बैरुत स्फोटाचे हादरे ठाण्यातल्या मराठी तरुणालाही जाणवले कारण...

बैरूत

फोटो स्रोत, Reuters

    • Author, रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठीसाठी

4 ऑगस्टच्या संध्याकाळी लेबननची राजधानी असलेल्या बैरुतमध्ये दोन प्रचंड स्फोट झाले. त्या स्फोटांचे हादरे बैरुतपासून 30-35 किलोमीटर लांब तर बसलेच, पण ते मुंबईजवळच्या ठाणे उपनगरात राहणाऱ्या मलाही जाणवल्याशिवाय राहिले नाहीत.

बैरुतच्या बंदरात झालेल्या या दोन स्फोटांमुळे अर्ध्याहून अधिक बैरुतची वाताहत झाली. अनेक घरांच्या काचेची तावदानं तडकली, अनेक इमारती त्या हादऱ्याने कोसळल्या, हॉस्पिटल्सची दैना उडाली. 'मध्य-पूर्वेचं पॅरिस' अशी ओळख असलेल्या या शहराला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला.

बैरुतला झालेल्या स्फोटांचा ठाण्यात बसलेल्या मला कसा हादरा बसला, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण गेल्या वर्षी साधारण याच सुमारास बीबीसीच्याच एका कार्यक्रमाचा भाग म्हणून जवळपास महिनाभर या शहरात राहण्याचा योग आला होता. माझ्यासारख्या एका सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या माणसाला या शहरानं आपलंसं केलं होतं.

बीबीसीच्या वेबसाईटवर आणि इतरही अनेक स्रोतांद्वारे या हादऱ्याची दृश्यं पाहताना मन हेलावणं म्हणजे काय, त्याचा अनुभव येत होता. ताबडतोब फोन उचलला आणि तिथल्या रिटा बुसेजान नावाच्या माझ्या महिला सहकाऱ्याला फोन लावला. ती बैरुतपासून साधारण 30-35 किलोमीटर अंतरावर राहते. फोनवर तिचा आवाज ऐकून धस्सं झालं.

'आम्ही सगळेच खूप हादरलो आहोत. सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत. पण इथे माझ्या घरीही स्फोटाचे आवाज ऐकू आले,' सांगताना रिटाला कापरं भरल्याचं अगदी स्पष्ट जाणवत होतं. महिनाभर ज्या रस्त्यांवर मनसोक्त भटकलो होतो, त्यांच्या आडोशाला असलेल्या कॅफेंमध्ये विसावा घेत हे शहर नजरेने पिण्याचा प्रयत्न केला होता, त्या शहराची ही दशा बघवत नव्हती.

कोरोना
लाईन

वर्षभरापूर्वी 14 जुलैच्या दिवशी मी या शहरात पाऊल टाकलं होतं आणि 16 ऑगस्टला तिथून परत निघालो होतो. या महिनाभराच्या काळात या शहराने मनाला भुरळ पाडली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या यानी या संगीतकाराची अख्खी कॉन्सर्ट ऐकण्याचा योग याच शहरात नशिबी आला. अशा किती आठवणी सांगाव्यात! या स्फोटाच्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा उफाळून आल्या आणि त्या सांगाव्याश्या वाटत आहेत, म्हणून हा लेखनप्रपंच!

जगातल्या अतिप्राचीन शहरांपैकी एक, अशी बैरुतची ओळख आहे. जेरूसलेम, अथेन्स, दमास्कस अशा अनेक शहरांपेक्षाही बैरुत प्राचीन आहे. इसवी सन पूर्व 3 हजारमध्ये बैरूत शहर अस्तित्वात होतं, असं खुद्द पुरातत्व विभागाने स्पष्ट केलं आहे. आजही बैरुतमध्ये फिरताना जागोजागी उत्खनन केलेली ठिकाणं आणि त्या उत्खननात आढळलेल्या गोष्टी दिसतात.

बीबीसीच्या एशिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या कार्यक्रमासाठी बैरुतला जायची संधी मिळाली, त्या वेळी 'हे बैरुत कुठे रे भौ?' असा काहीसा एसटी स्टँडवर किंवा अनोळख्या गावच्या रस्त्यावर विचारावा, तसा प्रश्न अनेकांनी विचारला होता. खरं तर बैरुत ही लेबननची राजधानी आहे आणि हे शहर भूमध्य समुद्राच्या काठी वसलं आहे, या पलीकडे मलाही फारशी माहिती नव्हती.

