कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्याला खरंच यश येत आहे का?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलेघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना कुटुंबातल्या Sarc-CoV-2 या एका नवीन विषाणूची जागतिक साथ आल्याचं जाहीर करून आता जवळपास सहा महिने उलटले आहेत.

30 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ही घोषणा केली होती. त्या दिवशी एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या होती दहा हजार. तर मृतांची संख्या होती जेमतेम 200. शिवाय, यातला एकही मृत्यू चीनबाहेरचा नव्हता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर जग आणि आपल्या सर्वांचंच आयुष्य पूर्णपणे बदललं. कोरोना विषाणू विरुद्ध मानव या लढ्यातली आपली कामगिरी कशी आहे? संपूर्ण जगाचा विचार केला तर चित्र फारसं आशादायक नाही.

कोरोना

जगभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 2 कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर 7 लाखांहून जास्त लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. जागतिक साथीच्या सुरुवातीच्या दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख होण्यासाठी काही आठवडे लागायचे. मात्र, आज अवघे काही तास लागतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बापरे… कोरोनाग्रस्तांची संख्या एकवरून एक लाख होण्यासाठी 67 दिवस लागले. दुसऱ्या 1 लाख केसेससाठी 11 दिवस आणि तिसऱ्या 1 लाख केसेससाठी केवळ 4 दिवस.

जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मार्गारेट हॅरिस माझ्याशी बोलताना म्हणाल्या, "आपण अजूनही वेगाने वाढणाऱ्या, तीव्र आणि अत्यंत गंभीर साथीच्या मध्यात आहोत. जगातल्या प्रत्येक समाजात ही साथ पसरली आहे."

कोव्हिड-19 आजाराचा जगातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळा परिणाम झाला आहे. मात्र, एक बाब सर्वांमध्ये सारखीच आहे. मग ते अमेझॉनच्या जंगलात राहणारे असोत, सिंगापूरच्या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणारे असो किंवा मग युकेत राहणारे असो. हा विषाणू माणसाचा माणसाशी जवळून संपर्क आल्याने फैलावतो. चीनमध्ये विषाणूचा उद्रेक झाल्यापासून ते आजवर हे तथ्य कायम आहे. जेवढे जवळ जाल, तेवढा विषाणू संसर्गाचा धोका वाढतो.

कोरोना
लाईन

लॅटिन अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॅटिन अमेरिका सध्या कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू बनला आहे. शिवाय, भारतातही कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होतो आहे.

यावरूनच हाँगकाँगमध्ये लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये का ठेवलं जात आहे, दक्षिण कोरियात लोकांची बँक खाती आणि मोबाईल फोनवर पाळत का ठेवली जात आहे, लॉकडाऊन उठवण्यात आणि संक्रमण कमी करण्यात युरोप आणि ऑस्ट्रेलियाची दमछाक का होत आहे, या सर्व बाबींचा अंदाज बांधता येऊ शकतो.

लंडनमधल्या सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीमधल्या डॉ. एलिझाबेट्टा ग्रोपेल्ली म्हणतात, "हा विषाणू संपूर्ण पृथ्वीवर पसरतो आहे. आपल्या प्रत्येकावर याचा परिणाम झाला आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो आणि यावरूनच आपण सर्व जोडलेले आहोत, हे अधोरेखित होतं. या विषाणूचा परिणाम केवळ प्रवासावर नाही तर बोलणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे, यावरही झाला आहे."

साधं एकत्र गाणं गायल्यानेही कोरोना विषाणू पसरतो.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

अनेकांमध्ये या विषाणूची काहीच लक्षणं दिसून येत नाही. तर काही जणांमध्ये अतिसौम्य लक्षणं दिसतात. मात्र, काही लोकांसाठी हा विषाणू जीवघेणा ठरतो. त्यामुळे या विषाणूला ट्रॅक करणं अत्यंत अवघड आहे.

