You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिंजो आबे यांनी राजीनामा का दिला होता?
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची आज हत्या करण्यात आली आहे.
2020मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.
आपल्या आजारपणामुळे निर्णय खोळंबू नयेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्याबद्दल जपानी जनतेची माफी मागितली होती
शिंजो आबेंना 'अल्सरेटिव्ह कोलायटिस' हा पोटाचा विकार गेल्या अनेक वर्षांपासून होता. पण गेल्या काही काळात आपला आजार बळावल्याचं त्यांनी म्हटलं होतं
शिंजो आबे हे जपानचे सर्वांत जास्त काळ पदावर असणारे पंतप्रधान ठरले होते. त्यांचा सध्याचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2012मध्ये सुरू झाला होता.
त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार, हे ठरेपर्यंत ते पंतप्रधान पदावर राहिले.
अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या याच त्रासामुळे त्यांनी 2007मध्येही त्यांच्या यापूर्वीच्या पंतप्रधान पदाच्या टर्मदरम्यान अचानक राजीनामा दिला होता. कुमारवयापासून आबे यांना हा विकार होता.
या आजारात मोठ्या आतड्याला सूज येते आणि त्याची आग होऊ लागते. त्यावर लहान लहान अल्सर येतात. या सगळ्याचा परिणाम एकूणच पचन संस्थेवर होतो.
जुलैच्या मध्यापासून या आजाराने पुन्हा डोकं वर काढल्याने आपली तब्येत खालावली असल्याचं आबे यांनी म्हटलं होतं. आता या विकारासाठी त्यांना नियमित उपचार घ्यावे लागणार असल्याने पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचंही आबे यांनी म्हटलेलं..
महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून आपण पदावरून पायउतार होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
आबे म्हणाले होते, "यापुढे पंतप्रधान पदावर राहू नये असं मी ठरवलंय. माझ्या कार्यकाळातलं 1 वर्ष उरलेलं असताना आणि कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान, विविध धोरणांची अंमलबजावणी होणं बाकी असताना पद सोडत असल्याबद्दल मी जपानच्या लोकांची मनापासून माफी मागतो."
आबे हे पारंपरिक विचारसरणीचे आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जायचे. जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी अवलंबलेलं आक्रमक आर्थिक धोरण - 'आबेनॉमिक्स' (Abenomics) म्हणून ओळखलं जातं.
पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी जपानची संरक्षण सज्जता मजबूत करत लष्करावरचा खर्च वाढवला पण त्यांना देशाच्या घटनेतलं 9वं कलम बदलण्यात यश आलं नाही. या कलमानुसार स्वसंरक्षाणाच्या हेतूखेरीज इतर कोणत्याही कारणासाठी लष्कर बाळगता येत नाही.
पुढील पंतप्रधानांची निवड होईपर्यंत आपण जबाबदारी पार पाडणार असल्याचं आबेंनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
- कोरोना व्हायरस : चीन ऑस्ट्रेलियावर का नाराज आहे?
- तुर्कस्तानला कुठे सापडला सर्वात मोठा नैसर्गिक वायूसाठा?
- 55 अंश तापमानातसुद्धा माणसं इथं कशी राहातात?
- कोरोनाची पुन्हा लागण झालेल्या जगातल्या पहिल्या माणसानं शास्त्रज्ञांना टाकलं कोड्यात
- 'फिमेल ऑरगॅझम'च्या वेगवेगळ्या कारणांचा पहिल्यांदा शोध घेणारी महिला कोण होती?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)