कोरोना व्हायरसवरची लस सर्वप्रथम कुणाला व कधी मिळेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉमिनिक बेले
- Role, बीबीसी न्यूज
कोरोनावरची लस बनवण्याचा प्रयत्न जगभरात सर्वत्र सुरू आहे. पण ही लस बनल्यानंतरची स्थिती काय असेल? सर्वप्रथम कुणाला ही लस देण्यात येईल?
जगातील विविध औषध कंपन्या लशीच्या संशोधनाच्या कामात रात्रंदिवस गुंतल्या आहेत. लस बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. तसंच लस बनवणं, परीक्षण आणि चाचणी यांबाबतचे नियम पुन्हा एकदा नव्याने तयार करण्यात येत आहेत.
जगाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचवण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे यासाठी आवश्यक नियोजन योग्य प्रकारे करावं लागणार आहे. पण लस मिळवण्याच्या स्पर्धेत कमकुवत देशांच्या तुलनेत श्रीमंत देश पुढे असतील का, हा प्रश्नही तज्ज्ञांसमोर आहे.
मग अशा स्थितीत लस सर्वप्रथम कुणाला मिळेल? त्याची किंमत काय असेल? अख्ख्या जगावर हे संकट आलेलं असताना सर्वांना समान पद्धतीने याचं वाटप होईल, याची खात्री कशी पटवली जाईल?
साधारणपणे, कोणत्याही संसर्गजन्य आजारावर लस तयार होण्यासाठी तसंच त्याची चाचणी होऊन वितरण होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. तरीसुद्धा ती लस यशस्वी ठरेल किंवा नाही याची पूर्णपणे खात्रीसुद्धा देता येत नाही.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

आजपर्यंत फक्त एका संसर्गजन्य रोगाचं समूळ नायनाट करण्यात मानवाला यश आलं आहे. तो म्हणजे देवी.
पण देवी रोग पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी तब्बल 200 वर्ष लागली.
बाकी पोलिओ ते धनुर्वात, गोवर, गालगुंड किंवा टीबीपर्यंत आपण लसीकरणासह किंवा त्याशिवाय जगत आहोत.
कोरोनावरची लस कधीपर्यंत मिळू शकेल?
कोव्हिड-19 वरच्या लशीची चाचणी आधीच सुरु करण्यात आली आहे.
संशोधन ते वितरण हा पाच ते दहा वर्षांचा कालावधी काही महिन्यांवर आणण्यात आला आहे. दरम्यान, उत्पादनही करण्यास सुरुवात झाली आहे. प्रभावी लस तयार करण्यासाठी गुंतवणूकदार आणि उत्पादकांनी कोट्यवधी डॉलर्सचा धोका पत्करला आहे.
रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीने सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. रशियामध्ये या कोरोनावरचं लसीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल.

फोटो स्रोत, Getty Images
चीननेसुद्धा कोरोनावरची लस यशस्वीरित्या बनवली. सर्वप्रथम लष्करातील अधिकाऱ्यांना लशीचं वितरण सुरू करण्यात आल्याचं चीनने सांगितलं. पण या दोन्ही लशी इतक्या वेगात कशा बनल्या याबाबत तज्ज्ञ शंका व्यक्त करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तिन्ही टप्पे पूर्ण केलेल्या लशींच्या यादीत या दोन्ही लशींचं नाव नाही. खरंतर लशीची चाचणी मानवावर अधिक व्यापक स्वरुपात घेण्याची आवश्यकता आहे.
यावर्षीच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होईल, असं सांगितलं जात आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लस हाती येण्यासाठी 2021च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते.
ब्रिटनमधील अॅस्ट्राझेनिका कंपनीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेली लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे.
अॅस्ट्राझेनिकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपली उत्पादनक्षमता वाढवली असून एकट्या युकेमध्ये दहा कोटी लशी पुरवणार असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तसंच जगभरात 200 कोटी लशींचं वितरण करण्याची अॅस्ट्राझेनिकाची तयारी आहे.
फायझर आणि बायोएनटेक या कंपन्या mRNA लसीवर काम करत असून यासाठी एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या लशीला ऑक्टोबर महिन्यापर्यंत परवानगी मिळू शकते.

