मर्डर हॉर्नेट्स - मधमाशांना मारून स्वत:च्या पिलांना खाऊ घालणाऱ्या गांधीलमाशीचा अमेरिकेत धुमाकूळ

अमेरिकेत कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असतानाच आणखी एक भयंकर हल्ला अमेरिकेवर झाला आहे - 'मर्डर हॉर्नेट्स' अर्थात गांधीलमाशीचा.

दोन इंच लांब या गांधीलमाशीचं शास्त्रीय नाव व्हेस्पा मँडरिना असं असून, वॉशिंग्टन राज्यात या माशीने काही दिवसांपूर्वी त्रास द्यायला सुरुवात केली आहे.

या माशीने केलेला डंख माणसाचा जीव घेऊ शकतो. ही गांधीलमाशी मधमाशांनाही ठार करते. ही गांधीलमाशी मधमाशांचं शरीर आपल्या पिलांना खाऊ घालते.

ही गांधीलमाशी अमेरिकेतील मधमाशांचा नायनाट करेल, त्यापूर्वी या गांधीलमाशीला नष्ट करण्यासाठी मोहीम शास्त्रज्ञांनी हाती घेतली आहे.

साधारणत: ही गांधीलमाशी माणसांच्या वाटेला जात नाही. परंतु, आशिया खंडात या गांधीलमाशीमुळे दरवर्षी 50 जण जीव गमावतात, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये उत्तर अमेरिकेत ही गांधीलमाशी पहिल्यांदा आढळली होती. काही महिन्यांनंतर वॉशिंग्टन राज्यात गांधीलमाशी दिसली होती.

गांधीलमाशी अमेरिकेत आली कशी असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे. मात्र या गांधीलमाशीने गेल्या काही महिन्यात लोकांचा जीव घेतला आहे. गांधीलमाशीची उत्पती नेमकी कुठे आणि कशी होते आहे याकडे शास्त्रज्ञांचं लक्ष आहे.

ही गांधीलमाशी प्रचंड मोठी असते. आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी आणि मधमाशांकरता कर्दनकाळ आहे, अशा शब्दात शास्त्रज्ञ टॉड मरे यांनी या गांधीलमाशीचं वर्णन केलं.

एका आगपेटीएवढा गांधीलमाशीचा आकार असतो. पिवळसर-केशरी असं तिचं डोकं असतं. वेध घेणारे काळेकभिन्न डोळे असतात तर पोटाकडची बाजू काळी पिवळी असते.

पिवळ्या-केशरी रंगाचं अवाढव्य कार्टून असंच या गांधीलमाशीचं वर्णन करावं लागेल असं सुसान कोबे यांनी सांगितलं. इन्टॉमॉलॉजी विभागात ते मधमाशी पालन विभागात काम करतात.

आशियातल्या या खंडप्राय माशीचं आयुष्य साधारणत: एप्रिल महिन्यात सुरू होतं. ज्यावेळी राणी माशी सुप्तावस्थेतून बाहेर येते.

घर बांधून तयार झाल्यानंतर गांधीलमाशी अन्न शोधायला बाहेर पाठवते.

अणुकुचीदार अशी शस्त्ररूपी पाती मधमाशांना मारण्यात उपयोगी ठरतात. याच मधमाशा गांधीलमाशी आपल्या पिलांना खाऊ घालते. अवघ्या काही तासात मधमाशीचं पोळं ही गांधीलमाशी नष्ट करते.

मधमाशांचं पोळं हे गांधीलमाशीचं मुख्य उद्दिष्ट असतं. मात्र ते माणसांनाही लक्ष्य करतात. जपानमध्ये या गांधीलमाशा सर्रास आढळतात, त्या 30 ते 40 लोकांना ठार मारतात.

लाल गरम तीक्ष्ण काहीतरी माझ्या शरीरात घुसावं असा तो डंख होता, असं व्हँन्कोव्हरच्या मधमाशी पालन केंद्राचे कॉनराड बेरुबे यांनी सांगितलं.

गांधीलमाशीचा शोध घेण्यासाठी तिच्या वास्तव्याच्या ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे.

अमेरिकेत मधमाशांचं प्रमाण कमी होत चालल्याने चिंता वाढली आहे. 1947 ते 2017 या कालावधीत 6 दशलक्षवरून हे प्रमाण 25 लाख एवढं झालं. मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं की हिवाळ्याच्या हंगामात देशातल्या 40 टक्के मधमाशांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत हा संहार झाला.

अमेरिकेत मध हे आहाराचा प्रमुख घटक आहे. अमेरिकेच्या पिकांच्या उत्पादनात 15 बिलिअनची भर घालण्याचं काम मध उत्पादनाने होतं असं अमेरिकेच्या कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)