बैरुत स्फोट: लेबननच्या पंतप्रधानांचा राजीनामा, सरकार पायउतार

फोटो स्रोत, EPA
बैरुतमधील स्फोटानंतर लेबनन सरकार पायउतार झालं आहे. हसन दियाब यांनी लेबननच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्राध्यक्ष मायकल अॅऑन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि सरकार पायउतार होत असल्याची घोषणाही केली.
स्फोटानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं. शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली होती.
लेबननमधील अनेक लोकांनी या स्फोटाला देशातील नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. शिवाय, हलर्जीपणा आणि भ्रष्टाचारामुळे ही घटना घडल्याचाही आरोप करण्यात आला होता.
बैरुत स्फोटातील मृतांचा आकडा 200 वर पोहोचला आहे. तर जवळपास सहा हजार लोक जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Rohan Tillu
तीन दिवसांपूर्वी लेबनन सरकारने दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर केली आहे.
मंगळवारी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास कार्याला वेग आला आहे. बैरुत बंदरावर झालेल्या स्फोटानंतर बंदर अधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
बैरुत बंदरावर गेल्या सहा वर्षांपासून साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेट या अत्यंत स्फोटक रसायनाचा स्फोट होऊन ही भीषण दुर्घटना घडल्याचं राष्ट्राध्यक्ष मायकल अॅऑन यांनी म्हटलं आहे.
राष्ट्राध्यक्षांनी काल तातडीने मंत्रिमंडळ बैठक बोलावून स्फोटाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "काल (मंगळवारी) रात्री बैरूतला ज्या भयंकर आपत्तीचा हादरा बसला, त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. या घटनेने शहराला आपत्तीग्रस्त शहरात बदललं आहे."
युकेमधल्या शेफिल्ड विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी या स्फोटाविषयी बोलताना सांगितलं, "या स्फोटाची तीव्रता दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणूबॉम्बच्या एक दशमांश एवढी होती. इतकंच नाही तर हा इतिहासातला सर्वांत मोठा बिगर-आण्विक स्फोट होता, यात शंका नाही."
स्फोट कसा झाला?
बैरुत बंदरावर 2013 साली एका मालवाहू जहाजातून आलेला अमोनियम नायट्रेटचा हा साठा उतरवण्यात आला होता. तेव्हापासून 2750 टनांचा हा साठा तिथल्याच एका गोदामात पडून होता.
बंदराच्या सुरक्षेच्या दृष्टीने रसायनाचा हा साठा निर्यात करा किंवा तो विकून टाकावा, अशी विनंती आपण वारंवार संबंधित प्रशासनाकडे केल्याचं बैरुत बंदराचे प्रमुख आणि कस्टम चीफ यांनी स्थानिक प्रसार माध्यमांना सांगितलं.
बंदराचे जनरल मॅनेजर हसन कोरायटम स्थानिक OTV शी बोलताना म्हणाले, "कोर्टाने हा साठा इथे ठेवण्यास सांगितलं त्याचवेळी हे स्फोटक रसायन असल्याचं आम्हाला माहिती होती. मात्र, त्याची तीव्रता इतकी असेल, याची कल्पना नव्हती."
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना "जास्तीत जास्त शिक्षा" भोगावी लागेल, असं लेबननच्या सुप्रीम डिफेन्स काउंसिलने म्हटलं आहे.
लेबननचे अर्थमंत्री राओल नेहेम बीबीसीशी बोलताना म्हणाले, "मला वाटतं हे खरोखरंच खराब व्यवस्थापन होतं. मॅनेजमेंट आणि गेल्या सरकारची मोठी जबाबदारी आहे. इतक्या भीषण स्फोटानंतर कोण कशासाठी जबाबदार आहे, यावर मौन बाळगण्याचा आमचा हेतू नाही."
जून 2014 पासून अमोनियम नायट्रेटचा हा साठा हाताळणारे, त्याची सुरक्षा करणारे आणि यासंबंधीची कागदोपत्री कारवाई करण्याचं काम ज्यांनी सांभाळलं अशा सर्वच अधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं जाईल, अशी माहिती लेबेनॉनचे माहिती मंत्री मनल अब्देल समाद यांनी दिली.

