‘वर्णद्वेष शिकवला जातो आणि तो नष्टही केला जाऊ शकतो’

फोटो स्रोत, Getty
अमेरिका पेटून उठली आहे… आणि ही आग भडकण्याला कारणीभूत ठरली आहे ती समस्या ज्यावर तोडगा काढण्यात गेली अनेक दशकं अमेरिका अपयशी ठरली आहे. ही समस्या आहे वर्णद्वेष.
अमेरिकेतल्या 75 शहरांमध्ये आंदोलनाचं लोण पसरलं आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. याला कारण ठरला जॉर्ज फ्लॉईड या अफ्रिकन-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू.
25 मे रोजी मिनिआपोलीस या शहरात एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉईडला अटक केली आणि त्याच्या मानेवर आपला गुडघा ठेवून दाबू लागला. श्वास घेता येत नसल्याचं जॉर्ज फ्लॉईड ओरडून ओरडून सांगत होता. पण त्या पोलीस अधिकाऱ्यावर त्याचा परिणाम झाला नाही.
शेवटी 6 मिनिटांनंतर जॉर्ज फ्लॉईड यांचा आवाज बंद झाला आणि तब्बल साडे आठ मिनिटांनंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने आपला गुडघा जॉर्जच्या मानेवरून काढला. मात्र, तोवर जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू झाला होता.
हे आंदोलन आता अमेरिकेबाहेरच्या शहरातही पसरलं आहे. लंडन, बर्लिन, ऑकलँड या शहरांमध्ये निदर्शनं करण्यात आली. सोशल मीडियावरही काळ्या चौकनांचा पूर आला आहे. 2 जून हा #BlackoutTuesday म्हणून घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर आंदोलनाला पाठिंबा देणारे लाखो मेसेजेस आले.
87 वर्षांच्या जेन इलिऑट (Jane Elliott) यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वर्णद्वेषविरोधी जागरुकतेच्या कामी खर्च केलं आहे.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सध्या सुरू असलेली निदर्शनं आम्ही श्वेतवर्णियांनी निर्माण केलेल्या परिस्थितीचा परिणाम आहे. आमच्या वर्तणुकीचे परिणाम आम्ही भोगतोय. तुम्ही बुद्धीमान लोकांचा 300 वर्षं छळ कराल आणि ते अनिश्चितकाळासाठी तो सहन करतील, अशी अपेक्षा करता येत नाही."

फोटो स्रोत, Getty
या निदर्शनांदरम्यान काही ठिकाणी दंगलीही भडकल्या आणि त्या इतक्या मोठ्या होत्या की त्यांची तुलना 4 एप्रिल 1968 रोजी पेटलेल्या दंगलींशी करण्यात येतेय. या दिवशी अमेरिकेतले थोर समाजसुधारक, जगभरात मानवाधिकाराचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे आणि अमेरिकेत समान नागरी अधिकार चळवळीचे नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांची हत्या करण्यात आली होती.
ही घटना तरुण जेन इलिऑट यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. तिथून पुढे त्यांनी व्यावहारिक प्रयोगांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या मनात असलेल्या पूर्वग्रहाची जाणिव करून देण्याचं आणि नकळत होणारा भेदभाव उघड करण्याचं काम सुरू केलं आणि अगदी अल्पावधित वर्णद्वेषविरोधी कार्यकर्त्या म्हणून जगाला त्यांची ओळख झाली.
ब्लू आईज, ब्राऊन आईज

फोटो स्रोत, Getty
वर्णद्वेष समाजात किती सहज रुजला आहे, हे लोकांना कळावं, असं इलिऑट यांना वाटायचं.
मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांची हत्या झाली त्यावेळी इलिऑट आयोवा प्रांतातल्या एका गावातल्या माध्यमिक शाळेत नुकत्याच शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