डॉ. हॅरिस म्हणतात, "आपल्या काळातला हा परफेक्ट पँडेमिक व्हायरस आहे."

जगात जिथे कुठे कोरोना विषाणूविरोधातल्या लढ्यात यश मिळालं आहे तिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची विषाणूची क्षमताच संपवून ते यश मिळवण्यात आलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूझिलँड. तिथे अजूनही काही मोजके कोरोनाग्रस्त असले तरी या देशाने कोरोना विषाणूच्या फैलावाला बऱ्यापैकी आळा घातला आहे.

या देशाने तात्काळ पावलं उचलली. त्यांनी लॉकडाऊन लागू केला, सीमा बंद केल्या आणि परिणामी आता तिथे खूपच कमी केसेस आहेत. न्यूझिलँडमध्ये आयुष्य बऱ्यापैकी सामान्य झालं आहे.

गरीब राष्ट्रांमध्येसुद्धा काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिल्याने बऱ्यापैकी फरक पडलेला जाणवतो. मंगोलियाची चीनबरोबर खूप मोठी सीमारेषा आहे. चीनमध्येच कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. त्यामुळे मंगोलियामध्ये त्याचा मोठा फटका बसू शकला असता. मात्र, जुलै महिन्यापर्यंत मंगोलियात एकाही कोरोनाग्रस्ताला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज पडली नाही. आजही या देशात केवळ 293 कोरोनाग्रस्त आहेत आणि मृत्यूचं विचाराल तर तिथे एकाचाही मृत्यू कोरोना संक्रमणाने झालेला नाही.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रा. डेव्हिड हेमन म्हणतात, "मंगोलियाने अत्यंत कमी संसाधनांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी घरोघरी जाऊन कोव्हिड-19 आजाराची लक्षणं असणाऱ्यांना वेगळं केलं. त्यांचा कुणाकुणाशी संपर्क आला ती संपर्क साखळी शोधून त्यांनाही विलग केलं. जागतिक साथीची घोषणा होताच त्यांनी तातडीने कारवाई करत शाळा बंद केल्या, आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातले आणि मास्कचा वापर बंधनकारक केला."

तर राजकीय नेतृत्त्वाअभावी अनेक देशांना फटका बसल्याचं प्रा. डेव्हिड हेमन यांचं मत आहे. ते सांगतात अनेक देशांमध्ये राजकीय नेते आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांच्यात संवादच नव्हता. ही परिस्थिती विषाणूच्या फैलावाला सुपिक ठरली.

अमेरिकेचं उदाहरण बघितलं तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्या देशाचे सर्वोच्च संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँन्थोनी फाउसी यांच्यात काहीच ताळमेळ नव्हता. ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनॅरो यांनी तर लॉकडाऊन विरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतला. कोरोना विषाणू साधा फ्लू व्हायरस असल्याचं म्हटलं. इतकंच काय तर जागतिक साथ जवळपास संपल्याचं त्यांनी मार्चमध्येच जाहीर केलं होतं.

एकट्या ब्राझीलमध्ये आज 20 लाख 80 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर एक लाखांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, असे देश ज्यांनी अत्यंत कठोर लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या फैलावावर बऱ्यापैकी आळा घातला त्यांचं म्हणणं आहे की या विषाणूचा धोका अजून टळलेला नाही. थोडंही दुर्लक्ष झाल्यास विषाणू संसर्ग पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे आयुष्य पूर्वपदावर यायला अजून बराच वेळ लागणार आहे.

डॉ. ग्रोपेल्ली म्हणतात, "लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं अनेकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. विषाणूसोबत आयुष्य कसं जगता येईल, याचा विचारच त्यांनी केलेला नाही."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

अशाच देशांपैकी एक आहे ऑस्ट्रेलिया. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडता येईल, यासाठीचे प्रयत्न तिथे सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर व्हिक्टोरिया राज्यात परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर जुलै महिन्यात व्हिक्टोरियाची राजधानी मेलबर्न शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि पूर्वीपेक्षा कठोर निर्बंध लादण्यात आले. सध्या मेलबर्नमध्ये रात्रीची संचारबंदी लागू आहे आणि घराच्या 5 किमी परिघातच ये-जा करण्याची परवानगी आहे.