परवानगी मिळाल्यास यावर्षी अखेरपर्यंत दहा कोटी तर 2021 च्या अखेरपर्यंत 130 कोटी लशींचे डोस तयार करण्याची क्षमता निर्माण होईल.
याव्यवतिरिक्त आणखी 20 औषध कंपन्यांच्या लशींच्या वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत.
त्यापैकी सर्वच यशस्वी ठरतील असं नाही. साधारणपणे चाचण्यांच्या 10 टक्के लशी यशस्वी ठरतात. पण यंदाच्या परिस्थितीत या लसींवर चांगल्या पद्धतीने काम होऊन ही टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र लस तयार झाली तरी त्यांना पुढील टप्पे पार करावे लागणार आहेत.
लस निर्मितीतही राष्ट्रवाद
जगभरातील सरकारं लस निर्माण होण्याच्या आधीच आपल्या वाट्याची लस आपल्याला मिळेल यासाठीची तजवीज करताना दिसत आहेत. त्यासाठी ते कोट्यवधी रुपयांचे करारसुद्धा करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, युकेच्या सरकारने सहा संभाव्य कोरोना व्हायरस लशींसाठी मग त्या यशस्वी ठरतील किंवा नाही याचा विचार न करता करार केला आहे. या कराराची किंमतसुद्धा त्यांनी जाहीर केलेली नाही.
कोरोना लशीचे 30 कोटी डोस जानेवारी महिन्यात उपलब्ध होतील, अशी अमेरिकेला अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी गु्ंतवणूक केलेली आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने राज्यांना 1 नोव्हेंबरपासून लशीच्या वितरणासाठी तयार राहा, अशी सूचना केली आहे.
पण अशी तयारी सर्वच देशांनी केली आहे, अशातला भाग नाही.
मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स संस्थेच्या मते, "देशांनी अशा प्रकारे अॅडव्हान्स करार करून लसीच्या वितरणाचे इतर मार्ग बंद करण्याचा प्रकार घातक ठरू शकतो. या माध्यमातून श्रीमंत देशांकडून लस राष्ट्रवादाचा मुद्दा बनवला जाऊ शकतो."
यामुळे गरीब देशांकरिता लस शिल्लक राहणार नाही.
भूतकाळात लशीच्या महागड्या किंमतीमुळे कमकुवत देशातील बालकांना बुब्बुळाच्या आजाराला सामोर जावं लागलं होतं.
डॉ. मारियांगेला सिमाओ WHO मध्ये वैद्यकीय उत्पादन विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मते लस राष्ट्रवादाला आळा घालणं गरजेचं आहे.
सर्व देशांना समान स्वरुपात लस उपलब्ध झाली पाहिजे. फक्त तुमच्याकडे पैसा जास्त असल्यामुळे तुम्हाला लस प्राप्त होईल, असं होऊ नये.
जागतिक लशीबाबत टास्क फोर्स आहे का?
WHO सध्या संसर्गजन्य रोगाशी लढणारी संघटना CEPI, जागतिक लस संघटना GAVI यांच्यासोबत मिळून लसीबाबत कार्यक्रम बनवत आहे.
सुमारे 80 देश या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
2020 च्या अखेरपर्यंत 200 अब्ज डॉलर निधी उभा करण्याचं लक्ष्य त्यांनी निर्धारित केलं आहे.
लसीचं वितरण जगभरात समान पद्धीतीने करण्यासाठी ही कोव्हॅक्स मोहीम उघडली आहे. पण यामध्ये अमेरिकेचा समावेश नाही. अमेरिकेला WHO मधूनही बाहेर पडायचं आहे.
कोव्हॅक्समध्ये निधी जमा करून आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील 92 गरीब देशांमध्ये लस वितरीत करण्यासाठी ही मोहीम आहे.
GAVI संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेथ बर्कले यांच्या मते, जर फक्त श्रीमंत देशांना लशीचा पुरवठा झाला, तर जगाचं संतुलन बिघडेल. आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा वाईट परिणाम होईल.
याचा खर्च नेमका किती?
एकीकडे, कोरोना लस बनवण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे, तर दुसरीकडे ही लस विकत घेण्यासाठी पैसे उभे केले जात आहेत.
लशीच्या प्रकारावर त्याची किंमत अवलंबून आहे.