खरं सांगायचं, तर भूमध्य समुद्राचं मेडिटेरेनियन हे इंग्रजी नावही एका दमात उच्चारता येत नव्हतं. नाही म्हणायला, थोड्या अभ्यासाअंती लेबनन या देशाला सीरिया, जॉर्डन आणि इस्राएल असा सौहार्दपूर्ण शेजार लाभल्याचं समजलं. आता सीरिया वगैरे देशांची नावं भारतात ऐकल्यानंतर जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, ती प्रतिमा आणि लेबनन आणि बैरुतबद्दलचं अज्ञानाचं भांडवल घेऊन मी विमानात पाय ठेवला होता.

बैरुत स्फोट

फोटो स्रोत, EPA

अरब राष्ट्रांबद्दल आणि अरब लोकांबद्दल आपल्या भारतीय मनात अनेक ग्रह असतात आणि बहुतांश वेळा ते गैरसमजच असतात. ते दूर करण्याचा प्रयत्नही आपण करत नाही. मीदेखील केला नव्हता. त्यामुळेच असेल कदाचित, पण बैरुतच्या विमानतळावर उतरण्याआधीच, अबुधाबीपासूनच मला सुखद धक्के मिळत गेले.

अबुधाबी विमानतळावर बैरूतला जाणाऱ्या विमानाची प्रतीक्षा करत मी त्या गेटजवळ थांबलो होतो. आजूबाजूला कुटुंबकबिल्यासह घरी परतणारे लेबनीज लोक होते. तिथे बहुधा मी एकमेव भारतीय होतो. लेबनीज पुरुषही एवढे सुंदर होते, तिथे त्यांच्याबरोबर असलेल्या बायकांच्या सौंदर्याचं वर्णन मी काय करू! बाळसेदार, गुटगुटीत लहान मुलं, उंच-धिप्पाड पुरुष आणि आणि कमालीच्या देखण्या स्त्रिया. त्यांच्या त्या समुदायात माझं मलाच असं वाटत होतं की आपण 'किस झाड़ की पत्ती' आहोत.

पण एक मात्र नक्की, ते सगळे खूप आनंदात होते. एकमेकांसह त्यांची थट्टामस्करी सुरू होती. मी मात्र ऐकू येत असूनही बहिरेपणा कसा असतो, याचा अनुभव घेत होतो.

डाउनटाऊन

फोटो स्रोत, Rohan Tillu

फोटो कॅप्शन, डाउनटाऊन

विमानात माझ्या बाजूला 54 वर्षांची मोनिका नावाची महिला बसली. '54 वर्षांची, मोनिका' वगैरे तपशील थोड्या वेळानंतर गप्पा झाल्या त्यातून उलगडले. मी भारतीय किंवा पाकिस्तानी आहे, असा अंदाज बांधायला तिला फार कष्ट करावे लागले नाहीत. मग भारतीय लोक, इथली संस्कृती, लेबननमधले लोक वगैरे गप्पा सुरू झाल्या.

उतरताना ती मला म्हणाली, 'इथले लोक जरा वर्णद्वेषी आहेत. त्यामुळे तुला कदाचित काही वाईट अनुभव येऊ शकतील. पण प्लीज, शक्य तो मनाला लावून घेऊ नकोस.'

हे वाक्य कानात साठवत मी विमानतळावर उतरलो, पण खरं सांगायचं, तर पुढल्या महिन्याभरात एखाद दोन किरकोळ अपवाद वगळता मला वर्णद्वेषाची वागणूक कुठेच मिळाली नाही. उलट जिथे गेलो, तिथे हसतमुखाने स्वागतच झालं. भाषा कळायची नाही, पण खाणाखुणांच्या भाषेने, हसून संवाद व्हायचा.

