पत्रकारिता करणाऱ्या बायरो यांना स्वाभाविकपणे रोजच फाउंटन पेनांचा वापर करावा लागत असे आणि त्यातल्या कमतरतांची त्यांना चांगलीच जाणीव होती.
"त्यांच्या वापरातलं फाउंटन पेन खूप गळकं होतं, त्यातून हातांवर शाई पसरायची आणि डागही पडायचे. या पेनाने ते खूप त्रस्त झाले होते," लंडनमधील डिझाइन म्युझियमच्या क्यूरेटर गेमा कर्टिन सांगतात.
परंतु, बॉल-पेनामध्ये नुसती फाउंटन पेनाची शाई घालून उपाय साधणार नव्हता. खुद्द शाईचाही पुनर्विचार गरजेचा होता.

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
लास्लो बायरो यांनी यासाठी त्यांचा भाऊ ग्योर्गी यांची मदत घेतली. ग्योर्गी दंतवैद्य होते, पण त्याचसोबत रसायनशास्त्रातही त्यांना उत्तम गती होती. फाउंटन पेनांची शाई सुकायला खूप वेळ जातो, त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये वापरली जाते तशा प्रकारची शाई पेनांसाठी गरजेची आहे, हे लास्लो यांच्या लक्षात आलं होतं. ग्योर्गी यांनी घट्ट शाई बनवली, ही शाई सहज पसरत होती, पण ती सुकायची लवकर. गळक्या, डागपाड्या फाउंटन पेनापेक्षा हे नवीन पेन खूपच कमी शाई खात होतं, हा आणखी एक जमेचा भाग.
"हा विचार आधीही काही लोकांनी केला होता, पण रसायनशास्त्राची चांगली जाण असलेल्या आपल्या भावासोबत लास्लो यांनी अखेरीस अशी चांगला पोत असलेली शाई तयार केली," असं कर्टिन सांगतात. "ही छपाईच्या शाईसारखीच होती, तिचे डाग पडायचे नाहीत."
बॉल-पेनासाठी कळीचं ठरणारं तत्त्व 'रोल-ऑन डिओड्रन्ट'च्या कृतीची नक्कल करणारं आहे- गुरुत्वशक्तीमुळे बॉल फिरतो आणि फिरत्या बॉलसोबत शाईचा सातत्यपूर्ण प्रवाह कागदावर किंवा दुसऱ्या कुठल्या पृष्ठभागावर उतरत जातो. पेन वापरात नसेल तेव्हा तो बॉल शाईसाठ्याच्या टोकाशी घट्ट बसून राहतो, त्यामुळे हवा आत जात नाही आणि शाई सुकत नाही. बहुतेकदा बॉल-पेनांमधली शाई सुकून जाण्याआधी संपून जाते.
लास्लो यांना 1938 साली या नवीन पेनासाठीचं पेटंट ब्रिटनमध्ये मिळालं, पण दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांना स्वतःचा हा शोध बाजारपेठेत उतरवण्यामध्ये अडचणी आल्या. लास्लो व त्यांचा भाऊ ज्यू होते, त्यामुळे 1941 साली त्यांनी युरोपातून बाहेर पडायचा निर्णय घेतला व ते अर्जेन्टिनाला स्थलांतरित झाले. तिथे लास्लो यांनी पुन्हा आपल्या शोधावर काम सुरू केलं. इथे त्यांना दुसरे एक स्थलांतरित जुआन जॉर्ज मेयन यांनी सहकार्य केलं.