फोटो स्रोत, Reuters
मॉडर्ना या औषध कंपनीने लशीची संभाव्य किंमत 32 ते 37 डॉलर इतकी ठेवली आहे, तर अॅस्ट्राझेनिकाने या लशीची किंमत नाममात्र असेल, असं म्हटलं आहे.
भारतात लशीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जगातील सर्वात जास्त उत्पादन केलं जात आहे. याला GAVI तसंच बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने निधी पुरवला आहे.
सिरममध्ये बनलेल्या लशीतील दहा कोटी डोस भारतात तसंच विकसनशील देशांनाच पुरवण्यात येतील. त्याची किंमत ३ डॉलरपर्यंत असू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.
पण प्रामुख्याने लसीकरणात लोकांना त्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत.
युकेमध्ये राष्ट्रीय लसीकरण योजनेतून याचं वितरण केलं जाईल.
विद्यार्थी, डॉक्टर, नर्स, डेंटिस्ट आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात येईल.
ऑस्ट्रेलियाने तर देशातील सर्व नागरिकांना लस मोफत देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
लस सर्वप्रथम कुणाला मिळेल?
औषध कंपन्या लस तयार करण्याच्या कामात असल्या तरी लस सर्वप्रथम कुणाला मिळेल हे ते ठरवू शकणार नाहीत.
सर्वप्रथम कुणाचं लसीकरण करण्यात येईल, हे संबंधित देश स्वतंत्रपणे ठरवतील, असं अॅस्ट्राझेनिकाचे कार्यकारी उपाध्यक्ष सर मीन पँगालोस म्हणतात.

फोटो स्रोत, EPA
सुरुवातीला पुरवठा मर्यादित स्वरुपात असेल, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल.
GAVI ने यासाठी एक योजना बनवली आहे. गरीब देशांतील नागरिकांपैकी किमान तीन टक्के लोकांना लस पुरवठा करण्यात येईल, याची दक्षता GAVI संघटनेकडून घेतली जाईल. वैद्यकीय तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सर्वप्रथम लस उपलब्ध करून देण्यात येईल.
लशीचं उत्पादन वाढत जाईल, त्याप्रमाणे 20 टक्के लोकांचं लसीकरण केलं जाईल. यावेळी वयोवृद्ध 65 वर्षांच्या वरील लोकांचं लसीकरण होईल.
त्यानंतर इतरांना ही लस उपलब्ध केली जाऊ शकते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी देशांना 18 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. सुरुवातीची रक्कम 9 ऑक्टोबरपर्यंत भरता येऊ शकते.
श्रीमंत देश आवश्यक पैसे भरून त्यांच्या लोकसंख्येपैकी दहा ते पन्नास टक्के नागरिकांच्या लसीकरणासाठी मागणी करू शकतात. पण सर्वांना समान वाटप झाल्याशिवाय कोणत्याही देशाला 20 टक्क्यांपेक्षा जास्त लस मिळणार नाही, असं सिमाओ यांनी सांगितलं.
लस जगभरात कशी वितरित केली जाणार?
याचं उत्तर कोणती लस यशस्वी ठरते, त्यावर अवलंबून आहे.

फोटो स्रोत, MARKEL REDONDO/ MSF
एक आदर्श लस कोणती? स्वस्त किंमतीत मिळणारी, प्रतिकारशक्ती बऱ्याच काळ वाढवणारी लस या स्थितीत चांगली मानली जाईल. उत्पादन वाढवत असताना त्याचा साठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध हवी.
WHO, UNICEF आणि मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स संस्थेने यापूर्वीच याबाबत कार्यक्रम बनवला आहे. लशीचा साठा करण्यासाठी शीतगृहे, कुलर ट्रक किंवा सोलार फ्रिज यांची मदत घेतली जाईल.
लशीचा साठा करण्यासाठी साधारणपणे दोन ते आठ अंश सेल्सियस तापमान आवश्यक असतं.
विकसित देशांसाठी हे आव्हानात्मक काम नाही. पण गरीब देशांना यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हे काम आव्हानात्मक ठरेल, असं मत MSF संस्थेच्या वैद्यकीय सल्लागार बार्बरा सैत्ता यांनी नोंदवलं.

काही लशी -60 अंश तापमानात साठवण्याची गरज असते. इबोलावरची लस अशाच प्रकारे ठेवण्यात येते, असं बार्बरा यांनी सांगितलं.
सध्या सर्वांनाच लशीची प्रतीक्षा असली तरी केवळ लस हाच कोरोना व्हायरसवरचा उपाय नाही. असं डॉ. सिमाओ यांना वाटतं.
त्यांच्या मते, "आपल्याला आणखी काही काळ सोशल डिस्टन्सिंग, गर्दीची ठिकाणं टाळणं, हात धुत राहणं, यांच्यासारख्या सवयी कायम ठेवाव्या लागतील."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