अथांग समुद्र आणि निवांत पहुडलेलं बैरुत

बैरुतच्या विमानतळावरून बाहेर पडलो आणि थोडासा हरखून गेलो. सीरियाच्या बाजूचा देश म्हटल्यावर डोळ्यासमोर आपोआप उद्ध्वस्त इमारती, दाटीवाटीची लोकवस्ती वगैरे चित्र रंगून तयार होतं. प्रत्यक्षात मात्र दुतर्फा नीटनेटक्या इमारती, गुळगुळीत रस्ते, प्रशस्त जागा यांनी मनाचा ठाव घेतला. विमानतळावरून मुख्य शहरात जाणारा रस्ता आपल्या मुंबईतल्या पेडररोडसारखा होता. किंबहुना बैरुतमधून फिरताना अनेकदा मुंबईची आठवण यावी, असंच तिथलं वातावरण होतं.

पायाशी भूमध्य समुद्राची निळाई आणि डोक्याशी हिरवागार माऊंट लिबन घेऊन बैरुत पहुडलं आहे. हेदेखील आपल्या मुंबईसारखंच! मुंबईतही एका बाजूला अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला टेकड्यांची रांग आहे. अर्थात त्या टेकड्यांपैकी काही भूईसपाट झाल्या असून काही झोपडपट्ट्यांनी वेढलेल्या आहेत, ती गोष्ट वेगळी.

पण बैरुतच्या या अशा भौगोलिक रचनेमुळे या शहरात चालणं म्हणजे एक चढ चढून दुसऱ्या चढाला लागण्यासारखंच होतं. गाडी काढून जरा दहा मिनिटं समुद्राच्या उलट्या दिशेने गेलं की, घाट सुरू झालाच म्हणून समजा आणि अर्ध्या-पाऊण तासाच्या ड्राईव्हनंतर तुम्ही समुद्रसपाटीपासून चांगलेच उंचावर पोहोचलेले असता. या माऊंट लिबनच्या माथ्यावरून अनेकदा सूर्यास्त बघण्याची संधीही मिळाली.

बैरुत

फोटो स्रोत, Rohan Tillu

बैरुतमध्ये पोहोचलो, त्या पहिल्याच दिवशी बीबीसीतील माझा सहकारी आणि बैरुतमधला माझा गार्डियन मेहमूद (त्याने विनंती केल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदललं आहे) मला डोंगरातल्याच मूनेर नावाच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथून अथांग समुद्र आणि निवांत पहुडलेलं बैरुत खूप छान दिसत होतं. बैरुतमधला पहिला सूर्यास्त बघितला तो इथूनच!

या डोंगराचं लेबनीज लोकांना प्रचंड आकर्षण आणि वेडही आहे. बैरुतमध्ये काम करणाऱ्या बहुतांश लोकांचं एक घर डोंगरात असतं. किंवा त्यांचं गाव तरी डोंगरात असतं.

मग आठवडाभर काम करून शुक्रवारी संध्याकाळी गाड्या काढून हे लोक डोंगरातल्या आपल्या घरी जातात. शनिवार-रविवार निसर्गाच्या सान्निध्यात आराम करतात. काही जण बागकाम आणि शेती करण्याची हौसही भागवून घेतात. परत येताना आपल्या डोंगरातल्या घराजवळच्या शेतात लावलेल्या काकड्या, बटाटे असं काहीबाही घेऊन येतात आणि पुढल्या आठवड्याला तोंड देण्यासाठी सज्ज होतात.

बैरुतमध्येही अनेक घरांमध्ये खूप छान झाडं लावलेली आढळली. निवडुंगापासून सुंदर फुलांच्या झाडांपर्यंत अनेक झाडं असायची. मेहमूदच्या घरी तर त्याने सुंदर गार्डन केलं होतं. तो आणि त्याची पार्टनर फावल्या वेळात गार्डनमध्ये रमायचे. ही निसर्गाशी एकरूप होण्याची आवड लेबनीज लोकांना आहे, असा सार्वत्रिक अनुभव मला तरी आला.

बैरुतमधल्या हमरा नावाच्या भागात माझी राहण्याची सोय होती. मुंबईच्या भाषेत सांगायचं, तर साधारण कुलाब्यासारखा हा भाग आहे. इथल्या हॉटेल्ससाठी प्रसिद्ध! तर बीबीसीचं ऑफिस डाऊनटाऊन या अत्यंत प्रशस्त भागात होतं. समोरच लेबननचं पार्लमेंट हाऊस आणि आजूबाजूला अशीच अनेक प्रतिष्ठित ऑफिसं असलेल्या डाऊनटाऊनमधल्या बीबीसीच्या ऑफिसमधून खाली बघताना आपण मुंबईच्या फोर्ट परिसरात असल्यासारखंच वाटायचं.

