You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिवाळा : थंडीत काळजी घेण्याबाबतचे हे 5 गैरसमज तुमच्याही मनात आहेत का?
- Author, क्लॉडिया हॅमोंड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
थंडीच्या दिवसात शरीर उष्ण ठेवण्यासाठी फार पूर्वीपासून काही उपाय सांगितले जातात. मात्र, ते खरंच उपयोगी आहेत का? त्याने शरीरातली उष्णता खरंच कायम राहते का? अशाच काही पाच उपायांची शहानिशा या लेखात करणार आहोत.
1. हिवाळ्यात पंखा लावू नका
सिलिंग पंखा तर उन्हाळ्यासाठी असतात. हिवाळ्यात फॅन लावायची काय गरज? मात्र, बऱ्याच सिलिंग फॅनमध्ये रिव्हर्स सेटिंग असते. खास हिवाळ्याच्या दिवसांसाठी अशी सोय केलेली असते.
गरम हवा हलकी असते आणि थंड जड. त्यामुळे कमी तापमानााच्या दिवसांमध्ये खोलीतली थंड हवा खाली राहते आणि गरम किंवा उबदार हवा सिलिंगजवळ म्हणजेच वर जाते, हा विज्ञानाचा साधा नियम आहे. विशेषतः उंच सिलिंगच्या घरांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो.
त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये फॅन कमी स्पीडवर रिव्हर्स सेटिंगमध्ये वापरला तर सिलिंगजवळची उबदार हवा खाली येते आणि खालची थंड हवा वर जाते.
मोठमोठी ऑफिसेस हिवाळ्याच्या किंवा थंड तापमानाच्या दिवसांमध्ये उबदार कसं ठेवता येईल, यावर बरंच संशोधन झालं आहे. अशाच एका संशोधनामध्ये आढळून आलं आहे की गोदामांमध्ये पंख्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास विजेचा वापर प्रति मीटर 3 टक्क्यांनी कमी होतो.
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये पंखा वापराबाबत ज्या सूचना येतात त्यात हिवाळ्यात फॅन रिव्हर्स सेटिंगमध्ये वापरण्याची सूचना केलेली असते. मात्र, काहींचं निरीक्षण जरा वेगळं आहे. 2015 साली हॉर्वर्ड विद्यापीठातल्या हॉली सॅम्युलसन यांनी सिलिंग फॅनसंबंधी एक प्रयोग केला.त्यांचा हा प्रयोग प्रकाशित झालेला नाही.
मात्र, या प्रयोगात त्यांना असं आढळलं की हिवाळ्यात फॅन रिव्हर्स सेटिंगवर वापरल्यास सिलिंगजवळची उबदार हवा खाली फरशीपर्यंत येते. याऊलट नॉर्मल सेटिंगवर वापरल्यास सिलिंगजवळची उबदार हवा अगदी फरशीपर्यंत न जाता ती आपल्या खांद्यापर्यंत खेळती राहते. म्हणजेच फक्त पाय उबदार ठेवायचे असतील तर रिव्हर्स सेटिंग वापरा आणि संपूर्ण शरीर उबदार करायचं असेल तर फॅन नॉर्मल सेटिंगवरच वापरा.
इतकंच नाही तर फॅन लो स्पीडपेक्षा मिडियम स्पीडवर वापरल्यास जाास्त चांगले परिणाम मिळत असल्याचंही त्यांना आढळलं.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की मोठ्या खोल्यांमध्ये मध्यभागी सिलिंग फॅन असेल तर हिवाळ्याच्या दिवसात तो मीडियम स्पीडवर वापरल्यास उबदार हवा तर मिळतेच शिवाय विजेचीही बचत होते.
निष्कर्ष : खोलीतली आसन व्यवस्था कशी आहे, यावर पंखा मीडियम ते स्लो स्पीडवर वापरल्याने खोलीत उबदार हवा खेळू शकते.
2. दारूमुळे शरीराची उष्णता कायम राहते
थंडी म्हणजे मद्यप्रेमींसाठी एक पेग रिचवण्याची नामी संधीच. अल्कोहोलमुळे शरीराचं तापमान उष्ण राहतं, असं मानलं जातं. म्हणूनच तर अगदी अठराव्या शतकापासून गिर्यारोहक मोहिमांवर जाताना सोबत अल्कोहोलमिश्रित पेय ठेवतात. इतकंच नाही तर स्किईंग करून आल्यावर अनेकांची पावलं आपोआप बारकडे वळतात.
थंडीने कुडकुडत असताना अल्कोहोलचा एक पेग घेतल्यानेही तुम्हाला उबदार वाटतं आणि हा फरक तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो. मात्र, यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे अल्कोहोल शरीरातलं रक्त त्वचेकडे पाठवतो आणि त्यामुळे अल्कोहोल घेतल्यानंतर चेहऱ्याला हात लावला तर चेहरा उबदार जाणवतो.
