You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमा वाद: गलवान खोऱ्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये नक्की काय दिसतंय?
भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात 15-16 जूनच्या रात्री ज्या भागात जवानांमध्ये हिंसक चकमक झाली होती, त्या भागाजवळ चीन बांधकाम करत असल्याचं सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतंय.
या इमेजेसमध्ये बंकर, टेन्ट आणि सैन्याचं सामान ठेवण्यासाठीचे गोदाम उभारण्यात आल्याचं दिसतंय. गेल्या महिन्यात या सर्व गोष्टी इथे नव्हत्या.
22 जून रोजी काढलेल्या या इमेज आहेत. मॅक्सर या अंतराळ तंत्रज्ञान कंपनीने हे इमेजेस टिपले आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने गलवान नदीजवळ जे बांधकाम उभारल्याचं दिसतंय ते जूनच्या अगदी सुरुवातीला जे एरिअल फोटोग्राफ काढले, त्यात दिसत नाही.
मात्र, या सॅटेलाईट इमेजवर अद्याप चीन आणि भारत या दोन्ही देशांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बीबीसीने या फोटोची सत्यता पडताळलेली नाही.
लडाखच्या गलवान खोऱ्यात मे महिन्यापासूनच भारत आणि चीनचे जवान समोरासमोर उभे ठाकलेत. मात्र, 15 जूनच्या रात्री झालेल्या हाणामारीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर हा तणाव आणखीच वाढला. तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे.
बुधवारी (24 जून) परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, "6 जून रोजी दोन्ही देशांच्या कमांडर पातळीवरच्या चर्चेत डिसएन्गेजमेंट आणि डी-एस्कलरेशन संबंधी जो निर्णय घेतला होता, त्यावर दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली पाहिजे. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री ही वांग यी यांनी पुन्हा एकदा भर दिला आहे."
सॅटेलाईट इमेजमध्ये काय दिसतं?
गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताच्या बाजूने 1.5 किमी आत चीनचा मोठा कॅम्प दिसतोय, असं संरक्षणतज्ज्ञ अजय शुक्ला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनीही सैन्यातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "दोन्ही देशांत कमांडर पातळीवर चर्चा सुरू होती, तेव्हापासून ते 15 जूनला हिंसक चकमक झाली. या दरम्यानच्या काळात चीनने अधिकचं बांधकाम केलं असावं, असं वाटतं."
मे महिन्यात ज्या सॅटेलाईट इमेज घेण्यात आल्या त्यात वादग्रस्त भागात कुठलंच बांधकाम दिसत नाही.
हे बांधकाम 'काळजी वाढवणारं' असल्याचं माजी भारतीय परराष्ट्र अधिकारी आणि लडाखविषयक जाणकार पी. स्टोबडन यांनी म्हटलं आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "केंद्र सरकारने कुठलीही इमेज किंवा पत्रक अजून प्रसिद्ध केलेलं नाही. त्यामुळे त्यावर बोलणं अवघड आहे. मात्र, एका खाजगी कंपनीने जी इमेजेस प्रसिद्ध केली आहेत त्यावरून असं दिसतं की चीनने बांधकाम केलं आहे आणि त्यांनी माघार घेतलेली नाही."
या परिसरातली परिस्थिती अजूनही 'तणावपूर्ण' आहे.
दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सीमाभागाचा दौरा करून सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्याचं लष्करातर्फे सांगण्यात आलं आहे.
गलवान खोऱ्यात नेमकं काय घडलं?
मे महिन्यापासून चिनी जवान या भागात दिसू लागले होते. त्यानंतर गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी जवान समोरासमोर होते.
त्यातच 15 जूनच्या रात्री भारतीय जवान आणि चिनी जवान यांच्या हाणामारी झाली. समुद्रसपाटीपासून 4300 मीटर उंचीवरचा हा सगळा भाग आहे आणि अत्यंत थंड प्रदेश आहे. याला बर्फाचं वाळवंट असंही म्हणतात. हाणामारीत काही भारतीय जवान गलवान नदीत पडले. नदीच्या पाण्याचं तापमान शून्य अंशाच्याही खाली होतं.
या चकमकीत 20 जवानांचा मृत्यू झाला. आधी एका कर्नलसह तीन जवान शहीद झाल्याची बातमी आली. मात्र, त्यानंतर थंडीमुळे जखमी झालेले 17 जवानही दगावल्याचं कळलं. मात्र, याव्यतिरिक्त आणखी 76 जवान जखमी झाले होते. त्या सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
चीनने मात्र त्यांच्या जवानांच्या जीवितहानीविषयी अद्याप काहीच माहिती दिली नाही.