समुद्राच्या जवळ असलेल्या हमरा या भागात अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बैरूत म्हणजेच AUB उभी आहे. या युनिव्हर्सिटीचा विस्तीर्ण कॅम्पस अनेक हरहुन्नरी विद्यार्थ्यांची साक्ष देतो. सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री शेख झाकी यामानी हेदेखील याच विद्यापीठाचे विद्यार्थी!

बैरूतमधलया अमेरिकन विद्यापीठाचं प्रवेशद्वार

फोटो स्रोत, Rohan Tillu

फोटो कॅप्शन, बैरूतमधलया अमेरिकन विद्यापीठाचं प्रवेशद्वार

अरब राष्ट्रांमध्ये लेबनन हे न्युट्रल राष्ट्र मानलं जातं. साधारण कोणाच्या अध्यात ना मध्यात, असा या राष्ट्राचा एकंदरीत खाक्या आहे. त्यात बैरुत हे शहर मध्यपूर्वेतील एक प्रमुख शहर आहे. त्यामुळे इथे इतर अरब राष्ट्रांमधील अनेक तरुण नोकरीसाठी आलेले आहेत. उदाहरणच द्यायचं, तर माझ्याबरोबर काम करणारे लोक हे लेबनन, सीरिया, सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, अशा वेगवेगळ्या देशांमधून आले होते.

बैरुतमधला पाहुणचार

खुद्द लेबननमध्ये जन्माला आलेल्या आणि अख्खी हयात याच देशात गेलेल्या अनेकांनाही मी भेटलो. त्यांच्याशीही गप्पा झाल्या. नाजी आणि हाला हे दांपत्य त्यापैकीच एक! लेबननमध्ये पोहोचलो, त्याच दिवशी मेहमूद मला त्यांच्याकडे घेऊन गेला. नाजी साधारण 55-६० वर्षांचा असावा आणि त्याची बायकोही साधारण पन्नाशीची असावी. अनेक वर्षं पत्रकारीतेत काढल्यानंतर नाजी आता निवृत्तीचं आयुष्य जगतोय. लेबननबद्दल मला त्याने भरभरून माहिती दिली.

तीच गोष्ट आंतोन नावाच्या मेहमूदच्या मित्राची! त्याच्या डोंगरातल्या घरी त्याने आमचा खूप छान पाहुणचार केला. एवढंच नाही, तर कोणत्याही अरब राष्ट्रासाठी निषिद्ध असलेल्या इस्राएल या विषयावरही तो बोलला. मी भारतात परतण्यासाठी निघालो, त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा त्याला भेटण्याचा योग आला. खास माझ्यासाठी म्हणून त्याने त्याच्या घरच्या द्राक्षांपासून बनवलेल्या 'अराक'ची एक बाटली दिली होती.

मला या लोकांचं खूप कौतुक वाटायचं आणि हेवादेखील! इतक्या वेगवेगळ्या देशांमधून येऊनही त्यांना बोलण्यासाठी त्यांची अरबी भाषाच पुरेशी होती. नाहीतर आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या लोकांची एकमेकांशी बोलायची समान भाषा भारतीय नाही, तर इंग्रजी आहे. त्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. त्यांचं शिक्षणही अरबी भाषेतच झालं असल्याने अनेकांचं इंग्रजी फार चांगलं नव्हतं. पण म्हणून त्यांचं कोणावाचून कधीच काही अडलेलं, मला जाणवलं नाही.

मला एक प्रसंग आठवतो. आमच्या ऑफिसमधल्या रिटा नावाच्या एका मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. तिने आम्हाला लग्नाआधी होणाऱ्या बॅचलर पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. शुक्रवारी ऑफिसचं काम आटोपून मी आणि मेहमूद सात वाजता निघालो होतो. त्याने सहज विचारलं, 'तुला बॅचलर पार्टीला जायचं आहे का?' मी होकार दिला.