युरोप व पॅसिफिकमध्ये युद्ध सुरू असतानाच 1943 साली त्यांनी पहिलं बॉल-पेन सादर केलं. अर्जेन्टिनामध्ये ते 'बायरोम' म्हणून ओळखलं गेलं. या डिझाइनबद्दल रॉयल एअर फोर्सला (ग्रेट ब्रिटनचं हवाई दल) कुतूहल वाटलं, त्यांनी अशा 30 हजार पेनांची मागणी नोंदवली. खूप उंचीवर गेल्यानंतर विमानातल्या व्यक्तींनाही ही पेनं वापरता येत होती. फाउंटन पेनांचा असा वापर शक्य नव्हता, कारण बदलत्या दाबामुळे त्यांच्यातली शाई गळून जायची. ही एक मोठी मागणी वगळता दक्षिण अमेरिकेबाहेर हे पेन फारसं ज्ञात झालेलं नव्हतं- या मूळ प्रारूपातील काही पेनं ऑनलाइन लिलावामध्ये विकली जातात, ती सर्व अर्जेन्टिनातीलच आहेत.

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
इव्हरशार्प आणि एबरहार्ड फेबर या दोन अमेरिकी कंपन्यांनी 1945 साली एकत्र येऊन अमेरिकी बाजारपेठेसाठी एका नवीन पेनाचा परवाना घेतला. उत्तर व मध्य अमेरिकेतील अधिकार घेण्यासाठी त्यांनी त्या काळी जवळपास पाच लाख डॉलर (आजच्या चलनामध्ये 72 लाख डॉलर) खर्च केले. पण उत्पादनापर्यंत पोचण्याबाबत त्यांचा प्रवास संथ होता.
दरम्यान, अमेरिकी उद्योजक मिल्टन रेनॉल्ड्स ब्यूनो एअरीसला गेले होते तेव्हा या नवीन पेनाने ते प्रभावित झाले. त्यांनी तशी अनेक पेनं घेतले आणि अमेरिकेत येऊन त्यांनी 'रेनॉल्ड्स इंटरनॅशनल पेन कंपनी'ची स्थापना केली व नवीन डिझाइनसह असं पेन बाजारात आणलं.
लास्लो बायरो यांच्या पेटंटला वगळून पुढे जाता येईल इतक्या प्रमाणात बदल रेनॉल्ड्सच्या डिझाइनमध्ये झालेले होते. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजारात विक्रीला आलेलं ते पहिलं बॉल-पेन होतं. जवळपास तत्काळच हे पेन अत्यावश्यक वस्तू होऊन गेलं. 'टाइम मॅगझिन'मधील वार्तांकनानुसार, 'प्रत्येकी 12.50 डॉलर किंमतीचं एक नवीन फाउंटन पेन खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्यात 'गिम्बल ब्रदर्स'च्या सुपरस्टोअरमध्ये हजारो लोकांची झुंबड उडाली होती'.
नवीन पेनामध्ये दोन वर्षांतून एकदाच शाई भरावी लागते, असंही या बातमीत नमूद केलं होतं. गिम्बल बंधूंच्या दुकानात 50 हजार नवीन पेनं मागवली होती आणि पहिल्या आठवड्याअखेरीपर्यंत यातील ३० हजार पेनांची विक्री झाली. पहिल्या सहा महिन्यांमध्ये या नवीन पेनाच्या विक्रीतून गिम्बल बंधूंनी 56 लाख डॉलरांहून (2020 च्या हिशेबानुसार आठ कोटी 10 लाख डॉलर) अधिक कमाई केली, असं टाइममध्ये म्हटलं आहे.
बायरो पेन आता अगदी दैनंदिन वापरातली, सहज उपलब्ध वस्तू झालेलं असलं, तरी कधीतरी जरा शांतपणे विचार करून या पेनाच्या कामकाजातील सोपेपणाला व साधेपणाला दाद द्यायला हवी, असं कर्टिन म्हणतात. "प्रत्येकाला प्रिय असलेला हा एक डिझाइनधील मानबिंदू आहे."