भारत आणि चीन यांच्यात 1996 च्या कराराअंतर्गत जवान जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा बंदुकींचा वापर करत नाहीत आणि म्हणूनच 15 जूनच्या रात्री जी झडप झाली त्यात कुणीही बंदुकीचा वापर केला नाही.
भारत आणि चीन यांच्यात 3488 किमी लांबीची सीमारेषा आहे. हिला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात. मात्र, या रेषेवर अनेक ठिकाणी उंचच उंच डोंगर, नद्या, हिमशिखरं आणि तळी आहेत. त्यामुळे सीमारेषा प्रत्यक्षात चिन्हांकित केलेली नाही. या सीमेवर अनेक ठिकाणी अधून-मधून दोन्ही देशांचे जवान समोरासमोर येत असतात. गेल्या 30 वर्षांपासून हा सीमा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भारत-चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही इमेज महत्त्वाची आहे आणि म्हणूनच याविषयी आम्ही निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांच्याशीबातचीत केली.
निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी 1982 ते 1984 दरम्यान भारत-चीन सीमेवर तैनात होते. 2013-14 मध्ये त्यांनी भारतीय सैन्याच्या 14 कोरचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही पदभार सांभाळला. 2014 ते 2016 पर्यंत ते इन्फन्ट्री विभागाचे डीजी होते.
दोन्ही देशांच्या सीमेवरच्या ज्या भागातून तणावाच्या बातम्या येत आहेत, त्या भागात त्यांनी बराच काळ घालवला आहे आणि त्या प्रदेशाविषयी त्यांना चांगली जाण आहे.
सध्या जी सॅटेलाईट इमेज चर्चेत आहे त्यावरून काय सांगता येऊ शकतं, हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. बीबीसी प्रतिनिधी सरोज सिंह यांनी त्यांच्याशी केलेल्या मुलाखतीचा हा सारांश.
प्रश्न : अशाप्रकारच्या सॅटेलाईट इमेज किती योग्य असतात?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: अशा सॅटेलााईट इमेजेसची व्याख्या योग्यप्रकारे करणं अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ, आधी हे लक्षात घेणं गरजेचं असतं की अशा इमेज किती उंचीवरून घेण्यात आल्या, किती दुरून घेण्यात आल्या. इमेजमध्ये तुम्हाला परिस्थिती चिंताजनक दिसत असली तरी प्रत्यक्षात ग्राऊंडवर तेवढी चिंताजनक नाही. मात्र, सीमेच्या दोन्ही बाजूला जवान आहेत. भारताच्या बाजूनेही आणि चीनच्या बाजूनेही.
अशाप्रकारच्या इमेज घेणाऱ्यांकडून बरेचदा चूक होत असते. कारण अशा इमेजमध्ये जे जवान दिसतात ते चिनी आहेत की भारतीय, हे कळणं कठीण असतं.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा खरंतर परसेप्शन आहे. दोन्ही देश आपापल्या वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की सॅटेलाईट इमेज बऱ्यापैकी बरोबर असल्या तरी पूर्णपणे योग्य नसतात.
प्रश्न : मॅक्सार टेक्नॉलॉजीने बुधवारी जी सॅटेलाईट इमेज प्रसिद्ध केली, त्यावरून असं म्हणता येईल का, की 15 जूनच्या रात्री जिथे हिंसक चकमक झाली तिथे चिनी सैन्य अजूनही आहे?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: हो, म्हणू शकतो. गलवान खोऱ्यातल्या पेट्रोलिंग साईट 14 बाबत थोडा संभ्रम असू शकतो. मात्र, त्याच्या दुसऱ्या बाजूला हायवे-जी 219 चा जो भाग आहे तिथे चिनी जवान दिसत आहेत. ही इमेज योग्य असल्याचं दिसतंय.
2500 किमी लांबीचा हा महामार्ग लडाखच्या पूर्वेकडे आहे आणि यातला 180 किमीचा मार्ग अक्साई चीनमधून जातो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा महामार्ग 100 किमी अंतरावर आहे. भारतानेही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा बांधकाम या परिसरात केलं आहे.
प्रश्न : सैन्य कारवाईत अशा प्रकारच्या इमेजेसचा वापर करतात का?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात जवानांपर्यंत या इमेज सहसा पोहोचतच नाहीत. मात्र, कमांडर पातळीवर माहिती दिली जाते.
