एकदा वापरलेले 3 लाख 20 हजार कॉंडम धुऊन पुन्हा काढले विक्रीला

व्हिएतनाममधील पोलिसांनी तब्बल 3 लाख 20 हजार कॉंडम जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे, हे कॉंडम वापरलेले आहेत.

अवैधपणे या कॉंडमची ग्राहकांना पुनर्विक्री केली जाणार होती, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

या जप्तीचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यातील दृश्यातून आणि स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले कॉंडमचे वजन तब्बल 360 किलो आहे. दक्षिण बिन्ह ड्युआँग प्रांतातल्या एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना वापरलेल्या कॉंडमचा हा साठा सापडला.

या गोदामाची मालकीण असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

या वापरलेल्या कॉंडमना धुऊन पुन्हा मूळ आकार देण्यात आला होता. तसंच, पुनर्विक्रीसाठी पॅकेजमध्ये व्यवस्थित बंद करण्यात आले होते.

व्हिएतनाममधील VTV या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना माहिती दिली की, तिने प्रती कॉंडम 0.17 डॉलर मोजले आहेत. म्हणजे, भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर साधारण 12 ते 13 रुपये प्रती कॉंडम या महिलेने पैसे मोजले होते.

दरम्यान, याआधी अशाप्रकारे वापरलेले नेमके किती कॉंडम विकले गेले आहेत, याची अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)