You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साक्षी मलिकला कुस्तीत हरवणाऱ्या मुलीची गोष्ट
- Author, सत सिंह
- Role, बीबीसीसाठी
रिओ ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकचा पराभव करून 18 वर्षांची पहेलवान सोनम मलिकने अलीकडेच मोठी उलथापालथ घडवली.
आता ऑलम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धांमध्ये ती नशीब आजमावेल. पण हा मैलाचा दगड गाठेपर्यंतचा तिचा प्रवास संघर्षमय होता.
सोनीपतमधल्या मदिना गावातले पहेलवान राजेंदर मलिक यांना लोक 'राज पहेलवान' म्हणून ओळखतात. आपल्या मुलीला, सोनमला, करियर करता येईल अशा खेळाच्या शोधात ते काही वर्षांपूर्वी होते.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.
हा खेळ कोणताही असू देत पण कुस्ती नसणार यावर ते ठाम होते. खरंतर राजेंदर मलिक स्वतः कुस्तीपटू होते आणि पहेलवान मास्टर चंदगी राम यांच्या दिल्लीतल्या आखाड्यात त्यांनी प्रशिक्षणही घेतलं होतं.
राजेंदर सांगतात, "राष्ट्रीय स्पर्धांच्या आधीच मी जखमी झाल्यामुळे कधीच देशासाठी खेळू शकलो नाही, त्यामुळे माझी सगळी मेहनत वाया गेली. माझे अनेक मित्र उत्कृष्ट खेळाडू होते, पण जखमी झाल्यामुळे त्यांचं चांगलं करिअर वाया गेलं. माझ्या मुलीच्याही वाट्याला असं काही येऊ नये, अशी माझी इच्छा होती."
सोनमच्या कुस्ती-प्रवासाची सुरुवात
सोनमच्या सैन्यातल्या काकांचे आणि तिच्या वडिलांचे मित्र अजमेर मलिक यांनी 2011 साली स्वतःच्या शेतात आखाडा उघडून कुस्तीपटूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
सोनमचे वडील राजेंदर मित्राला भेटायला म्हणून आणि सोनमला सकाळी फिरायला न्यायला म्हणून अजमेर मलिका यांच्या आखाड्यात ये-जा करायचे.
त्यांची काटेकोर मेहनत, निग्रह आणि प्रशिक्षण शैली, यामुळे राजेंदर मलिका पुन्हा एकदा कुस्तीच्या जवळ आले. कुस्तीतच आपल्या मुलीचं भवितव्य उज्ज्वल असेल, असा विचार त्यांच्या मनात आला.
अजमेर मलिक यांच्या आखाड्यामध्ये फक्त मुलांनाच प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यामुळे सुरुवातीपासून सोनमला मुलांबरोबर प्रशिक्षण मिळालं, त्याचा तिला फायदाच झाला.
"प्रशिक्षक अजमेर यांनी अगदी सैनिकी पद्धतीने मला प्रशिक्षित केलं. मुलग्यांसारखंच प्रशिक्षण मलाही देण्यात आलं. मॅटवर पोचल्यावर कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असं कोच साहेबांचं म्हणणं होतं," सोनम सांगते.
कष्टाचं फळ
शाळेत एकदा खेळांमध्ये सोनमचा पहिला क्रमांक आला, आयपीएस अधिकारी सुमन मंजरी यांच्या हस्ते तिचा आणि तिच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.
"आयपीएस अधिकारी सुमन मंजरी यांच्यासारखं आपणही समाजात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असं मी त्याच दिवशी ठरवलं. त्यानंतर मग आंतरशालेय, जिल्हास्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये माझ्या समोर आलेल्या पहेलवानांना मी चितपट करत राहिले."
तेव्हापासून सुरू झालेल्या या प्रवासात आतापर्यंत पाच वेळा सोनम 'भारत केसरी' झाली आहे. सैन्यदलांतील सुभेदार पदावरून निवृत्त झालेले अजमेर केसरी सांगतात की, वय व अनुभव या दोन्हींमध्ये ख्यातकीर्त असलेल्या पहेलवांनांना सोनमने हरवलं आहे.
मोठ्या व बलशाली पहेलवानांच्या दबावाखाली न येता त्यांचा सामना करणं, हे सोनमचं वैशिष्ट्य मानलं जातं. प्रत्येक सामन्यात शंभर टक्के योगदान देण्याचा आपला प्रयत्न असतो, असं सोनम म्हणते.
अवघड काळ
2013 साली एका राज्यस्तरीय स्पर्धेवेळी सोनमच्या उजव्या हाताची हालचाल थांबली. काहीतरी लहानशी दुखापत असेल, असं तिच्या वडिलांना व प्रशिक्षकांना सुरुवातीला वाटलं. सोनमच्या म्हणण्यानुसार, "आम्ही काही देशी उपाय केले. पण हाताने काम करणं हळू हळू सोडून दिलं, आणि एके दिवशी हाताची हालचाल पूर्णपणे बंद झाली."
रोहतकमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरला हात दाखवला असता त्याने सोनमला कुस्ती विसरून जाण्यास सांगितलं. आपल्या मुलीला कुस्तीच्या अखाड्यात ढकलून आपली चूक झाली, असं राजेंदर यांनाही या वेळी वाटू लागलं.
आता सोनमला कोण स्वीकारणार, तिच्याशी कोणी लग्न करणार असे टोमणे शेजारपाजारचे लोक मारू लागले.
"दहा महिने उपचार सुरू होते, पण आम्ही मैदान सोडलं नाही. सोनम हातांऐवजी पायांनी सराव करत राहिली, कारण कुस्तीत पायांची भूमिका खूप मोठी असते. काहीही झालं तरी मैदान सोडण्याची तिची तयारी नव्हती. दहा महिने चाललेल्या उपचारानंतर डॉक्टरांनी सोनमला खडखडीत बरं केलं, मग सोनमने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही," राजेंदर अभिमानाने सांगतात.
दुखापत होणं हा जणू कुस्तीमधला दागिनाच आहे. तो अभिमाने मिरवायचा असं आपल्याला प्रशिक्षक अजमेर मलिक यांनी सांगितल्याची आठवण सोनम सांगते.
सोनमचं स्वप्न काय आहे?
बासष्ट किलो वजनी गटात सोनम येत असल्याने लोकांनी तिला सल्ला दिला की, ऑलम्पिक पदकविजेती साक्षी मलिकही याच गटात खेळते त्यामुळे त्यात सोनमला पुढे जाणं अवघड आहे.
"पण समोर साक्षी मलिक असल्यामुळे याच गटातून सामन्यात उतरायचा माझा हट्ट होता. साक्षीला हरवलं तर ऑलम्पिकमध्ये पदक निश्चित मिळेल, असं वाटत होतं, आणि तसंच झालं," सोनम सांगते. सध्या ऑलम्पिकच्या चाचणी फेरीसाठी ती तयारी करते आहे.
"मी साक्षीला हरवलं, म्हणजे 2020च्या ऑलम्पिकमध्ये किमान सुवर्णपदक तरी जिंकेनच," असं सोनम मलिक म्हणते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)