You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरः लंडनमधल्या आंबेडकर स्मारकात रोज जाणाऱ्या शारदाताई
- Author, शैली भट्ट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्म दिला, सन्मान दिला. त्यांनीच आमचं आयुष्य घडवलं,'' मूळच्या मुंबईकर मात्र आता लंडनला असलेल्या शारदा तांबे डॉ. आंबेडकरांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करतात. केवळ बोलून नव्हे तर लंडनस्थित डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला दररोज भेट देऊन त्या कृतज्ञता व्यक्त करतात.
लंडन शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काही काळ वास्तव्य होतं. त्या घराचं महाराष्ट्र सरकारनं आता स्मारकात रुपांतर केलं आहे. शारदाताई दररोज न चुकता या स्मारकाला भेट देतात. आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करतात.
इथं येणं हा त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.
इथे येण्यामागची भावना शारदाताई उलगडून सांगतात. त्या म्हणतात, ''तेव्हा समाजात जातीभेद होता, आम्हाला घराबाहेर उभं केलं जायचं. आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला. त्यानंतर आम्ही मुक्त पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली.''
65 वर्षीय शारदा तांबे लंडनमध्ये आंबेडकर स्मारकाजवळच राहतात.
''डॉ. आंबेडकरांमुळे आम्हाला सन्मान मिळाला. त्यांच्यामुळेच सर्वकाही मिळालं. आयुष्य घडलं. माझ्यासाठी जगात त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही,'' असं शारदाताई सांगतात.
''मी स्मारकापासून जवळ राहते. चार बसस्टॉप दूर माझं घर आहे. पण मी लांब राहत असते तरी मी एक आड एक दिवस इथे आले असते. इथं येणं माझ्यासाठी श्रद्धेय आहे. खूप दूर राहत असते तर महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा अशी फेरी नक्कीच मारली असती.''
त्या पुढे सांगतात, ''डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेण्याची संधी मला रोज मिळते. त्यासाठी रोज संध्याकाळी मी इथं येते. स्मारकाचा दरवाजा बंद असेल तर इथला दिवा प्रज्वलित करून जाते.''
मुंबई ते लंडन हे संक्रमण शारदाताईंसाठी सोपं नव्हतं. 2002मध्ये त्या लंडनमध्ये राहण्यास आल्या. मुंबईत राहणाऱ्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना लंडनला येणं भाग होतं. तेव्हापासून त्या लंडनमध्ये घरकाम करतात.
लंडन का? यामागचं कारण त्या उलगडतात. "पैशाचा खूप प्रॉब्लेम होता. मला येणं भाग होतं. मुलं मोठी होती. त्यांना समजावलं की पैशाची गरज आहे. मी एकटी जायला घाबरले नाही कुणाच्या समोरही. फक्त इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. मोडकंतोडकं इंग्रजी बोलून काम चालवून न्यायचे''.
डॉ. आंबेडकरांचा दिलेला संदेश तरुण पिढीसाठी महत्त्वाचा आहे असं शारदाताई सांगतात. त्या म्हणाल्या, ''शिक्षण घेऊन मुलींनी वाटचाल करावी. बाबासाहेबांसारखं शिक्षण त्यांनी घ्यायला हवं. बाबासाहेबांच्या वेळी वीजपुरवठा नव्हता. एका बत्तीच्या खांबाखाली बसून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आता मुलामुलींना सोयीसुविधा मिळतात. त्यांचा फायदा घेऊन बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र जपायला हवा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.''
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)