You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे गरीब आणि श्रीमंत देशांमध्ये वाढली दरी- बीबीसी सर्वेक्षण
कोरोना व्हायरसचा गरीब देशांना जबरदस्त तडाखा बसला आहे, असं बीबीसीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
11 मार्च पासून पुढच्या सहा महिन्यांमध्ये लोकांवर या साथीचा कसा परिणाम झाला हे विविध देशांमधील 30 हजार लोकांच्या सर्वेक्षणातून पाहिलं गेलं.
लॉकडाऊनमुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे आर्थिक फटका हा एक मोठा मुद्दा बनला आहे.
गरीब देश आणि तरुणांना सर्वाधिक झळ
गरीब देशातील जे लोक या सर्वेक्षणात सहभागी झाले त्यांच्यापैकी 69 टक्के लोकांची कमाई रोडावली, तर श्रीमंत देशातील सहभागींपैकी 45 टक्के लोकांच्या कमाईवर परिणाम झाला.
यामध्ये वंश, लिंगानुसारही फरक दिसून येतो. पुरुषांपेक्षा महिलांवर आणि श्वेतवर्णियांपेक्षा कृष्णवर्णियांवर याचा जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी ग्लोबस्कॅनने जून महिन्यात 27 देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं. 27 हजार पेक्षा जास्त लोक यात सहभागी झाले होते.
या साथीचा ढोबळ विचार करायचा झाला तर आपण यात सर्वजण एकत्र आहोत असा अर्थ निघतो असल्याचं ग्लोबस्कॅनचे मुख्य कार्यकारी संचालक ख्रिस कुल्टर यांनी बीबीसीला सांगितले.
जे लोक पूर्वीपासून साधनांपासून वंचित होते त्यांना याची मोठी झळ बसल्याचं यातून दिसतं, असं त्यांनी म्हटलं.
जगातला असमतोल
या साथीमुळे अतिगरीब देशांवर जास्त गंभीर परिणाम झाल्याचं आणि त्या देशांत असणारे सध्याचे प्रश्न अधिक गंभीर झाल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं.
ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे सदस्य देश आणि सदस्य नसणारे देश यांच्यामध्ये मोठा फरक असल्याचं दिसून आलं. OECD गटात जगातले 37 संपन्न देश सहभागी झालेले आहेत.
OECDमध्ये नसलेल्या देशांतील 69 टक्के लोकांवर साथीचा परिणाम झाला आणि OECDमधल्या देशांमध्ये राहाणाऱ्या लोकांपैकी 45 टक्के लोकांवर या कोरोना साथीचा परिणाम झाला असं यातून दिसून आलं.
लॅटिन अमेरिका, आशिया, अफ्रिका इथल्या देशांतील लोकांवर युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लोकांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचं दिसून येतं.
केनियातल्या 91 टक्के, थायलंडच्या 81 टक्के, नायजेरियाच्या 80 टक्के, दक्षिण अफ्रिकेच्या 77 टक्के, इंडोनेशियाच्या 76 टक्के, व्हीएटनामच्या 74 टक्के लोकांच्या आर्थिक स्थितीवर कोरोनाचा परिणाम झाला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ज्या देशांमधील लोकांचं उत्पन्न अत्यंत अल्प होतं त्यांना जास्त फटका बसला आणि ते अधिकच गरीब झाले.
परंतु ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, रशिया, युनायटेड किंग्डममधल्या चांगले उत्पन्न असणाऱ्या लोकांना याचा फटका कमी बसला.
पिढ्यांमधली दरी
या साथीमुळे तरुण आणि वृद्ध यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांपेक्षा आपल्याला या साथीची जास्त झळ बसली, असं तरुण लोक सांगत आहेत. कदाचित कामाच्या कमी झालेल्या संधी, लोकांमध्ये मिसळण्यावर आलेली मर्यादा आणि शिक्षणावर आलेली मर्यादा याचं कारण असावं.
1990 च्या दशकाच्या मध्यापासून 2010च्या सुरुवातीच्या काळापर्यंत जन्मलेल्या म्हणजे जनरेशन झेडपैकी 55 टक्के लोकांनी आणि 56 टक्के मिलेनियअल्स म्हणजे 1980 च्या सुरुवातीपासून 1990 च्या मध्यापर्यंत जन्मलेल्या लोकांनी या साथीचा आपल्यावर परिणाम झाल्याचे सांगितले.
तर जनरेशन एक्स म्हणजे 1965-1980 या काळात जन्मलेल्या लोकांपैकी 49 टक्के लोकांनी आणि बेबी बूमर्स (1946 ते 1964 कालावधीत जन्मलेले) लोकांपैकी 39 टक्के लोकांनी या साथीची झळ बसल्याचं सांगितलं.
जनरेशन झेडपैकी 63 टक्के लोकांनी याची सर्वात वाईट आर्थिक झळ बसल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या कमाईवर परिणाम झाल्याचे सांगितले. तर 42 टक्के बेबी बूमर्सनी कमाईवर परिणाम झाल्याचे सांगितले.
56 टक्के सहभागी बेबी बूमर्सनी कोणताही शारीरिक किंवा आर्थिक अपाय झाला नसल्याचे सांगितले, तर जगभरात 39 टक्के लोकांनी या प्रकारचं मत व्यक्त केलं आहे.
या सर्वेक्षणामधून समोर आलेली इतर माहिती
- प्रत्येक दहा लोकांपैकी 6 लोक (57 टक्के) या साथीचा आपल्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगतात.
- महिलांना पुरुषांपेक्षा जास्त आर्थिक समस्या भेडसावत असल्याचं दिसतं. आर्थिक समस्या भेडसावण्याचं प्रमाण पाहिलं तर जर्मनीत 32 टक्के महिलांवर आणि 24 टक्के पुरुषांवर याचा परिणाम झाला. इटलीत हे प्रमाण 50 आणि 43 टक्के, युनायटेड किंग्डममध्ये 45 आणि 36 टक्के असं आहे.
- अमेरिकेतील 14 टक्के कृष्णवर्णियांनी आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असं सांगितलं तर 7 टक्के श्वेतवर्णियांनी आपल्यालाला अथवा घरातील सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं.
- ज्यांना मुलं आहेत अशा 57 टक्के लोकांना या साथीची झळ बसली तर मूल नसणाऱ्या 43 टक्के लोकांना याची झळ बसली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)