फोटो स्रोत, Reuters
2013 साली पूर्व युरोपातल्या मोल्दोव्हा देशाचं रोसेस जहाज अमोनियम नायट्रेटचा हा साठा जॉर्जियावरून मोझांबिकला घेऊन जात असताना जहाजात बिघाड झाल्यानं ते बैरूत बंदरावर थांबलं. अशी माहिती माहिती Shiparrested.com या शिपिंगसंबंधीचे कायदेशीर खटले हाताळणाऱ्या संस्थेने दिली आहे.
बैरुत बंदरावर आल्यानंतर रोसेस जहाजाची झडती घेण्यात आली. बंदर सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली. अखेर जहाजाच्या मालकाने जहाज सोडून दिलं. त्यानंतर जहाज कायद्याच्या कचाट्यात अडकलं. मात्र, जहाजावर स्फोटक रसायनं असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते जून 2014 मध्ये बैरुत बंदरावरच्या एका गोदामात साठवण्यात आलं.
बीबीसीचे अरब अफेअर्स एडिटर सेबेस्टेअिन अशर यांचं विश्लेषण
मंगळवारच्या भीषण स्फोटानंतर मदतकार्यासाठी सामान्य नागरिक स्वतःहून रस्त्यावर उतरले. तर स्फोटाने हादरलेल्या काहींनी शहरातल्या सर्वाधिक प्रभावित भांगांनाही भेट दिली.
सरकारने सखोल आणि पारदर्शी तपासाचं आश्वासन देत लष्कराला अमोनियम नायट्रेटचा एवढा मोठा साठा करणाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचे दिले आहेत.

फोटो स्रोत, EPA
मात्र, बैरुतच्या नागरिकांचा या आश्वासनावर विश्वास नाही. वरिष्ठ नेते दोष ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याची तिथल्या नागरिकांची भावना आहे.
या स्फोटाची जबाबादारी निश्चित व्हायला हवी, अशी जनतेची मागणी आहे. सोशल मीडियावर अनेकांनी जगभरातून देऊ केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत. मात्र, लेबेनॉन सरकारच्या माध्यमातून डोनेशन देऊ नका, असं आवाहनही करण्यात येतंय. लेबेनॉन सरकार पूर्णपणे भ्रष्ट आणि अकार्यक्षम असल्याची टीका सोशल मीडियावरून होत आहे.
बचावकार्य कुठवर पोहोचलं?
स्फोट झाला तिथला मोठा परिसर सुरक्षा दलांनी सील केला आहे. ढिगाऱ्याखाली जखमी किंवा मृतदेह अडकले आहेत का, याचा शोध अजूनही सुरू आहे. तर समुद्रातही जखमी किंवा मृतांचा शोध घेणं सुरू आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत.
लेबेनॉनच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड्स कमी असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री हमद हसन यांनी दिली आहे. तसंच जखमी आणि गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या आवश्यक साधनसामुग्रीचीही कमतरता असल्याचंही ते म्हणाले.
"सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती असल्याचं" हमद हसन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
घटनास्थळापासून जवळच असलेलं सेंट जॉर्ज्स हॉस्पिटलचंही मोठं नुकसान झालं आहे. हॉस्पिटलचे अनेक कर्मचारीही स्फोटात दगावले आहेत. इतकंच नाही तर बैरुतमधले तीन हॉस्पिटल्स पूर्णपणे बंद आहेत आणि दोन हॉस्पिटल्स अंशतः सुरू असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे लेबेनॉनला वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे.
दुसरीकडे स्फोटामुळे बैरूत शहरातल्या मोठ्या इमारतींचं अतोनात नुकसान झालं आहे. इमारतींमध्ये काचेचा खच पडला आहे. तब्बल 3 लाख लोक बेघर झाले आहेत.
बैरूतचे राज्यपाल मारवान अबौद बीबीसीशी बोलताना म्हणाले, "बैरुतला अन्नाची गरज आहे ,बैरुतला कपड्यांची, घरांची गरज आहे. स्फोटामुळे बेघर झालेल्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची गरज आहे."
या भीषण स्फोटानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. फ्रान्सने 55 बचाव कर्मचारी, वैद्यकीय उपकरणं आणि 500 रुग्णांवर उपचारासाठी पुरेल इतके मोबाईल क्लिनिक असलेली तीन विमानं लेबेनॉनला पाठवली आहेत. गुरुवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हेदेखील बैरूतला भेट देणार आहेत.
याशिवाय युरोपीय महासंघ, रशिया, ट्युनिशिया, टर्की, इराण आणि कतार या देशांनीही मदत पाठवली आहे. वैद्यकीय मदत पाठवण्याचीही युरोपीय महासंघाची तयारी आहे.
अमोनियम नायट्रेट
. अमोनियम नायट्रेट कारखान्यांमध्ये सर्रास वापरलं जाणारं रसायन आहे. याचा वापर खतांमध्येही मोठ्या प्रमाणावर करतात.
. मायनिंगम स्फोटासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांपैकी हे एक महत्त्वाचं रसायन आहे.
. अमोनियम नायट्रेट स्वतःहून पेट घेत नाही. आगीच्या संपर्कात आल्यावरच त्याचा स्फोट होतो.
. स्फोटानंतर यातून नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया यासारखे विषारी वायू बाहेर पडतात.
. अमोनिय नायट्रेटचा साठा करण्यासाठी कडक नियम असतात. ज्या जागी या रसायनाचा साठा करण्यात येणार आहे ती जागा फायर-प्रुफ असायला हवी. शिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पाईप, ड्रेनेज किंवा आळे असायला नको.
लेबेनॉनची पार्श्वभूमी
घरच्या आघाडीवर अनेक संकटाचा सामना करत असलेल्या लेबेनॉनच्या अडचणीत स्फोटामुळे आणखी वाढ झाली आहे. लेबेनॉनमध्ये कोव्हिड-19 बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांवरर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स कमी पडत आहेत. स्फोटामुळे या हॉस्पिटल्सवर हजारो जखमींवर उपचार करण्याची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे.