बॉल-पेनांच्या पहिल्या पिढीने फाउंटने पेनांच्या शैलीची नक्कल केली. ही सुरुवातीची बॉल-पेनं धातूने बनवलेली असत आणि त्यात शाई पुन्हा भरावी लागत असे. रेनॉल्डच्या पेनाने यामध्ये लक्षणीय झेप घेतली आणि नव्याने शाई न भरता दोन वर्षांपर्यंत लिहीत राहील अशा क्षमतेचं पेन बाजारात आणलं. फाउंटन पेन वापरणाऱ्यांसाठी हे सर्व अकल्पनीयच होतं. फाउंटन पेनांसारखं पुस्तकी उच्च स्थान बॉल-पेनांना लाभलं नसेलही, पण त्या काळी बॉल-पेन म्हणजे अनेकांना हवीहवीशी वाटणारी, पण सहज स्वस्तात न मिळणारी वस्तू होती. लिहिण्यासाठी अगदीच स्वस्तातलं उपकरण हवं असेल तर पेन्सिल वापरावी लागायची.

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
पण यातून एक अडचण निर्माण झाली. 'एव्हरशार्प' आणि फाउंटन पेनांची निर्मिती 'पार्कर' अशा अनेक कंपन्या बॉल-पेनांच्या वेगवान गाडीत येऊन बसल्या आणि बाजारपेठ कुंठित झाली. लोक रिफिली घ्यायचे, पण जास्तीची पेनं घेत नव्हते.
बॉल-पेनांच्या अवकाशाला पूर्णतः बदलून टाकणारी विलक्षण घडामोड मात्र अमेरिकेत नव्हे, तर फ्रान्सला घडली. इटलीत जन्मलेले व फ्रान्समध्ये वाढलेले उद्योजक मार्सल बिख बॉल-पेन निर्मिती करणारी कंपनी चालवत होते. "जास्त परिमाण/कमी खर्च ही विसाव्या शतकाची सक्षम किमया मार्सल बिख यांच्याइतकी इतर कोणाला अवगत झाली नव्हती," असं 'इंडिपेण्डन्ट' या ब्रिटनमधील वर्तमानपत्राने १९९४ साली बिख यांच्यावरील मृत्युलेखात म्हटलं होतं. "या सूत्रामध्ये भर घालून त्यांनी वापरानंतर सहज विल्हेवाट लावता येईल अशी सोय करून दिली. त्यांनी नवीन काहीच शोधलं नव्हतं, पण विपुल उत्पादनांची बाजारपेठ त्यांना अगदी अचूकरित्या आकळली होती."
बॉल-पेन तोवर केवळ खर्चिक उत्पादनांपैकी राहिली होते- त्याला पर्याय म्हणून नियमितपणे बदलता येईल अशा डिझाइनचं उत्पादन काढलं तर ते स्वस्त राहील, हे बिख यांच्या लक्षात आलं. पॅरिसजवळचा एक बंद पडलेला कारखाना बिख यांनी विकत घेतला आमि 'सोसायटे बिक.' अशी नवीन कंपनी सुरू केली. स्वतःचं आडनाव संक्षिप्तरित्या वापरून चटकन ओळख पटेल असं तीन अक्षरांचं व्यापारचिन्ह तयार करावं, असा सल्ला एका जाहिरात अधिकाऱ्याने बिख यांना दिला. त्यानुसार कंपनीने 'बिक बॉय' (Bic Boy) हे व्यापारचिन्ह स्वीकारलं आणि इतर काही नक्षी नसलेलं साधं वर्तुळ खूण म्हणून वापरलं- पेनाच्या टोकाला असलेला धातूचा बॉल सूचित करणारं हे वर्तुळ होतं.
"ब्रिटनमधील सुरुवातीचे बॉल-पेन सुमारे 55 शिलिंगला (2020 च्या किंमतींनुसार 82.50 पौंड किंवा 107.50 डॉलर) मिळत असत," असं कर्टिन सांगतात. "बिक कंपनीचं एक बॉल-पेनं फक्त एक शिलिंग किंमतीचं होतं. कार्यक्षमता आणि किफायतशीरता यांची सांगड यात घातलेली होती."