बैरुतमधलं वाद्य

फोटो स्रोत, Rohan Tillu

आम्ही त्याच्या गाडीतून निघालो आणि तासाभराच्या ड्राईव्हनंतर डोंगरातल्या एका सुंदर हॉटेलमध्ये पोहोचलो. एका घराच्या बगीच्यात सुंदर रचना करून ते हॉटेल सजवलं होतं. तिथे रिटाच्या घरची सगळी तरुण मंडळी, तिच्या बहिणीच्या मैत्रिणी वगैरे जमले होते. मी आणि मेहमूद एक टेबल अडवून बसलो. भारतातला पाहुणा म्हटल्यावर थोडीशी चौकशी झाली आणि ते लोक त्यांच्यात्यांच्यात व्यग्र झाले.

त्या हॉटेलमध्ये Oud नावाचं गिटारसारखं दिसणारं एक पारंपरिक लेबनीज वाद्य वाजवत एक तरुण अरबी गाणी म्हणत होता. लेबननमध्ये मुबलक प्रमाणात मिळणारी 'अराक' नावाची मदिरा सगळेच रिचवत होते आणि हुक्का फिरत होता. थोड्या वेळाने त्या तरुणाच्या सूरात सूर मिसळून सगळेच गायला लागले. एकामागोमाग एक गाण्यांची आवर्तनं सुरू झाली. मेहमूद खरा सौदीचा नागरिक, पण त्यालाही ही सगळी गाणी पाठ होती. कारण शेवटी ती अरबी गाणी होती.

त्या गाणाऱ्या तरुणाला रिटाच्या बहिणीचं लग्न आहे, त्यासाठी ही पार्टी आहे वगैरे तपशील कळले. तेवढ्याच रिटाच्या बहिणीचा होणारा नवराही तिथे आला होता. मग त्या गाणाऱ्याने खास लग्नासाठी असलेलं अरबी गाणं म्हणायला सुरुवात केली. एका क्षणात त्या पार्टीचा रंग बदलला आणि रिटा आणि जमलेल्या सगळ्यांनी लुटुपुटूचा वधूला निरोप द्यायचा क्षण उभा केला. दोन क्षण सगळे स्तब्ध झाले आणि पुन्हा दुसऱ्या क्षणाला पुढल्या गाण्यात सूर मिसळून नाचायला लागले.

हिंदी चित्रपटांचं आकर्षण

गाण्यांचाच विषय निघाला म्हणून, सगळ्या लेबनीज लोकांची सकाळ फैरोझ नावाच्या गायिकेची गाणी ऐकल्याशिवाय होतच नाही. आपल्याकडे जो मान लता मंगेशकरांना आहे, लेबननमध्ये फैरोझ यांचं नाव त्याच आदराने घेतलं जातं. आपल्याकडे जसं रेडिओवर लतादीदींचं 'मोगरा फुलला' किंवा तत्सम गाणं पहाटे वाजवतातच, तसंच लेबननमध्येही फैरोझच्या गाण्यानेच तांबडं फुटतं.

या महिनाभरात मी खूप अरबी गाणी ऐकली. अनेकदा एखादं गाणं सुरू झालं की, अचानक आपला एखादा जुना मित्र गवसल्याचा आनंद व्हायचा. कारण हिंदी चित्रपटांमधल्या बऱ्याच गाण्यांच्या चाली या अरबी गाण्यांवरून जशाच्या तशा उचलल्या आहेत.

या अरबी लोकांना हिंदी चित्रपटांचं वेडही आहे. पण त्यांची यादी अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे 'हिनद्'मधून म्हणजे इंडियातून आलाय (हा हिनद् बहुधा हिंदीचा किंवा हिंदचा अपभ्रंश असावा) म्हटल्यावर 'अमिताब बाचान' किंवा 'शारूक खान' असं प्रश्नार्थी विचारलं जायचं.)

बैरूत

फोटो स्रोत, Rohan Tillu

हाच संगीताचा विषय पुढे नेताना आणखी एक आठवण झाली. बैरुतला जायला निघालो तेव्हा विमानात सहज डोक्यात विचार आला होता, 'अरे यार, बैरुतमध्ये यानीचा शो असला, तर?' आणि काय आश्चर्य! तिथे उतरल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ऑफिसमधून हॉटेलवर चालत निघालो होतो. समुद्राच्या शक्य तो जवळून जावं, या उद्देशाने वॉटरफ्रंट भागातून जात होतो. तिथे बैरुत म्युझिक फेस्टिव्हलची जाहिरात लावली होती आणि 23 जुलैला चक्क यानीची कॉन्सर्ट होती.

