डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधल्या स्मारकाचा खटला महाराष्ट्राने जिंकला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील स्मारकाच्या नूतनीकरणासाठीचा खटला महाराष्ट्र सरकारने जिंकला आहे. यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

इंग्लडमधील खासदार रॉबर्ट जेनरिक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

"डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शुभेच्छा. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. असंख्य ब्रिटिश-भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असलेली व्यक्ती म्हणजे डॉ. आंबेडकर," असं रॉबर्ट जेनेरिक यांनी म्हटलं.

डॉ. आंबेडकर ज्या इमारतीमध्ये राहत असत त्या इमारतीचं स्मारक व्हावं यासाठी खासदार जेनेरिक यांनी प्रयत्न केले होते.

काय आहे हे प्रकरण?

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना 1921-22 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या चार मजली इमारतीत राहिले होते. ही इमारत लंडनमधील हेन्री रोडवर आहे. ही इमारत खासगी होती. महाराष्ट्र शासनाने ही इमारत 30 कोटी रुपयांना विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक बनवलं.

या स्मारकाचं नूतनीकरणाचं काम महाराष्ट्र सरकारने भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून सुरू केलं होतं. पण हेन्री रोड ज्या भागात आहे त्या स्थानिक प्रशासनाने म्हणजेच कॅमडन काउन्सिलने आक्षेप घेतला.

हा भाग निवासी आहे. डॉ. आंबेडकरांच्या सदनाला भेट देणाऱ्या लोकांमुळे स्थानिक लोकांना त्रास होतो असा आक्षेप कॅमडन काउन्सिलने घेतला होता. हा वाद न्यायालयात गेला.

हा खटला भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जिंकल्यामुळे आता या स्मारकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॅमडन काउन्सिलची प्रतिक्रिया

या खटल्यातील महाराष्ट्र शासनाचे प्रतिवादी कॅमडन काउन्सिल यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. हा खटला हरल्यामुळे आम्ही निराश झालो असलो तरी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर राखून आम्ही हा निकाल स्वीकारत आहोत, असं कॅमडन काउन्सिलचे प्रवक्ते बेथनी जॉन्सन यांनी बीबीसीचे लंडनमधील प्रतिनिधी गगन सबरवाल यांना इमेलद्वारे सांगितलं आहे.

या स्मारकाला किमान 50 जण आठवड्याला भेट देतात. या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील भेट दिली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)