अमेरिका निवडणूक 2020: डोनाल्ड ट्रंप 'या' पाच कारणांमुळे पुन्हा बनू शकतात राष्ट्राध्यक्ष

जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प
फोटो कॅप्शन, जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत दर चार वर्षांतून एकदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कामगार दिवस साजरा केला जातो. या काळात व्हाईट हॉऊसच्या नवीन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असतो.

पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत आता आघाडी घेतली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला डेमोक्रॅटिक नेते जो बायडन निवडणुकीच्या स्पर्धेत आघाडीवर होते पण गेल्या दहा दिवसांत हा ट्रेंड काहीसा कमी झाला आहे.

फाईव्ह थर्टीएट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, बायडन यांच्या आघाडीत दोन गुणांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला जुलैच्या उत्तरार्धात 40.2 टक्क्यांनी आघाडीवर असलेले राष्ट्राध्यक्ष ट्रंप आता 43.2 टक्क्यांवर आले आहेत.

ट्रंप यांच्या बाजूने ट्रेंड आहे असं सध्यातरी स्पष्ट म्हणाता येणार नाही. पण ट्रंप यांनी जी पावलं उचलली त्याला लोकांनी पसंती दर्शवली आहे असे आकडेवारीनुसार दिसून येते.

राजकीय विश्लेषकांनुसार डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होण्याला पाच महत्त्वाची कारणं असू शकतात.

1. ट्रंर्थकांमधला उत्साह

अमेरिकेत मतदान अनिवार्य नाही आणि म्हणूनच इथे परिस्थिती बदलू शकते. कारण नेत्यांचे काम केवळ मतदारांना आकर्षित करण्यापुरते मर्यादित राहत नाही, तर त्यांना घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी प्रेरित करावे लागते.

अमेरिकेत निवडणूक मंगळवारी असल्याने कामाच्या दिवशी मतदारांमध्ये उत्साह कायम ठेवणे गरजेचे असते.

अमेरिका

फोटो स्रोत, AFP

कोरोना काळात मतदारांना प्रोत्साहन देणे अधिक आव्हानात्मक आहे. कारण कोरोनाचा धोका पत्करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणायचे आहे.

कोरोना काळात मतदानाचा अधिकार बजावणे ही छोटी बाब नाही. म्हणूनच मतदानासाठी ते उत्साही आहेत का असा प्रश्न वारंवार विचारला जातो.

मतदारांमध्ये उत्साह असणं ही एक महत्त्वाची बाब आहे ज्यात ट्रंप समर्थक बायडन यांच्या समर्थकांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत.

जुलै महिन्यात यूगॉव संस्थेने मतदारांना त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ते किती उत्साही आहेत असा प्रश्न विचारला.

तेव्हा बायडन यांच्या 40 टक्के समर्थकांनी उत्साह दाखवला तर ट्रंप यांच्या 68 टक्के समर्थकांनी त्यांना मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

नोव्हेंबरमध्ये मतदान करण्यासाठी कोण तयार आहे असाही प्रश्न संस्थेकडून विचारण्यात आला.

त्यावर 76 टक्के ट्रंप समर्थकांनी ते मतदान करणार असल्याचे सांगितले. 11 टक्के मतदारांनी अद्याप निश्चित नाही असे उत्तर दिले. बायडन यांच्या बाबतीत हे गुणोत्तर 69-16 असे होते.

सीएनएनने ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नोंदणीकृत मतदारांसोबत केलेला एक पोल जाहीर केला आहे. यानुसार, काही राज्यांमध्ये बायडन आणि ट्रंप यांच्यात केवळ एक टक्क्याची तफावत आहे. डेमोक्रटिक पक्षाला 49 टक्के मतदार पसंतकरतात तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने 48 टक्के मतदार आहेत.

कोरोना आरोग्य संकटात प्रचार फेरी करता येत नसली तरी ट्रंप यांच्या समर्थकांनी फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि टेक्ससमध्ये जहाजांची परेड आणि गाड्यांमधून प्रचार केला.