या नवीन पेनाच्या खुद्द लेखनाच्या कृतीवरही नाट्यमय परिणाम झाला, असं डेव्हिड सॅक्स हे कॅनेडियन पत्रकार नमूद करतात. त्यांनी 'द रिव्हेन्ज ऑफ अॅनालॉग' हे पुस्तक लिहिलं आहे. "बॉल-पेन आजच्या स्मार्ट-फोनसारखंच होतं. त्याआधी लेखन ही स्थितिशील कृती होती, विशिष्ट पर्यावरणात, विशिष्ट प्रकारच्या टेबलावरच ती शक्य होती. अशी पूरक गोष्टी असल्यावरच लिहिणं शक्य व्हायचं.
"बॉल-पेनामुळे कुठल्याही परिस्थितीत लेखन शक्य झालं. बर्फ पडत असताना, पाऊस पडत असताना, एटीव्हीच्या मागे, समुद्रात जहाजामध्ये असताना आणि मध्यरात्रीदेखील मी लिहिलेलं आहे," असं सॅक्स म्हणतात. बॉल-पेनांच्याबाबतीत बॅटरी संपण्याचा काही प्रश्न नाही, त्यासाठी मधेच कुठेतरी चार्जिंगला लावायचा प्रश्न नाही आणि अगदी बारक्याशा खिशातही ही पेनं मावतात. "फक्त शाई संपली तरच हे पेन उपयोगात येत नाही," सॅक्स नमूद करतात.
बॉलपेन हे "खरोखरच थोर डिझाइनचा" एक महत्त्वाचा पैलू दाखवतं- "ते जवळपास अदृश्य होऊन जातं", असं सॅक्स सांगतात. "समजा, बॉलपेन अस्तित्वात नसतं आणि आज 'किकस्टार्टर'सारख्या संकेतस्थळावर त्यासंबंधी काही घोषणा केली, तर ती आत्तापर्यंतची सर्वांत मोठी गोष्ट ठरेल." [किकस्टार्टर हे सर्जनशील उपक्रमांना लोकनिधी संकलित करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणारं एक अमेरिकी संकेतस्थळ आहे].
बिख यांनी उपलब्ध करून दिलेल्या स्वस्तातल्या पेनाला मोठा प्रतिसाद मिळाला, याचं एक कारण उत्पादनतंत्रांमधील बदलांशीही निगडित होतं. प्लास्टिकच्या विपुल उत्पादनतंत्रामुळे नवीन बॉलपेनं अगदी स्वस्त झाली. त्यानंतरच्या दशकांमध्ये ही पेनं अधिकाधिक स्वस्त होत गेली, आणि यासाठी त्यांच्या लेखनक्षमतेबद्दलही काही तडजोड करावी लागली नाही. "बिक कंपनीने तयार केलेला, साधा, स्वस्तातला नमुना 50-60 वर्षांपूर्वीइतकाच आजही परिणामकारक ठरतो," असं सॅक्स सांगतात.
ब्रिटनमधील बाथ स्पा विद्यापीठात सर्जनशील लेखनाचा अभ्यासक्रम चालवणारे लेखक फिलीप हेन्शर यांनी 2012 साली हस्ताक्षरासंबंधी 'द मिसिंग इंक' या नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी बॉल-पेनाची स्तुती केली आहे. बिक कंपनीने स्वस्तात प्रचंड संख्येने उत्पादन करण्याचा मार्ग शोधलाच, शिवाय सुरुवातीपासूनच त्यांनी उत्तम डिझाइनद्वारे मोठी झेप घेतली होती. "काहीच सुधारणा गरजेची नसलेलं उत्पादन असेल- बिकच्या पेनांमध्ये 1960 च्या दशकापासून अगदीच बारीकसारीक बदल झालेले आहेत- तर वरखर्चही बहुतांशाने कमी होतो."