दुसऱ्या दिवशी त्या शाळेत गेल्या. मात्र, आज विद्यार्थ्यांना वर्णद्वेष आणि त्यामुळे होणारं नुकसान याबाबत शिकवण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एक प्रयोग आखला. याला त्यांनी नाव दिलं 'ब्लू आईज, ब्राऊन आईज'.
हा एक अत्यंत साधा प्रयोग होता. एखादी व्यक्ती स्वतःला केवळ कातडीच्या रंगावरून कुणापेक्षातरी वरचढ, श्रेष्ठ समजू लागते तेव्हा त्याचे धोके काय असतात, हे दाखवणं हा या प्रयोगामागचा हेतू होता.
इलिऑट यांनी विद्यार्थ्यांना दोन गटात विभागलं. एका गटाला त्यांनी तपकिरी रंगाचा रुमाल दिला आणि तुम्ही 'ब्राऊन आईज' टीम असल्याचं सांगितलं. दुसऱ्या गटाला निळे रुमाल दिले आणि तुम्ही 'ब्लू आईज' टीम असल्याचं सांगितलं.
यानंतर त्यांनी संपूर्ण वर्गात सांगितलं की 'ब्राऊन आईज' टीम अधिक हुशार आणि स्वच्छताप्रिय आहे आणि याचं बक्षीस म्हणून त्यांना काही विशेष सवलती उदाहरणार्थ खेळण्यासाठी अधिकचा वेळ दिला.
पुढे त्या म्हणाल्या की 'ब्लू आईज' टीम सगळं बिघडवून ठेवते. त्यामुळे ब्राऊन आईज टीम ज्या ठिकाणावरून पाणी पिते तिथलं पाणी पिण्यासाठी ब्लू आईज टीमने डिस्पोजेबल ग्लासचा वापर करावा. जेणेकरून त्यांची लागण कुणाला होऊ नये.
इलिऑट सांगतात, मी सूचना केल्याबरोबर दोन्ही गटांच्या वागण्यात तात्काळ फरक पडला. ब्राऊन आईज टीममधली मुलं ब्लू आईज टीममधल्या मुलांशी अधिक आत्मविश्वासाने, अहंकाराने आणि निष्ठूरपणे वागू लागली.

फोटो स्रोत, Getty
पुढच्या सोमवारीही त्यांनी हाच प्रयोग पुन्हा केला. मात्र, यावेळी त्यांनी टीम बदलल्या.
प्रयोगाच्या शेवटी त्यांनी मुलांना त्यांचे अनुभव विचारले. डेबी हग्ज नावाच्या एका मुलीने सांगितलं, "ब्राऊन आईज टीममध्ये असलेले विद्यार्थी ब्लू आईज टीममध्ये असलेल्या मुलांशी भेदभावाने वागले. मी जेव्हा ब्राऊन आईज टीममध्ये होते तेव्हा मला वाटलं की माझी इच्छा झाली तर मी त्यांना मारूही शकतो. मात्र, जेव्हा आमच्या टीम बदलल्या, तेव्हा मला शाळेतून पळून जावं असं वाटलं. खूप संताप झाला. कुणी तुमच्याशी भेदभाव केला तर अशाच भावना मनात येतात."
डेबी हगच्या मित्रमैत्रिणींनाही असेच अनुभव आले. स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनच्या वेबसाईटवरही डेबी हगच्या अनुभवाची नोंद घेण्यात आली. इलिऑट या प्रयोगाचं "वर्णद्वेषरूपी जिवंत विषाणूचं इंजेक्शन" असं वर्णन करतात.
'ब्लू आईज, ब्राऊन आईज' प्रयोगाला बघताबघता जगभरात प्रसिद्धी मिळाली. पुढे अनेक वर्ष जगभरातल्या अनेक देशांमध्ये हा प्रयोग झाला आणि त्यात हजारो लोकांनी भाग घेतला.
2016 साली बीबीसीने एकवीसाव्या शतकात महिलांची भूमिका काय, हे पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या 100 वुमेन प्रोजेक्टच्या यादीत इलिऑट यांचाही समावेश करण्यात आला होता.
इलिऑट यांच्या प्रयोगावर टीकाही झाली. काहींनी त्याला 'ओरवेलियन' प्रयोग म्हटलं. ( जॉर्ज ओरवेलियन यांनी स्वतंत्र आणि मुक्त समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने विध्वंसक असणाऱ्या काही कल्पना सांगितल्या होत्या.) या प्रयोगाद्वारे स्वतःविषयी घृणा बाळगण्याची शिकवण मिळत असल्याचा आरोप काहींनी केला. डेनव्हर पोस्ट या दैनिकात एका लेखकाने या प्रयोगाला 'राक्षसी' प्रयोग म्हटलं.
साधा प्रश्न
इलिऑट यांनी आपला प्रयोग फक्त शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवला नाही. त्यांच्यावर 'ब्लू आईज' नावाची एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. 1996 साली आलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये इलिऑईट यांच्या सर्वोत्तम व्याख्यानापैकी एक असलेल्या व्याख्यानाचा समावेश करण्यात आला आहे.
प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहाला इलिऑट यांनी विचारलं, "माझी इच्छा आहे की या खोलीतल्या त्या प्रत्येक श्वेतवर्णियाने उभं रहावं ज्याला हा समाज कृष्णवर्णियांना जशी वागणूक देतो तशी वागणून मिळाली तर आनंद होईल."