2. ट्रं स्वत: बाहेरील व्यक्ती असल्याचा प्रचार करतात

अलाबामामध्ये राहणारे रॉबर्ट लीड्स म्हणतात, " 2016 पूर्वी मी कधीही मतदान केले नव्हते किंवा राजकारणात रस घेतला नाही. पण ट्रंप आल्यानंतर मला असे वाटले की ते वेगळे आहेत. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मतदान केले आणि त्यांना पाठिंबा दिला. मला संधी मिळाली तर मी त्यांना पुन्हा एकदा मत देईन."

2016 मध्ये ट्रंप यांनी या मतदारसंघातून 62 टक्के मतदान मिळवले होते.

डोनाल्ड ट्रम्प आणि हिलेरी क्लिंटन

फोटो स्रोत, Reuters

रॉबर्ट लीड्स सुतार काम करतात आणि टॅक्सी चालक आहेत. ते अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांनी ट्रंप राजकारणात आल्यानंतर निवडणुकांमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. ट्रंप हे पारंपरिक राजकीय वर्तुळातले नाहीत ही बाब त्यांना भावली.

2016 साठी हे वास्तव महत्त्वाचे होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रंप प्रतिस्पर्धी रिपब्लिकन नेत्यांविरोधात आक्रमक होते.

गेल्या चार वर्षांपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पण आजही ते स्वत: ला बाहेरील व्यक्ती मानतात. अनेकांना असेही वाटते की पारंपरिक राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यात ट्रंप यांना यश आले तर काहींना ते काही विशेष करू शकले नाहीत असेही वाटते.

लीड्स सांगतात, "ते एक व्यावसायिक आहेत. काय करायचे आहे याची त्यांना कल्पना आहे. हिलरी यांच्यासोबत आमचे आयुष्य आणखी बिघडले असते असे मला वाटते."

एक स्थिर राजकीय वर्ग आमच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप ट्रंप यांनी 2019 मध्ये फ्लोरिडाच्या ओरलँडोपासून आपल्या प्रचार मोहीमेची सुरुवात करताना केला होता.

ते म्हणाले, "राष्ट्रवादाच्या आमच्या अजेंड्यावर पहिल्या दिवसापासूनच हल्ला चढवला जात आहे."

2010 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संमेलनात बड्या लोकांची नावे नव्हती. त्यात ट्रंप यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार अशाच लोकांचा सहभाग होता. मी अजूनही बाहेरचा व्यक्ती आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातूनही करण्यात आला.

टी पार्टीचे संस्थापक आणि ट्रंप यांचे समर्थक मायकल जॉन्स सांगतात, "2016 च्या सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाच्या पायापासून ते इतर अनेक समस्या होत्या. बेकायदेशीर स्थलांतरासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी काम केले, पण पक्षाने त्याकडे दुर्लक्षकेले. ट्रंप वगळता आपच्या काळात एकही रिपब्लिकन नेता नाही. ते अतिशय लोकप्रिय आहेत."

रिपब्लिकन पक्षाची परिषद डोनाल्ड ट्रंप यांच्या आवतीभोवती झाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या परिषदेत मात्र माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता.

एकीकडे ट्रंप स्वत: मी बाहेरचा व्यक्ती आहे असा प्रचार करतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मोहिमेत ते बायडन यांना मतदान करू नका असेही आवाहन करतात.

बायडन गेल्या 40 वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. सहा वेळा सिनेटवर निवडून आलेत आणि उप-राष्ट्रपती पदावर आठ वर्ष काम केले आहे. तेव्हा एवढे वर्ष राजकीय जीवनात काम केल्यानंतरही बायडन आपला राजकीय वारसा उभाकरू शकले नाहीत अशी टीका ट्रंप यांनी केली आहे.

3. निवडणुकीत इंटरनेटचा वापर

द न्यूयॉर्क टाईम्समध्ये तंत्रज्ञानाच्या विषयावर लेख लिहिणाऱ्या केविन रॉस यांनी एक इशारा दिलाय. ते सांगतात, "उदारमतवाद्यांनो ऐका, ट्रंप पुन्हा निवडून येणार नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेसबुकवर अधिक वेळ घालवून पाहा."