थोडीशी पदरमोड करून तिकीट काढलं. मागे अथांग पसरलेला भूमध्य समुद्र आणि समोर बहुढंगी बैरुत शहराला पायथ्याशी घेऊन उभा असलेला माउंट लेबन अशा भव्य पार्श्वभूमीवर यानीचे ते दैवी सूर ऐकले होते.

जिथे स्फोट झाला, त्या जागेपासून कॉन्सर्टची जागा अजिबातच लांब नाही. वेळही स्फोट झाला, तीच होती. गेल्या वर्षी 23 जुलैला संध्याकाळी त्या जागी यानीचे सूर निनादले होते आणि या वर्षी 4 ऑगस्टला ते सूर हद्दपार करणारा मोठा स्फोट झाला.

हिंसाचाराचं गालबोट

पण म्हणून बैरूतमध्ये सारं काही आलबेल आहे, असं समजण्याचं काहीच कारण नाही. लेबनन हे फ्रेंच अधिपत्याखाली होतं. 1943मध्ये ते स्वतंत्र झालं. पण पुढल्या 22 वर्षांमध्येच इथे नागरी युद्धाचा भडका उडाला. 1975 ते 1990 अशी 25 वर्षं या देशात यादवी युद्ध सुरू होतं. त्या युद्धाच्या खुणा आजही बैरूतच्या अंगावर आहेत.

लेबनन आणि बैरुतही मुख्यत: दोन गटांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे मुस्लीम आणि दुसरा गट आहे ख्रिश्चनांचा! 1975मध्ये तर जर्मनी आणि बर्लिनच्या विभाजनासारखं बैरुतमध्येही ईस्ट आणि वेस्ट बैरुत असे दोन भाग झाले होते. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणं शक्य नव्हतं. त्या परिस्थितीचं खूप सुंदर चित्रण 'वेस्ट बैरुत' (West Beirut) नावाच्या एका चित्रपटात केलं आहे.

महात्मा गांधींच्या समर्थनार्थ इथं अहिंसा दिन साजरा होतो. त्यानिमित्तानं साकारलेलं शिल्प

फोटो स्रोत, Rohan Tillu

फोटो कॅप्शन, महात्मा गांधींच्या समर्थनार्थ इथं अहिंसा दिन साजरा होतो. त्यानिमित्तानं साकारलेलं शिल्प

या 25 वर्षांच्या काळात शहराच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला रॉकेट्सचा मारा करण्यापर्यंत संघर्ष टोकाला गेला होता. अजूनही बैरुतमधल्या काही जुन्या इमारतींच्या भिंतींवर गोळ्यांमुळे पडलेली भगदाडं, रॉकेट्सच्या माऱ्याने काळवंडलेल्या भिंती सर्रास दिसतात. एवढंच नाही, तर फ्रेंचांनी बांधलेली रेल्वेही या युद्धामुळे बंद पडली. आज लेबननमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या गाड्या आणि बसशिवाय दुसरा पर्याय नाही.

पण हे विभाजन फक्त शहरापुरतं मर्यादित नाही. ते दोन समाजांमध्येही आहे. त्यातच भ्रष्टाचारानं हा देश पोखरला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत इथे लोक भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरले होते. अनेक महिने बैरुतमधलं कामकाज ठप्पं होतं. अनेक ठिकाणी यथेच्छ जाळपोळ, गाड्यांची नासधुस असे प्रकारही झाले.

एक तर आपल्या इथल्या बंगाली लोकांसारखेच अरब लोकही माथ्याने भडक असतात. 'सरळ तर सूत, नाहीतर भूत' असा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे एखाद्या छोट्या गोष्टीचं पर्यवसान कशात होईल, काहीच सांगता येत नाही.

लेबननच्या दक्षिण टोकाला असलेल्या सोर किंवा टियर या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहरातून बैरुतच्या दिशेने येताना लष्करातील काही जवानांना एका भिंतीच्या आडोश्याने एका इमारतीवर हातातल्या बंदुकीने नेम धरताना मी एकदा बघितलं होतं.

दिसला प्रकार मी मेहमूदच्या कानावर घातला. त्याने चौकशी केली आणि कळलं की, त्या इमारतीत काही कट्टरतावादी लोकांनी आसरा घेतला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्कराने ती मोहीम हाती घेतली होती.

