कोरोनानंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी किती काळ लागेल?

A restaurant closes its doors

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जगभरातल्या शेकडो देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, त्यामुळे आर्थिक हालचाली ठप्प झाल्या आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.

रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आता अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट द्यायला सुरूवात केली आहे.

कोरोनाच्या फटक्यामुळे यंदा जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज जागतिक नाणेनिधीने (International Monetary Fund - IMF) वर्तवला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची चाहूल लागण्यापूर्वी याच संस्थेने यंदा जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांनी वधारणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं.

1930 साली आलेल्या जागतिक महामंदीनंतर यंदा पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. मात्र, ही परिस्थिती किती काळ राहील आणि यातून बाहेर कसं पडता येईल?

मंदीचा नेमका अर्थ

सलग दोन आर्थिक तिमाहीमध्ये ढोबळ राष्ट्रीय उत्पादनात (Gross Domestic Product - GDP) घसरण म्हणजे मंदी, अशी व्याख्या अनेक देशांमध्ये केली जाते.

जागतिक महामंदी

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (NBER) या संस्थेच्या व्याख्येनुसार आर्थिक मंदी म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतल्या आर्थिक घडामोडींमधली म्हणजेच सामान्यपणे प्रत्यक्ष जीडीपी, प्रत्यक्ष उत्पन्न, रोजगार, औद्योगिक उत्पादन आणि घाऊक आणि किरकोळ विक्री यांच्यात सलग काही महिन्यांपेक्षा जास्त काळ दिसणारी लक्षणीय घट.

2020 च्या दुसऱ्या तिमाहित जग कोव्हिड- 19 च्या सर्वात वाईट परिणामांचा सामना करत असल्याचा आयएमएफचा अंदाज आहे. मात्र, 2020 च्या उत्तरार्धात उद्योगधंदे हळूहळू सुरू होतील आणि हे दुष्परिणाम ओसरतील, अशी आशाही व्यक्त होत आहे.

कोरोना
लाईन

मात्र, या वर्षीच्या उत्तरार्धातही लॉकडाऊन कायम ठेवल्यास अनेक उद्योगधंदे बंद पडतील आणि अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. त्या परिस्थितीत मंदीची तीव्रता दुप्पट असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा वेग अत्यंत धीमा असेल. याचाच अर्थ आपण मंदीच्या उंबरठ्यावर आहोत.

अर्थतज्ज्ञ मंदी आणि मंदीतून सुधारणा या संकल्पनांची मांडणी इंग्रजीतल्या V, U, W किंवा L या आकारांच्या ग्राफमधून करतात.

कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ चिलीमध्ये अर्थतज्ज्ञ असणारे जोस टेसॅडा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "जीडीपी वाढ दर्शवणाऱ्या ग्राफच्या आकाराच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती समजावून घेता येते."

A man walking past closed shops

फोटो स्रोत, Getty Images

आदर्श परिस्थिती : V

ही सर्वोत्तम परिस्थिती मानली जाते. अशा प्रकारच्या मंदीची सुरुवात तीव्र घसरणीने होते. मात्र, एकदा तळ गाठल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेते आणि आर्थिक सुधारणा लवकर होतात.

प्रा. टेसॅडा सांगतात, "यात अर्थव्यवस्था जवळपास पूर्वीच्या पातळीवर परत येते. या परिस्थिती मंदी फार काळ टिकत नाही. मात्र, हा थोडा काळही काही तिमाहींचा असू शकतो."

ते पुढे सांगतात, "कोरोना संकटावर नियंत्रण मिळवता आलं तर निर्बंध उठतील आणि आर्थिक विकास पुन्हा पूर्वीच्या पातळीवर स्थिरावेल. ही V आकाराची मंदी असेल."

S&P Global Ratings कंपनीत मुख्य अर्थतज्ज्ञ असलेले पॉल ग्रँवॅल्ड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सोशल डिस्टंसिंगची बंधनं लवकरात लवकर उठवली गेली किंवा लस किंवा उपचार शोधण्यात यश आलं तर आपण लवकरच मूळ मार्गावर परतू शकतो."

2020 सालच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 9 टक्क्यांची घसरण होऊ शकते, असा अंदाज S&Pने वर्तवला आहे. त्यामुळे या मंदीतून बाहेर पडणं फारसं सोपं नसेल, असं पॉल ग्रँवॅल्ड यांना वाटतं.

A couple walks on the street in Germany

फोटो स्रोत, Getty Images

सर्वाधिक शक्यता असलेली परिस्थिती : U

2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत एकूण 2.4 टक्क्यांची घसरण होईल तर 2021 मध्ये 5.9 टक्क्यांने वाढेल, असा अंदाज S&Pने व्यक्त केला आहे.