2016 पासून रॉस राजकीय पक्षांचा सोशल मीडियावरील प्रचार ट्रॅक करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया

फोटो स्रोत, POOL/Getty Images

ते सांगतात, "दररोज फेसबुकवर दहा लोकप्रिय अशा पोस्ट असतात ज्या रिपब्लिक पक्ष, कंजर्वेटिव्ह पक्ष आणि ट्रंप समर्थकांविषयी असतात."

ट्रंप यांचा सोशल मीडियामध्ये असणारा रस जगजाहीर आहे. चार वर्षांपूर्वी स्टीव्ह बॅनन हे त्यांच्या डिजिटल रणनीतीचे समन्वयक होते. ते ब्रेटबार्ट वेबसाईटचे माजी संचालक होते आणि केंब्रिज अॅनालिटिका कन्सल्टिंगशीही संबंधित होते. सोशल मीडिया वापरकर्त्यांचा डेटा राजकीय प्रचारासाठी वापरला अशा कारणाने ही कंपनी चर्चेत आली होती.

या कंपनीने आठ कोटी युजर्सकडून डेटा गोळा केल्याचे 2018 मध्ये फेसबुकने जाहीर केले, ज्यांपैकी सात कोटी अमेरिकन आहेत. चर्चेत आल्यानंतर कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण सोशल मीडियाचाप्रसार आता इतका वाढला आहे की लोकांपर्यंत प्रत्येक माहिती पोहचवणं कठीण काम नाही.

फेसबुकवर "सायलेंट मेजॉरिटी' असण्याचीही शक्यता आहे जी ट्रंप यांना नोव्हेंबरमध्ये विजयाच्या दारापर्यंत पोहचवेल असं रॉस सांगतात.

ट्विटर हे थेट मतदारांशी संवाद साधण्याचे माध्यम मानले जाते. डोनाल्ड ट्रंप ट्विटरवरही प्रचंड सक्रिय असून ते इथेही आपल्या वेगळ्या शैलीत काम करतात. ट्विट करून ते विरोधकांवर निशाणा साधतात, माध्यमांवर टीकाही करतात आणि इथेहीआपला राजकीय प्रपोगंडा चालवतात.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्विटरवर विविध मुद्यांवर ट्विट केले जात आहे.

बायडन यांचे फॉलोवर्स ट्रंप यांच्या तुलनेत दहा पटीने कमी आहेत. ते या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते काही मुद्यांवरच लिहितात.

ट्रंप जगाला वाचवणारे नेता आहेत अशीही चर्चा हल्ली ट्विटरवर होताना दिसते.

इंटरनेटवरील व्हायरल मेसेजेसचा प्रभाव मतदारांवर किती होणार असे ठोस सांगता येणार नाही. पण निवडणुकीच्या रणसंग्रामात इंटरनेट एक प्रमुख हत्यार आहे हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही.

4. आपला अजेंडा पुढे नेत जाणे

'मेलद्वारे मतदान केल्यास फसवणूक होण्याचा धोका असतो.' 'राज्यात हिंसेवर नियंत्रण मिळवता येत नाही.' 'आपल्या समर्थकांना दोन वेळा मतदानाचा हक्क दिला पाहिजे.' 'निवडणुकीआधी कोरोनाची लस येणार', 'निवडणुकीची तारीख मागे केलीपाहिजे.' 'ट्रम्प यांनी या कल्पनाचे स्वागत केले आहे की फेटाळले आहे?' वृत्तपत्रांमधील या हेडलाईन्स.

इकॉनॉमिस्ट पत्रिकाने नुकतेच असे लिहिले की, ट्रंप यांनी पब्लिक डिबेट कशी सुरू करायची हे सिद्ध केले आहे.

गेल्या दोन आठवड्यात त्यांनी शहरी हिंसेच्या मुद्यांवर चर्चा सुरू केली. ट्रम्प यांच्या नॅरेटिव्हनुसार, ब्लॅक लाईव्ह्ज आंदोलनाला नियंत्रणात आणण्यात डेमोक्रेटचे नेता अयशस्वी ठरले.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

डेमोक्रेट पोलिसांच्या निधीतून पैसा काढू इच्छितात असे ट्रंप यांना वाटते. यामुळे गुन्हेगारी वाढून शहरांमधील परिस्थिती हाताबाहेर जाईल असं ते सांगतात.