1950 पासून बॉल-पेनांचं उत्पादन करणाऱ्या या बिक क्रिस्टलने अविश्वसनीय संख्येने पेन विकले आहेत: 2006 साली त्यांची विक्री 100 अब्जापर्यंत गेली होती. ही इतकी दैनंदिन वापरातली वस्तू झाली आहे की त्याच्या सामर्थ्यस्थळांकडे सहज दुर्लक्ष होऊ शकतं.

फोटो स्रोत, @BarjaBuenafente/BBC
षट्कोनी आकारामुळे हे पेन पकडायला सोपं जातं, "पुढचा भाग पारदर्शक असल्यामुळे शाई संपत असल्यास चटकन कळतं," असं हेन्शर म्हणतात. पेनाला बारकंसं छिद्र असल्यामुळे आत-बाहेर हवेचा दाब समान राहतो. शिवाय, इतर पेनांमधील दहा सेकंदांमध्ये सुकणाऱ्या शाईपेक्षा या पेनातली शाई दोन सेकंदांमध्ये सुकते. "अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, बिकचं पेन हा इतका निखळ चमत्कार आहे की, आपण त्याबद्दल आता विचारही करत नाही.
"बिक बॉल-पेनाचा आफ्रिकेत कोणता परिणाम झाला, याचाही विचार करता येईल," असं हेन्शर म्हणतात. "ही एक अतिशय आधुनिक वस्तू असल्याप्रमाणे बिक कंपनीने या पेनाचं मार्केटिंग केलं. त्याने आफ्रिकी समाजामध्ये खरोखर परिवर्तन घडवलं. बिक पेन येण्यापूर्वी तिथे लोकांना सहजतेने लिहिण्यासाठी काही मार्ग नव्हता."
1950 पासून विविध उत्पादकांनी तयार केलेल्या अब्जावधी स्वस्त बॉल-पेनांचा आणखी एक मोठा वारसा आहे, पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. वापरून झाल्यावर विल्हेवाट लावण्याची सोय करून दिल्यामुळे बॉल-पेनांनी प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण केला. एकट्या अमेरिकेत दर वर्षी 1.6 अब्जांहून अधिक बॉल-पेन कचऱ्यात टाकलती जातात, असं एक आकडेवारी सांगते.
"ते 100 अब्ज बॉल-पेन अजूनही बहुधा कचऱ्यात पडलेली आहेत," कुर्टिन म्हणतात. बहुतांश वेळा खुद्द पेनाची बॉडी परत-परत वापरता येईल अशा सुस्थितीत असते. "फक्त शाई संपलेली असते किंवा सुकलेली असते, पण आपण सगळं पेनच टाकून देतो. हे अगदीच विचित्र असतं."
बॉल-पेनांच्या उत्पादकांना प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाची जाणीव आहे. बिक कंपनी अनेक पेन 74 टक्के पुनर्निर्मित प्लास्टिकपासून तयार करते. प्लास्टिकच्या पेनांऐवजी रिफिलींचा वापर करण्याला अधिकाधिक उत्पादक प्रोत्साहन देत आहेत. इतर पेन-उत्पादकांनी पेनांसाठी प्लास्टिकऐवजी पुठ्ठा किंवा धातूचा वापर करायला सुरुवात केली आहे- जवळपास सात दशकांपूर्वी सुरुवातीच्या काळातील खर्चिक बॉल पेन धातूचीच असत.
आजच्या डिजिटल अवकाशाला प्राधान्य देणाऱ्या संस्कृतीमध्ये कागदाऐवजी पडद्याचा गवगवा होत असला तरी, स्वस्तातील बॉल-पोन टिकूनच राहील, असा विश्वास सॅक्स व्यक्त करतात. "तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक कालबाह्य तंत्रज्ञानाविषयी बोलतात तेव्हा कधीच ते पेन कालबाह्य झाल्याचं म्हणत नाहीत. अगदी मार्क झकरबर् आणि एलन मस्क यांच्या आसपासही पेनांचा गठ्ठा असणारच."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