ग्रँवॅल्ड म्हणतात, "आताची परिस्थिती बरीचशी U आकाराची दिसते आहे. अधिक स्पष्ट सांगायचं तर हा U अधिक रुंद आहे. म्हणजेच या परिस्थितीतून आपण बाहेर येऊ. मात्र, त्याचा वेग अत्यंत धीमा असणार आहे."

मूडीज इन्व्हेस्टर सर्विसमध्ये असोसिएट मॅनेजिंग डिरेक्टर असणाऱ्या एलेना डगर यांचंही असंच मत आहे. कोरोना विषाणू पॅन्डेमिकचा 'डाग' आपल्या अर्थव्यवस्थेर 2021 सालीही कायम राहील, असा अंदाज मूडीज इन्व्हेस्टर सर्विसने व्यक्त केला आहे.

बीबीसी न्यूज मुंडोशी बोलताना एलेना डगर म्हणाल्या, "2020 च्या पूर्वार्धात आपण जेवढं आर्थिक आउटपुट गमावलं आहे त्याची भरपाई वर्षाच्या उत्तरार्धात होणार नाही."

मात्र, त्याचवेळी चीनमधल्या घडामोडी बघता त्यांना आशेचा किरणही दिसतो. चीनमध्ये मंदी आणि त्यातून बाहेर पडणं, दोन्ही जगाच्या तुलनेत एक तिमाही आधी सुरू झाली आहे.

त्या म्हणतात, "चीनमध्ये लॉकडाऊन उठवण्यात येत आहे. कारखाने पुन्हा सुरू होत आहेत. उद्योगधंदे 45 ते 70 टक्के क्षमतेने सुरू झाल्याचंही वृत्त आहे."

दुसरीकडे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात सरकारनेही तातडीने पावलं उचलली आहेत.

डगर म्हणतात, "निर्बंध उठवण्यात आली आणि उद्योगव्यवसाय सुरू झाले तर याचवर्षीच्या उत्तरार्धात थोडीफार सुधारणा होईल, अशी आम्हाला आशा आहे."

जागतिक महामंदी

फोटो स्रोत, Getty Images

खाचखळगे असलेली परिस्थिती : W

मात्र, सध्यातरी कोव्हिड-19 आजारावर कुठलेही उपचार नाहीत किंवा लसही विकसित झालेली नाही. त्यामुळे आपल्यासमोर अनेक अडचणी असल्याचं ग्रँवॅल्ड म्हणतात.

सराकर निर्बंध शिथील करून आर्थिक घडामोडींना चालना देऊ शकते. मात्र, कोरोना विषाणूची दुसरी लाट आली तर पुन्हा नव्याने लॉकडाऊन लागू करावा लागेल. परिणामी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल.

प्रा. टेसॅडा म्हणतात की त्या परिस्थितीत अर्थव्यवस्था दोनदा तळ गाठू शकते किंवा W आकाराची मंदी येऊ शकते.

ते म्हणतात, "या आकाराच्या मंदीत अंतिम सुधारणा थोड्या अंतराने होते. म्हणजे सुधारणा होते. मात्र, त्याआधी वर येत असलेला अर्थव्यवस्थेचा ग्राफ पुन्हा खाली जातो आणि नंतर पुन्हा वर येतो. अशा प्रकारे मागे-पुढे होत राहिलो तर सामान्य पातळीवर परतण्यासाठी जास्त वेळ लागेल."

Wall Street

फोटो स्रोत, Getty Images

न्यू नॉर्मल : L

कोव्हिड-19 मुळे जग पूर्णपणे बदलणार असल्याचंही अनेकांना वाटतं. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही 'न्यू नॉर्मल'कडे ढकलली जाईल का, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे.

ही परिस्थिती L आकाराची असेल. यात अर्थव्यवस्थेने एक तळ गाठल्यानतंर त्यात सुधारणा होईल. मात्र, या सुधारणेची पातळी खालचीच असेल. ती पूर्वीच्या पातळीवर नसेल.

प्रा. टेसॅडा म्हणतात, "या परिस्थितीत मंदीपेक्षा विकासाची पातळी अधिक महत्त्वाची ठरेल. L आकाराच्या परिस्थितीत विकासाची पातळी बरीच खाली गेलेली असेल."

कोव्हिड-19 आजारावर लस किंवा उपचार शोधले नाही तर विकासवाढीचा आकार रॉकी म्हणजेच W असेल आणि यामुळे दीर्घकालीन आर्थिक नुकसान होईल, असा इशारा S&Pने दिला आहे.

ते म्हणतात, या परिस्थिती 'सामान्य' पातळीवर पुन्हा परत येणं अशक्य असेल.

ग्रँवॅल्ड म्हणतात, "अर्थव्यवस्था सुधारणेचा ग्राफ V आकाराचा असेल की U आकाराचा. यापेक्षाही मोठा प्रश्न सध्या हा आहे की आपण पुन्हा पूर्वीच्या पातळीवर परत जाऊ शकू का? आणि तिथे परत जाण्यासाठी किती काळ लागेल?"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)