अशी वक्तव्य करून ट्रंप यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बायडन यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. ते हिंसेचा निषेध करतात आणि त्यांचे सरकार सत्तेत आले तर ते पोलीस निधीतून पैसा काढणार नाहीत.

या चर्चेमुळे आर्थिक मंदी आणि कोरोना आरोग्य संकटावरुन लोकांचे लक्ष हटवण्यात आले. यामुळे अमेरिकेत दोन लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

एका अफ्रिकी अमेरिकन व्यक्तीच्या पाठीत पोलीसांची गोळी लागल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी विस्कोन्सिनमध्ये केनोशाचा दौरा केला. त्यांनी पोलिसांना पाठिंबा दर्शवला आणि निदर्शनादरम्यान ज्या ठिकाणी लूट झाली त्या भागांना भेटी दिल्या.

दोन दिवसांनंतर जो बायडन हेदेखील तिथे गेले आणि त्यांनी पिडित कुटुंबाची भेट घेतली ज्यांना ट्रम्प भेटले नव्हते.

मतदारांवर ट्रम्प यांचा प्रभाव अधिक आहे की बायडन यांचा हे आताच सांगता येणार नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात.

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात पॉलिटिकल कम्यूनिकेशनचे प्राध्यापक मायकल कॉर्नफिल्ड सांगतात, "ट्रंप बातम्यांमध्ये येण्यासाठी अजेंडा तयार करतात हे खरे आहे, पण याचा अर्थ ते निवडणुकीचाअजेंडाही बनवू शकतील असे नाही. बहुतेक मतदार राजकीय बातम्या पाहत नाहीत आणि त्यांना घोषणांचीही माहिती नसते. हे ऑक्टोबर महिन्यात कळू शकेल की लोक त्यांच्या घोषणा किती ऐकतात."

5. सरकारी यंत्रणेवर नियंत्रण

आणखी एक बाब आहे जी राष्ट्राध्यक्ष शर्यतीत असलेल्या ट्रंप यांच्या बाजूने आहे. ती म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड.

सध्याच्या परिस्थितीमध्ये ट्रंप यांचा संबंध या बाबतीत दोन गोष्टींशी आहे. एक म्हणजे कोरोना विषाणूची लस बनवण्याच्या प्रयत्नांना गती देणे आणि कोरोना काळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेलाआपत्कालीन आधार देण्याचा प्रयत्न करणे.

राष्ट्राध्यक्ष या नात्याने त्यांनी अल्पावधीतच पत्रकार परिषदा घेऊन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातच विरोधकांवर हल्ला चढवला आहे. या सर्व पत्रकार परिषदा टिव्हीवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आल्या.

व्हाईट हाऊस

फोटो स्रोत, Alamy

एवढेच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाच्या संमेलन दिनी त्यांनी 1500 लोकांसमोर जवळपास एक तास भाषण दिले. हे भाषण त्यांनी व्हाईट हाऊससमोर दिले.

याआधी 1997 मध्ये उपाध्यक्ष अल गोर यांनी व्हाईट हाऊसच्या कार्यालयातून फोन करून निवडणुकीसाठी देणग्या मागितल्या होत्या.

सरकारी यंत्रणेचा वापर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी केला जाऊ शकतो असंही ट्रंप म्हणाले. 2020 मध्ये ट्रम्प यांना मतदारांनी का निवडावे हे सांगण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरली जाऊ शकते असं तेम्हणाले.

"ही काय इमारत आहे?" असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

व्हाईट हाऊसकडे बोट दाखवत ते म्हणाले, "सत्य हे आहे की इथे आम्ही आहोत ते नाही. माझ्या दृष्टीने ही जगातील सर्वांत सुंदर इमारतींपैकी एक आहे. माझ्यासाठी ही केवळ इमारत नाही, माझ्यासाठी हे घर आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)