फोटो स्रोत, Getty
सभागृहात शांतता पसरली. इलिऑट पुन्हा म्हणाल्या, "तुम्हाला मी काय म्हणतेय ते कळलं नाही का? मी म्हणतेय की आपला समाज कृष्णवर्णियांशी जसा वागतो तसाच आपल्याशीही वागला तरी चालेल असं वाटणाऱ्या श्वेतवर्णियांनी उभं रहावं."
काही सेकंदांच्या शांततेनंतर त्या म्हणाल्या, "कुणीही नाही. याचा अर्थ जे काही घडतंय ते तुम्हाला कळतंय आणि तसं आपल्याबाबतीत घडू नये, असंही तुम्हाला वाटतं. असं असेल तर तुम्ही इतरांच्या बाबतीत हे का घडू देता?"
श्वेतवर्णीय नागरिक वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्याची हिम्मत का दाखवत नाही, याचं कारण सांगताना इलिऑट बीबीसीला म्हणाल्या, "कारण त्यांना भीती आहे की त्यांनी असं केलं तर या देशात इतर रंगाच्या लोकांना जशी वागणूक मिळते तशीच वागणूक त्यांना मिळेल."
रंगावरून (melanin) व्यक्तिमत्व ठरत नाही
इलिऑट म्हणतात जे अगदी साधं, सोपं आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या प्रयोगाच्या माध्यमातून मी हेच दाखवू इच्छिते. वर्णद्वेष अगदी लहानपणापासून भिनवला जातो.
त्या पुढे म्हणतात, "एखादी व्यक्ती जी श्वेतवर्णीय असेल, अमेरिकेत जन्मली आणि लहानाची मोठी झाली असेल आणि ती वर्णद्वेषी नसेल तर हा एक चमत्कार आहे."
"वर्णद्वेष शिकलेला गुण आहे. म्हणजेच तो अंगभूत नाही. मी श्रेष्ठ आहे, असं शिकून कुणी जन्माला येत नसतं. ते शिकवलं जातं आणि या देशात आपण हेच शिकवतोय."
त्यांच्या मते अमेरिकी शिक्षण यंत्रणेला, "कुठल्याही किंमतीत श्वेतवर्णियांच्या वर्चस्वाचं मिथक टिकून ठेवण्यासाठी" डिझाईन केलं गेलंय.
मात्र ,ज्या पद्धतीने वर्णद्वेष रुजवण्यात आला त्याच मार्गाने तो नष्टही केला जाऊ शकतो.
इलिऑट म्हणतात, "वर्णद्वेषी होऊ नका, असंही शिकवता येईल."
"डोळे आणि कातडीचा रंग ठरवणारं जे केमिकल किंवा रंगद्रव्य आहे ते सर्वांमध्ये सारखंच आहे - मेलॅनीन. एखाद्याच्या शरीरात हे रंगद्रव्य किती प्रमाणात आहे, यावरून त्या व्यक्तीची पारख करण्यात शहाणपण नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