सहसा वरिष्ठ अधिकारी (मंत्रालय ते ब्रिगेडिअर) या माहितीवर कारवाई करतात. त्यांच्यापर्यंतच या इमेज जातात आणि तेच रणनीती आखतात.
त्यानंतर सीमेवर तैनात जवानांना योजना सांगितली जाते. ग्राऊंड लेव्हलवर जवान त्यांच्याकडे असलेल्या बंदुका आणि दुर्बिणीतून जे दिसतं तेवढंच बघू शकतात. अशा इमेज घेण्यासाठी प्रत्येक सरकारकडे स्वतःची यंत्रणा असते.
प्रश्न : ही इमेज बघून हे सांगता येईल का की भारत-चीन सीमेवर डी-एस्कलरेशन अजून झालेलं नाही?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी : एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डिसएन्गेजमेंट झाल्यावरच डी-एस्कलरेशन शक्य आहे. दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत. डिसएन्गेजमेंट म्हणजे जवान समोरासमोर नसणं. इमेज बघून वाटतं की दोन्ही सैन्यांमध्ये अंतर आहे.
मात्र, या इमेजची तुलना काही दिवसांपूर्वीच्या इमेजशी करावी लागेल. म्हणजेच कुठल्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हे तपासून बघितलं पाहिजे की या ठिकाणची महिनाभरापूर्वीची इमेज कशी दिसत होती.
काही सॅटेलाईट 15 दिवसात इमेज काढतात. तर काही 21 दिवसात. त्यानंतरच प्रत्यक्ष जमिनीवर काय फरक पडला? पूर्वी किती टँक होते आणि आता किती आहेत?, पूर्वी किती गाड्या दिसत होत्या आणि आता किती दिसतात? हे कळू शकेल.
प्रश्न : 15 जूनला हिंसक चकमक झाली. त्यानंतर त्याठिकाणी बांधकाम झालं आहे की नाही, हे सॅटेलाईट इमेजवरून कळू शकतं का?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: कळू शकतं. मात्र, त्यात दोन अडचणी आहेत. पहिली अडचण अशी की सॅटेलाईट इमेज वाचणारा त्यात पारंगत हवा. सॅटेलाईट इमेज योग्य पद्धतीने वाचता येत नसेल तर चुका होऊ शकतात.
दुसरी गोष्ट म्हणजे चीन भारताला मूर्ख बनवत नसावा. म्हणजे असं की कार्डबोर्डची गाडी बनवून तिथे ठेवायची आणि इमेजमध्ये आपल्याला फक्त सावली दिसावी. सॅटेलाईट इमेज वाचणारी व्यक्ती या कामात तरबेज नसेल तर तो प्रत्येक सावलीला गाडी किंवा तंबू समजू शकतो.
लडाख उंचीवर असलेल्या वाळवंटाप्रमाणे आहे. तिथे फार झाडी नाहीत. नदी किंवा डोंगर आहेत. त्यामुळे तिथे फक्त सावल्या असतात. जाणकारालाच हे माहिती असतं की एखाद्या देशाचं सैन्य तंबू कसे उभारतात, बंकर कसे बनवतात, वाहनं कशी तैनात करतात. हे सगळं बघून बांधकाम सुरू आहे की नाही, हे समजू शकतं.
यासाठी सॅटेलाईट इमेजचं रिझॉल्युशनही महत्त्वाचं असतं. सध्या न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांमध्ये जो फोटो येतोय तो सुस्पष्ट नाही. सध्या फक्त एवढंच कळतंय की हायवे-जी 219 जवळ चिनी सैनिक आहेत.
प्रश्न : एकीकडे सॅटेलाईट इमेज बघायची आणि दुसरीकडे दोन्ही देशात चर्चा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत का?
लेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: चर्चा सुरू आहे आणि चर्चा व्हायला हवी. चर्चेवर चीन अंमलबजावणी करो अथवा न करो, त्या परिस्थितीसाठी केंद्र सरकारने सज्ज असायला हवं. चर्चा यशस्वी झाली नाही तर काय पर्याय उरतात, त्यासाठी प्रत्येकच देशाने तयार असायला हवं.
मला वाटतं चीन चर्चा करून टाईम बाय (वेळ मागून घेण्याची) रणनीतीचा अवलंब करत आहे. यापेक्षा वेगळं काही करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असं मला वाटत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)