फोटो स्रोत, Rohan Tillu
1975-90 च्या गृहयुद्धानंतर लेबेननवर आर्थिक संकटही ओढावलं आहे. वीज, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांची वाणवा आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.
लेबननमध्ये मोठ्याप्रमाणावर अन्नधान्याची आयात केली जाते. आयात केलेला धान्यसाठा बैरुतच्या बंदरातच साठवण्यात येतो. स्फोटामुळे हा साठाही पूर्णपणे नष्ट झाल्याने येत्या काळात लेबेनॉनच्या जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय, बंदराचं झालेलं नुकसान बघता नजिकच्या भविष्यात बंदर पुन्हा सुरू होईल, याची शक्यताही धूसर आहे.
मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्राध्यक्ष अॅऑन यांनी 66 मिलियन डॉलर्सच्या आपातकालीन निधीची घोषणा केली असली तरी अर्थव्यवस्थेवर स्फोटाचा दिर्घकालीन परिणाम होईल, यात शंका नाही.
लेबेनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांची 2005 साली एका कार बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. हरीरी यांची हत्या करण्यात आली ते ठिकाण मंगळवारी झालेल्या स्फोटाच्या स्थळापासून अगदी जवळ आहे. या प्रकरणात शुक्रवारी निकाल येणार आहे आणि निकालाच्या काही तास आधी हा स्फोट झाल्याने काहींनी घातपाताची शंकाही उपस्थित केली होती. हा निकाल आता 18 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
घटनास्थळी मृतांचा खच
शहरातल्या एका गोदामात गेल्या सहा वर्षांपासून स्फोटक पदार्थ ठेवले होते. त्याचाच स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. लेबेननचे अध्यक्ष मिशेल आऊन यांनी या घटनेविषयी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "तब्बल 2750 टन अमोनिअम नायट्रेट असुरक्षितपणे ठेवणं अजिबात 'स्वीकारार्ह' नाही." स्फोट कसा झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.
घटनास्थळी उपस्थित बीबीसीच्या पत्रकाराने सांगितलं की घटनास्थळी मृतांचा खच पडला होता. एएफपी या वृत्तसंस्थेने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितलं की परिसरातल्या सर्व इमारतींचं मोठं नुकसान झालं. इमारतींचे अवशेष सर्वत्र पसरले आहे. सर्व काचाही फुटल्या. भूमध्य समुद्रात 240 किमी दूर सायप्रसपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला.
विशेष म्हणजे 2005 साली लेबननचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येचा तपास आणि न्यायालयाचा निकाल येणार होता आणि तेव्हाच हा स्फोट झाला आहे.
लेबनॉन येथील भारतीय दुतावासाने हे इमरजन्सी सर्व्हिस सुरू केली आहे. तिथे असलेल्या लोकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन भारतीय दुतावासाने केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
'माझ्या डोळ्यांदेखत काचा फुटल्या'
स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी हादी नसराल्लाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला आग लागल्याचं दिसलं. पण स्फोट होईल, याची कल्पना नव्हती. आम्ही आत गेलो. अचानक माझे कान बंद झाले. काहीवेळ मला काहीच ऐकू येत नव्हतं. काहीतरी अघटित घडल्याचं मला जाणवलं."
"आणि अचानक काचा फुटू लागल्या. आमच्या कारच्या काचा, आसपासच्या कारच्या काचा, दुकानं, इमारती. सर्वांच्या काचा माझ्या डोळ्यांदेखत फुटत होत्या."
"शहराच्या वेगवेगळ्या भागातून लोक एकमेकांना फोन करत होते. सर्वांचा अनुभव सारखाच होता. सर्वांनाचा स्फोट ऐकू आला होता. इमारती हादरल्याचं आणि काचा फुटल्याचं सगळे सांगत होते. याआधी असा स्फोट एखाद्या भागापुरता मर्यादित असायचा. त्याच भागातल्या लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू यायचा आणि नुकसानही त्याच भागापुरतं मर्यादित असायचं. मात्र, यावेळी संपूर्ण बैरुत शहर इतकंच नाही तर शहराबाहेरच्या लोकांनीही स्फोट अनुभवला."