यात अडचण अशी आहे की अल्कोहोलमुळे रक्त महत्त्वाच्या अवयवांपाासून दूर जातं आणि त्यामुळे शरीराच्या आतलं तापमान कमी होतं. पण, बाहेर बर्फ पडत असेल आणि थंडीने कुडकुडण्यापेक्षा एक पेग घेतला तर थंडीचा त्रास कमी होतो आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर घरात असाल तर शरीरातल्या आतलं तापमान कमी झाल्याने आतल्या महत्त्वाच्या अवयवांना फार त्रास होत नाही.
मात्र, कडाक्याची थंडी असताना तुम्ही बाहेर असाल तर त्वचेकडे जाणारं रक्त शरीराचं तापमान उष्ण ठेवण्यासाठी पुरेसं नसतं. किंवा तुम्ही खूप दारू पिऊन कडाक्याच्या थंडीत बाहेर पडत असाल तर तेसुद्धा तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानीकारक आहे. कारण अल्कोहोलमुळे कुडकुडणं कमी झाल्याने तुम्हाला शरीर उबदार झाल्याचा केवळ भास होत असतो.
इतकंच नाही तर जास्त दारू प्यायल्याने नीट विचार करता येत नाही. त्यामुळे अंदाज चुकतात आणि अशावेळी अपघात होण्याची शक्यता वाढते. अमेरिकेमध्ये गेल्या दशकभरात हायपोथर्मियामुळे जे मृत्यू झाले त्यातल्या 10% टक्के लोक दारू प्यायले होते, असं आकडेवारी सांगते.
निष्कर्ष : अर्धसत्य. दारूमुळे त्वचेकडे रक्तप्रवाह वाढून शरीर उष्ण झाल्याचा केवळ भास होतो. पण, तुमचं शरीराच्या आतलं तापमान कमी होऊ शकतं. त्यामुळे हायपोथर्मियाची शक्यता बळावते.
3. रेडिएटरवर बसल्याने पाईल्स होतात
खोली उष्ण ठेवण्यासाठीच्या मशीनला जी जाळी असते (रेडिएटर) त्यावर बसल्याने पाईल्स होतात, असाही एक गैरसमज आहे. थंड पृष्ठभागावर बसल्यानेही पाईल्स होत असल्याचा आणखी एक गैरसमज आहे. खरंतर 50% लोकांना आयुष्यात कधीतरी पाईल्सचा त्रास होत असतो.
पाईल्स असणाऱ्यांना थंड पृष्ठभागावर बसल्याने बरं वाटतं. मात्र, उष्ण पृष्ठभागावर बसल्याने पाईल्स होतात किंवा त्याचा त्रास वाढतो, असा कुठलाही पुरावा नाही. उलट आठवड्यातून किमान एकदा कोमट पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना पाईल्स होण्याची शक्यता कमी असते, असं जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळलं आहे. (The study can be found here, but be warned that it contains graphic images).
शास्त्रीयदृष्टीने बघता बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांना पाईल्स होण्याची शक्यता जास्त असते.
निष्कर्ष : रेडिएटर्सवर बसल्याने पाईल्स होत नाहीत. उलट आहारात ताज्या भाज्या, धान्यं, भरपूर पाणी यांचा पुरेसा समावेश केला तर पाईल्सचा त्रास कधीच होणार नाही.
4. ओल्या केसांनी थंडीत बाहेर पडलात तर सर्दी होते
आपल्यापैकी अनेकांच्या आजींनी हे सांगितलं असणार. इतकंच कशाला थंडीत बाहेर पडलात तरीही सर्दी होईल, असं सांगतात. पण, सर्दी ही विषाणू संसर्गामुळे होते. त्यामुळे जोवर सर्दीचा विषाणू तुमच्या शरीरातत जात नाही, तोवर तुम्हाला सर्दी होणार नाही. मात्र, शरीरातली उष्णता कमी झाल्याने तुम्हाला सर्दीच्या विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढते का?
यावर जगभरात बरेच प्रयोग झाले आहेत. प्रयोगात सर्दीच्या विषाणूच्या संपर्कात येण्याआधी सहभागी स्वयंसेवकांच्या शरीराचं तापमान कमी करण्यात आलं. थंडीने कुडकुडणाऱ्या गटातल्या लोकांना सर्दी झाल्याचं काही प्रयोगांमध्ये आढळलं. मात्र, काही प्रयोगांमध्ये तसं काहीही आढळलं नाही.