युरोपातही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी स्पेन, फ्रान्स आणि ग्रीक या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पूर्वीचे विक्रम मोडले आहेत. जर्मनीमध्ये गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

चेहऱ्यावर मास्क बांधणे, पूर्वी विचित्र वाटायचं. मात्र, आज हा सर्वांनाच्याच सवीयचा भाग बनला आहे.

जगभरातल्या देशांच्या या अनुभवांवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भूतकाळात जे यश मिळालं त्यातून भविष्याची गॅरंटी मिळू शकत नाही. कोरोना विषाणूची पहिली लाट यशस्वीपणे थोपवल्यानंतर हाँगकाँगचं जगभरात कौतुक झालं होतं. मात्र, आज तिथले बार आणि जिम पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. तर डिझ्नेलँडला एक महिनाभरसुद्धा पर्यटकांसाठी दरवाजे खुले ठेवता आले नाहीत.

कोरोना

डॉ. हॅरिस म्हणतात, "लॉकडाऊनमधून बाहेर पडणं याचा अर्थ पूर्वीसारखं वागणं, असा होत नाही. हे न्यू नॉर्मल असणार आहे. मात्र, हा संदेश लोकांपर्यंत अजिबात पोहोचलेला नाही."

कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात आफ्रिकेला किती यश मिळालं, हे सांगणं अवघड आहे. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, तिथेही आता दहा लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोव्हिड चाचण्यांचं प्रमाण खूपच कमी आहेत. त्यामुळे तिथलं स्पष्ट चित्र मांडता येत नाही.

मात्र, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकेतला मृत्यूदर खूप कमी आहे आणि हे एक कोडंच आहे. त्यांची काही कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात.

1) आफ्रिका तरुणांचा देश आहे आणि कोव्हिड-19 आजाराचा सर्वाधिक धोका वृद्धांना असतो.

2) कोरोना कुटुंबातल्या इतर विषाणूंची संख्या तिथे जास्त असावी आणि त्यामुळे या विषाणू विरोधातली रोगप्रतिकारकशक्ती आफ्रिकन लोकांमध्ये तयार झालेली असावी.

3) श्रीमंत राष्ट्रांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह या आजारांचं प्रमाण जास्त आहे. असे आजार असणाऱ्यांना कोव्हिडचा धोका जास्त असतो. मात्र, आफ्रिकेत या आजारांचं प्रमाण मुळातच खूप कमी आहे.

काही देशांनी इनोव्हेटिव कल्पना राबवल्या आहेत. रवांडामध्ये हॉस्पिटलला सामुग्री पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. निर्बंधांची माहितीही या ड्रोनच्या सहाय्याने दिली जाते. इतकंच नाही तर नियम मोडणाऱ्यांना पकडण्याचं कामही हे ड्रोन करतात.

मात्र, भारतातले काही भाग, आग्नेय आशिया आणि त्यापुढच्या काही भागांमध्ये लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि सॅनिटायझेशनच्या सुविधाही मिळत नाही. त्यामुळे हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे हा साधा नियम पाळणंही या भागातल्या लोकांना शक्य नाही किंवा वाटतं तितकं सोपं नाही.

डॉ. ग्रोपेल्ली म्हणतात, "असे लोक आहेत ज्यांना हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. मात्र, अनेकजण असेही आहेत ज्यांच्याकडे पाणी नाही. हा एक महत्त्वाचा फरक आहे. या आधारावर आपण जगाची दोन भागात विभागणी करू शकतो. त्यामुळे लसीशिवाय या भागांमध्ये कोरोना विषाणूवर आळा कसा घालता येईल, हा मोठा प्रश्न आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)