You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत - पाकिस्तान : 'माध्यमांपेक्षा मोठं टिमकी वाजवणारं आणि सरकारपेक्षा मोठं मदारी कुणी नाही' - ब्लॉग
- Author, वुसअतुल्लाह खान
- Role, बीबीसी हिंदीसाठी, पाकिस्तानहून
आजच्या कुठल्याही सरकारला भले लोकांच्या समस्यांवर उपाय सापडत नसो किंवा लोकांचे प्रश्न त्यांना सोडवता येत नसोत, पण एकाचवेळी पाच चेंडू हवेत भिरकावण्याचं कसब त्यांच्याकडे हवं.
जेणेकरून लोक पायाकडे पाहण्याऐवजी हवेत गोल-गोल फिरणाऱ्या त्या रंगबेरंगी पाच चेंडूंकडे पाहत राहतील आणि त्यांची मान कधी पूर्व, तर कधी पश्चिमेकडे वळत राहील.
जेव्हा ते थकून जातील, तेव्हा त्यांना गाढ झोप लागेल. दुसऱ्या दिवशी उठल्यावर पुन्हा हा खेळ पाहण्यासाठी ते उत्सुकत असतील.
त्यातला एक चेंडू कुणा बनावट शत्रूच्या नावाचा, एक इतिहासातल्या एखाद्या प्रसांगाचा, एक कथित देशद्रोह्यांच्या नावाचा, एक रंगबेरंगी भविष्याचा आणि एक अशा भीतीचा, जो सांगत राहील, आम्ही नसू तर तुम्हीही नसाल!
या सगळ्याचा सारांश असा की, जनता एकाच कुठल्यातरी गोष्टीवर फार विचार करत राहू नये आणि त्यासाठी एखाद्या मालिकेसारख्या घडामोडी प्रत्येकवेळी एक नवा प्रश्न समोर आणून ठेवतात, की आता पुढे काय होईल? पुढच्या एपिसोडमध्ये सीमा विजयला सोडेल की विजय अजयच्या हातून मारला जाईल?
एका एपिसोडमध्ये काळा पैसा आणतील, दुसऱ्या एपिसोडमध्ये 'सबका साथ, सबका विकास', नंतर नोटाबंदी, नंतर पाकिस्तानच्या कुरापती, नंतर कलम 370 रद्द, नंतर नागरिकत्व कुणाला मिळेल कुणाला नाही, नंतर दिल्ली दंगल, नंतर चीन आक्रमण, नंतर रफाल विमान, नंतर राम मंदिराचं उद्घाटन, नंतर सुशांत सिहं राजपूत आत्महत्या आणि नंतर अभिनेता-अभिनेत्री ड्रग्ज घेतात की नाही, याचा शोध.
म्हणजेच, लोकांना श्वासही घेऊ देऊ नका. अन्यथा लोक वास्तवातल्या मुद्द्यांवर विचार करायला लागले तर..!
'आमच्या इथेही असंच सुरू आहे'
गेल्या चार वर्षांचंच बोलायचं झाल्यास, एकामागोमाग एक 'ड्रामा' आहे. इम्रान खान यांचं धरणं, नंतर पनामा लिक्स, नंतर नवाज शरीफनंतर कोण हा प्रश्न, नंतर तौहीने-रिसालत, नंतर इम्रान खान यांचं 'नवीन पाकिस्तान', नंतर बिकट अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी भ्रष्टाचाराच्या नावाने विरोधकांची धरपकड आणि खटले, नंतर माध्यमांवर व्हॉट्सअप किंवा फोनच्या माध्यमातून नियंत्रण, नंतर देशद्रोह नेते आणि पत्रकारांची ट्रोलिंग, नंतर सेनापतींना रात्री कोण भेटतो किंवा नाही याचा ड्रामा, नंतर कराची प्रांत बनेल की नाही याच्या चर्च आणि गिलगीट-बाल्टिस्तानला निवडणुकीआधी की नंतर राज्य बनवावं याच्या चर्चा.
औषधांच्या किंमती अचानक अडीचशे टक्क्यांची का वाढल्याचं कुठल्याच चॅनेलवर दाखवलं जात नाही. वीज गरजेपेक्षा जास्त बनतेय, मग विजेचे दर आभाळाला का टेकले आहेत? आणि सहा-सहा तास वीज का जाते?
पावसात देशातील सर्वांत मोठं शहर असणारं कराची पाण्याखाली का गेलं? आणि पुन्हा असं होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या गेल्या? कायदा-सुवव्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी महिन्याआड अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात आहेत?
कोरोनामुळे जे लाखो तरूण घरात बसले आहेत, त्यांची फी तर आकारली जात आहे, मग शिक्षणाचं काय? यावर कुणीच काही बोलत नाही.
केवळ जनतेला बिनकामाच्या प्रकरणांच्या मागे पळवत ठेवायचं.
अशाने काही वर्षे निघून जातील. त्यानंतर पुन्हा एक नवीन 'ड्रामा' आणि पुन्हा नवीन दिग्दर्शक. जीना इसी का नाम है…
आधी शंका होती, आता विश्वास वाटू लागलाय की, या पृथ्वीवर माध्यमांपेक्षा मोठं टिमकी वाजवणारं आणि सरकारपेक्षा मोठा मदारी दुसरा कुणी नाही!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)