यूकेतल्या कार्डिक विद्यापीठातील रॉन एकलेस यांनी थोडा वेगळा प्रयोग करून बघितला. या प्रयोगात त्यांनी लोकांना रोजच्या कामाला सुरुवात करण्याआधी 20 मिनिटं गार पाण्यात पाय ठेवायला सांगितले. तर प्रयोगातल्या कंट्रोल ग्रुपला सॉक्स आणि शूज घालून 20 मिनिटं रिकाम्या बादलीत पाय ठेवून बसायला सांगितलं. पाच दिवसांनंतर गार पाण्यात पाय ठेवलेल्या लोकांपेक्षा दुप्पट जणांनी सर्दी जाणवत असल्याचं सांगितलं.
पाय गार किंवा केस ओले असतील तर सर्दी होण्याची शक्यता का वाढते? याचं एक कारण असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा नाक आणि घशातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याचाच अर्थ सर्दीच्या विषाणूशी लढण्यासाठी गरजेच्या असलेल्या पांढऱ्या रक्तपेशी नाक आणि घशात कमी प्रमाणात पोहोचतात.
तर काहींचं म्हणणं आहे की थंडीच्या दिवसात लोक सहसा बाहेर पडत नाहीत. घरात, दुकानांमध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या आतच असतात. त्यामुळे संसर्ग जास्त होतो.
अमेरिकेतल्या एमोरी स्कूल ऑफ मेडिसिनच्या अॅनिस लॉवेन यांनी सर्दीचा विषाणू एका गिनीपिगमधून दुसऱ्यामध्ये कसा संक्रमित होतो, याचा अभ्यास केला. यात त्यांना आढळलं की उष्ण तापमान आणि कमी आर्द्रता असणाऱ्या वातावरणात सर्दीचा विषाणू अगदी सहज आणि वेगाने पसरतो.
निष्कर्ष : अधिक संशोधनाची गरज. थंडीच्या दिवसात ओल्या केसांनी बाहेर पडल्याने सर्दी होते असं नाही. तर तुमच्या शरीरात आधीच हा विषाणू गेला असेल तर थंडीमुळे त्याचा प्रतिकार करणं, तुमच्या शरीरासाठी अवघड असतं.
5. थंडीत टोपी वापरा. कारण सर्वाधिक उष्णता डोक्यातून बाहेर पडत असते.
कडाक्याच्या थंडीत किंवा बर्फ पडत असताना संपूर्ण अंग झाकेल असे उबदार कपडे घालतात. मात्र, डोक्याची विशेष काळजी घेतली पाहिजे का?
यावरही बरंच संशोधन आणि प्रयोग झाले आहेत. कॅनडातल्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबामधले थी पेटेरियस यांनीही यासंबंधी एक प्रयोग केला. या प्रयोगात सहभागी झालेल्यांना त्यांनी अंग कुडकुडू नये, यासाठीचं औषध दिलं. यानंतर त्यांना थंड पाण्यात उतरायला सांगितलं. श्वास घेण्यासाठी त्यांना स्कूबा टँक बसवले होते.
यातल्या काहींना शरीर कोरडे ठेवणारे कपडे, सॉक्स आणि ग्लोव्ज घालण्यात आले तर काहींना केवळ स्विमिंग कॉस्च्युम. काही वेळ त्यांचं डोकं पाण्याच्या वर होतं. तर कधी पूर्णपणे पाण्याखाली.
शरीर कोरडे ठेवणारे कपडे घातल्याने शरीरातली उष्णता बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे डोकं. मात्र, प्रयोगात असं आढळलं की केवळ स्विमिंग कॉस्च्युम घालून पाण्यात उतरलेल्या स्वयंसेवकांच्या तुलनेत त्यांचा हिट लॉस निम्मा होता. याचाच अर्थ डोक्यापेक्षा आपल्या संपूर्ण शरीरातून जास्त उष्णता बाहेर पडत असते.
असं असलं तरी संपूर्ण शरीर उष्णतारोधक केलं आणि केवळ डोकं उघडं असेल तरीही थंडीत शरीराच्या आतली उष्णता झपाट्याने कमी होते. याचं कारण म्हणजे फक्त डोकं उघडं असेल तर आपण कुडकुडत नाही आणि कुडकुडल्याने शरीर उष्ण होतं.
आणखी एक कारण म्हणजे टाळूवर त्वचेच्या अगदी जवळ बऱ्याच रक्तवाहिन्या असतात. थंडीत त्यातलं रक्त थंड होतं आणि तेच रक्त संपूर्ण शरीरात वाहत असल्याने एकूणच शरीरातलं तापमान कमी होतं.
त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उष्ण ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच केवळ डोकंच नाही तर संपूर्ण शरीरभर उबदार कपडे वापरावे.
निष्कर्ष : उष्ण राहण्यासाठी डोक्यावर टोपी घालणं बरोबर आहे. मात्र, डोक्यातून सर्वाधिक उष्णता बाहेर पडते, हे चूक आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)