या अशा चकमकी, हिंसा लेबनीज लोकांना नवीन नाही. 25 वर्षं चाललेल्या नागरी युद्धात 1.20 लाख लेबनीज नागरिकांनी आपला जीव गमावला. त्यानंतरही अनेक हल्ले या शहरात आणि या देशात झाले आहेत. पण प्रत्येक वेळी लेबनीज लोक त्या आठवणी बाजूला सारून जगायचा प्रयत्न करतात.

सध्या लेबननला भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे सीरियातून आलेले निर्वासित! सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या बेका व्हॅली या भागात या निर्वासितांसाठी उभारलेल्या छावण्या दिसतात. मुंबईतल्या एखाद्या झोपडपट्टीप्रमाणे या छावण्या आहेत. बैरुतमधल्या रस्त्यांवरही सीरियन लोक खाण्यासाठी किंवा पैशासाठी याचना करताना दिसायचे.

नाजूक अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे या देशाची अवस्था आधीच बिकट होती. त्यात कोरोनामुळे या देशाचं कंबरडं आणखी मोडलं आहे. त्यातून आता कुठे सावरत असताना अगदी बंदरातच हे स्फोट झाल्याने लेबननची स्थिती आणखी बिकट होणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारात बैरुतचं बंदर ही मोक्याची जागा आहे. युरोपमधून निघालेली जहाजं अनेकदा बैरुतमध्ये थांबतात. या मालवाहतुकीतून बैरूतला मोठा महसूल मिळतो. या बंदरातच स्फोट झाल्याने हा महसूल आटणार आहे. पर्यटन हे महसुलाचं दुसरं साधन कोरोनामुळे आधीच बंद झाल्याने लेबननसाठी पुढला काळ कठीण जाणार आहे.

यातील आणखी एक बाब म्हणजे हा स्फोट जिथे झाला, तिथून अगदी थोड्याच अंतरावर लेबनीज नौदलाचं मुख्यालय आहे. या परिसरात नेहमीच कडेकोट बंदोबस्त असायचा. या स्फोटामुळे या मुख्यालयाचं आणि बंदराजवळच उभ्या असलेल्या लेबनीज नौदलाच्या लढाऊ जहाजांचं काय झालं, ते कळायला मार्ग नाही. पण एकंदरीत विनाश बघता, त्यांची अवस्था काय झाली असेल, याचा तर्क करणं कठीण नाही.

मेहमूद नाही म्हटलं तरी आज त्या देशात 13-14 वर्षं राहतोय. त्याच्या मते 1975 सारखी परिस्थिती पुन्हा येईल, या दृष्टीने या देशाची पावलं पडत आहेत. लेबनन पुन्हा एकदा नागरी युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असं त्याला वाटतं.

नुकत्याच झालेल्या स्फोटांमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही जणांच्या मते फटाक्यांच्या कंटेनरला लागलेल्या आगीमुळे हे स्फोट झाले, तर काही जणांच्या मते रासायनिक द्रव्य नेणाऱ्या कंटेनरचा स्फोट झाला. अनेकांनी तर दहशतवादी हल्ल्याचा संशयही व्यक्त केला. तसं काही खरंच असेल, तर मग मेहमूदची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ लागणार नाही, असंच चित्र आहे.

'या स्फोटामुळे बैरुतमधल्या हॉस्पिटल्सचंही खूप नुकसान झालंय. अनेक रुग्ण रस्त्यावरच आहेत. तुझ्या डोळ्यासमोर जे डाऊनटाऊन आहे, तसं आता काहीच राहिलेलं नाही. खूप उद्ध्वस्त झालंय,' मेहमूदने पाठवलेल्या व्हॉईस मेजेसमध्ये तो मला सांगत होता. तो हे बोलताना मागून जाणाऱ्या अँब्युलन्सचा सायरनही ऐकू येत होता.

वर्षभरापूर्वी बैरूतमधून निघताना 'अकाबिलुक करीबन' (लवकर भेटू या), असं म्हणत मी त्या शहराचा निरोप घेतला होता. पण पुन्हा भेटू, तेव्हा बैरूतचा चेहरा तसाच नसेल, याची खंत नक्कीच आहे. मध्यपूर्वेच्या या पॅरिसला त्याचं गतवैभव लवकर प्राप्त होवो, एवढ्याच शुभेच्छा!

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)