फोटो स्रोत, EPA
सुन्निवा रोझ या स्थानिक पत्रकार आहेत. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी संध्याकाळी अंधार पडायच्या आधी बैरुत शहरात फिरत होते. संपूर्ण शहरात हाहाकार उडाला होता. शहरभर अक्षरशः काचांचा खच पडला होता. रस्त्यांवर विटा, सिमेंटचे ढीग पडले होते. अॅम्ब्युलन्सला वाट काढणंही अवघड होतं. घरं जमीनदोस्त झाली होती."
"मी बंदराकडे गेले. मात्र, मला आत सोडलं नाही. दुसरा स्फोट होण्याची भीती असल्याचं सांगत लष्कराने पोर्ट सील केला होता."
"संध्याकाळी उशिरापर्यंत आकाशात धुराचे लोट उठत होते. धुरामुळे संपूर्ण शहरात काळोख पसरला. शहरात फिरणंही अवघड होतं. रक्ताने माखलेले लोक जागोजागी दिसत होते. मी बघितलं एक डॉक्टर आपल्या घरातून फर्स्ट एड बॉक्स घेऊन बाहेर पळत आले आणि रस्त्यावर पडलेल्या एका 86 वर्षांच्या आजींवर उपचार करत होते. दगडधोंडे पडून अनेक कारचा चक्काचूर झाला होता. माझ्या स्वतःच्या फ्लॅटचं मोठं नुकसान झालं आहे. घरातल्या सर्व काचा फुटल्या. दोन किमी अंतरावर असलेल्या मॉलचा दर्शनी भाग पूर्णपणे कोसळला आहे."
जगभरातून प्रतिक्रिया
स्फोटानंतर लेबननच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान हसन दाईब म्हणाले, "मी आमच्या मित्रराष्ट्रांना आवाहन करतो की लेबेननच्या पाठिशी उभे राहून या खोल जखमा भरून काढण्यासाठी मदत करावी."

फोटो स्रोत, AFP
युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्वीट करत म्हटलं, "बैरुतचे फोटो आणि व्हिडियो हादरवून टाकणारे आहेत. माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. कुठल्याही प्रकारची मदत करायला आम्ही तयार आहोत."
'भयंकर हल्ला' असं म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही लेबननला मदतीचं आश्वासन दिलं आहे. अमेरिकेचे गृहमंत्री माईक पॉम्पियो यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "आम्ही आढावा घेत आहोत आणि या भयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी लेबेनॉनच्या नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत."
लेबेननला मदत आणि संसाधनं पाठवत असल्याचं फ्रान्सनं म्हटलं आहे.
"आवश्यक ती सर्व मदत करायला तयार असल्याचं" इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबियानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
इस्राईल आणि लेबननमध्ये तणाव आहे. मात्र, या प्रसंगी इस्रायलनेही मदतीचा हात पुढे केला आहे. या स्फोटानंतर इस्रायलने एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं, "आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि डिप्लोमॅटिक माध्यमातून आम्ही लेबेननशी संपर्क केला आणि लेबेननला वैद्यकीय आणि मानवतावादी मदत देऊ केली आहे."
विशेष म्हणजे इस्राईल आणि लेबनन यांच्यात सीमेवरून वाद आहे. गेल्याच आठवड्यात इस्रायलमध्ये घुसखोरी करण्याचा हिजबुल्लाहचा प्रयत्न मोडून काढल्याचं इस्रायलने सांगितलं होतं. मात्र, बैरुतमध्ये झालेल्या स्फोटाशी इस्राईलचा काहीही संबंध नसल्याचं इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
लेबननमधल्या भारतीय दूतावासानेही हेल्पलाईन जारी केली आहे.
भारतीय दूतावासातर्फे करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "मध्य बैरुतमध्ये आज संध्याकाळी दोन स्फोट झाले. सर्वांना संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुठल्याही भारतीयाला मदतीची गरज असल्यास आम्ही जारी केलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा."
अरबविषयक जाणकार सेबेस्टियन अशर काय म्हणतात?
आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लेबननला या स्फोटाने मोठा धक्का बसला आहे. लेबेननची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

फोटो स्रोत, EPA
स्फोटाच्या काही वेळापूर्वीच ऊर्जा मंत्रालयाच्या इमारती बाहेर निदर्शक आणि पोलिसांमध्ये हाणामारीही झाली. नेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी लोकांचा मागणी आहे.
देशात उपासमार आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या स्फोटाने अनेकांना माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या मृत्यूची आठवण करून दिली.
2005 साली एका कार बॉम्बस्फोटात लेबननचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातले चारही आरोपी इराण समर्थित हिजबुल्लाह समुदायाचे आहेत. संयुक्त राष्ट्रातर्फे स्थापित लवाद शुक्रवारी या प्रकरणी निकाल सुनावणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








