मारिया शारापोव्हा: पाच ग्रँड स्लॅम विजेत्या टेनिसपटूने 32व्या वर्षी घेतली निवृत्ती

पाच ग्रँड स्लॅम विजेती असलेल्या मारिया शारापोव्हाने 32 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.

व्होग आणि व्हॅनिटी फेअर मासिकांसाठी लिहिलेल्या लेखात मारिया म्हणते खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर माझं शरीर 'अडथळा' ठरत आहे.

रशियाच्या मारिया शारापोव्हाने 2004 साली वयाच्या 17व्या वर्षी विंबल्डन जागतिक टेनिस स्पर्धेत पहिलं ग्रँडस्लॅम पटकावलं आणि 2012 साली फ्रेंच ओपन स्पर्धेचं ग्रँड स्लॅम जिंकत चारही मानाच्या ग्रँड स्लॅमवर नाव कोरलं.

मेलडोमिन चाचणीत दोषी सिद्ध झाल्याने 2016 साली तिच्यावर 15 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

2017 मध्ये तिने पुनरागमन केलं. मात्र पूर्वीचा सूर तिला गवसला नाही. तसंच शारीरिक दुखापतींमुळेही ती हैराण झाली होती.

परिणामी तिचं मानांकन 373व्या स्थानापर्यंत खाली घसरलं होतं. गेल्या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तर ती पहिल्या फेरीतच बाद झाली.

निवृत्ती जाहीर करताना ती म्हणाली, "हे माझ्यासाठी नवीन आहे. तेव्हा मला माफ करा. टेनिस - मी अलविदा म्हणते."

ती पुढे लिहिते, "मागे वळून बघताना मला जाणवतं की टेनिस माझा पर्वत होता. माझा मार्ग डोंगर-दऱ्यांनी भरलेला होता. मात्र, या पर्वतमाथ्यावरून दिसणारी दृश्यं अप्रतिम होती."

"28 वर्षं आणि 5 ग्रँड स्लॅमनंतर आता मी पुन्हा एकदा पर्वत चढण्यासाठी सज्ज झाले आहे. अर्थातच दुसऱ्या क्षेत्रातला."

"मात्र, यशाचा अथक पाठलाग? तो कधीच कमी होणार नाही. पुढे काय आहे, याने काहीच फरक पडत नाही. मी आतापर्यंतच्या प्रवासात जे शिकले, तोच फोकस, कामातील नैतिकता पुढच्या प्रवासातही लागू करणार आहे."

"दरम्यानच्या काळात काही साध्या गोष्टी मला करायच्या आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. सकाळची निवांत कॉफी घ्यायची आहे. विकेंडला भटकंती करायची आहे आणि माझ्या आवडीचं वर्कआउट (डान्स क्लास) तेही करायचं आहे."

शारापोव्हा म्हणते गेल्यावर्षीच्या युएस ओपनमध्ये सेरेना विलियम्सकडून पहिल्या फेरीत 6-1, 6-1 नं झालेला पराभव तिच्यासाठी 'फायनल सिग्नल' ठरला.

ती म्हणते, "बंद दाराआड, कोर्टवर जाण्याच्या 30 मिनिटं आधी मॅच खेळता यावी, यासाठी मी खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती."

"माझ्यासाठी खांद्याच्या दुखापती नवीन नाहीत. बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि अनेक महिने फिजियोथेरपी घ्यावी लागली आहे."

"त्या दिवशी कोर्टवर जाणंचं माझ्यासाठी जिंकणं होतं. खरंतर जिंकण्याच्या दिशेने ते पहिलं पाऊल होतं."

त्या मॅचनंतर 2019मध्ये ती परत कोर्टवर गेली नाही. 2020मध्ये ती दोन स्पर्धां खेळली.

नवीन सहस्त्रक सुरू होऊन जेमतेम चार वर्षं झाली होती. टेनिसच्या कोर्टवर विनस आणि सेरेना विलियम्स बहिणींचा बोलबाला झाला होता. अशावेळी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी म्हणजे अगदी तरुण वयात मारियाने विम्बलडनच्या कोर्टवर सेरेनाला धूळ चारली आणि तिसरी सर्वांत तरुण विंबल्डन विजेती ठरली.

पुढे तिची कारकीर्द चांगलीच बहरली. महिलांच्या खेळात मारिया शारापोव्हा हाय-प्रोफाईल नाव ठरलं. तिने महिला एकेरीत तब्बल 36 विजेतेपद मिळवले तिच्या बक्षिसांची एकूण रक्कम आहे 3 कोटी 80 लाख डॉलर्स.

2005मध्ये यूएस ओपनवर तिने नाव कोरलं आणि टेनिसच्या महिला एकेरीत ती अग्रमानांकित ठरली.

2007 पासून तिच्या दुखापतींना सुरुवात झाली. 2008 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत पुनरागमन केलं. मात्र, पुन्हा खांद्याला दुखापत झाल्याने त्यावर्षीच्या यूएस ओपन आणि बिजिंग ऑलिम्पिक या दोन मोठ्या स्पर्धांना तिला मुकावे लागले.

2012 मध्ये तिने रोलान्ड गॅरोजला नमवत फ्रेंच ओपन ही एकमेव लाल मातीवरची ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. या पदकासोबतच सर्वच्या सर्व चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती दहावी महिला खेळाडू ठरली. यानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडलही पटकावलं.

मात्र, पुन्हा एकदा झालेल्या खांद्याच्या दुखापतीने 2013 च्या मध्यानंतर तिला कोर्टाबाहेर राहावं लागलं. मात्र, त्यानंतरच्या वर्षी तिने पुन्हा एकदा फ्रेंच ओपनवर नाव कोरलं आणि तिच्या ग्रँड स्लॅमची संख्या पाचवर पोचली.

'मेलोडिअम बॅन'

मार्च 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान तिच्यावर मेलोडिअम बंदी घालण्यात आली. मारिया शारापोव्हाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याच वर्षी 1 जानेवारीपासून मेलोडिअम या हृदयरोगावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधावर टेनिस संघटनेने उत्तेजक द्रव्य म्हणून बंदी घातली होती.

मात्र, 2006 पासूनच आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे या गोळ्या घेत असल्याचं तिने सांगितलं. या औषधाला बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत टाकल्याची माहिती आपल्याला नव्हती आणि आपण कामगिरी सुधारण्यासाठी कुठलंही उत्तेजक द्रव्य घेतलं नव्हतं, असं तिचं म्हणणं होतं.

तिच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली. मात्र तिने बंदीविरोधात अपिल केलं आणि तिच्यावरची बंदी 15 महिन्यांवर आणण्यात आली.

एप्रिल 2017 मध्ये तिने बंदीनंतर पुनरागमन केलं. त्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या तन्जानिया ओपन स्पर्धेत ती पहिली आली आणि तेच तिचं शेवटचं विजेतेपद ठरलं.

2018 च्या फ्रेन्च ओपनमध्ये तिने क्वाटर फायनलपर्यंत धडक दिली. तर 2019 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती लास्ट 16 राउंडपर्यंतच मजल मारू शकली. तिच्या दुखापती आणि गमावलेला सूर यामुळे तिच्यातलं टेनिस आता संपत आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)