You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Australia Fires: ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टेनिसपटूंना मध्येच सामने का सोडावे लागतायत?
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे लाखो प्राण्यांचा जीव गेल्याच्या बातम्या येतच आहेत. निसर्गाची ही हानी पाहून जगभरातून हळहळ व्यक्त होताना, त्यासाठी मदतीचे प्रयत्नही सुरू आहेत.
मात्र त्यामुळे वाढणाऱ्या वायुप्रदूषणाचा फटका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला बसतोय.
मंगळवारी स्लोव्हेनियाची खेळाडू दॅलिला जोकुपोविच आणि स्वीडनच्या स्टेफनी वॉगेल यांच्यात एका क्वालिफायर सामना सुरू होता. तेव्हा जोकुपोविचला अस्वस्थ वाटू लागल्याने सामना अर्धवट सोडून जावं लागलं.
जोकुपोविच जागतिक क्रमवारीत 180व्या क्रमांकावर आहे. तिला त्रास होऊ लागला, तेव्हा सामना थांबवावा लागला तेव्हा असलेल्या 6-5, 5-6 असा रंगात आला होता.
"अतिशय वाईट परिस्थिती होती. मला याआधी असं कधीच झालं नाही," असं जोकुपोविच नंतर म्हणाली. "मला चालताही येत नव्हतं, मी चक्कर येऊन पडते की काय, असं मला वाटत होतं!"
हवेच्या खालावलेल्या दर्जामुळे सराव रद्द करावा लागला तसंच मंगळवारचा सामना खराब हवामानामुळे एक तास उशिराने सुरू झाला.
आयोजकांच्या मते हवेच्या दर्जावर "ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत" आणि तो सुधारण्याची शक्यता होती. या क्वालिफायर सामन्याचं पुढे काय होणार, असं विचारल्यावर जोकुपोविच म्हणाली, "ही हवा आमच्यासाठी चांगली नाही, त्यामुळे हे एकंदरच बरोबर नाही."
"अशी हवा पाहता आम्हाला खेळ होणार नाही, असं वाटलं होतं. मला जरा धक्काच बसलाय," असंही ती म्हणाली.
मेलबर्नमधील लोकांना सध्या घराच्या आत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच काल पाळीव प्राणी घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
आतापर्यंत 100,000 चौ. किमी. भागात या आगीमुळे 28 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जोकुपोविच म्हणाली, "मला फार वाईट वाटतंय आणि रागही आलाय. मी जिंकत होते आणि तरी मला पूर्ण खेळता आलं नाही."
"मला ना अस्थमा आहे, ना कधी उष्णतेमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे जरा मी घाबरलेच होते," तिने सांगितलं.
तिने कोर्टवरून बाहेर पडण्यापूर्वी आयोजक म्हणाले होते, "सामनास्थळी काय परिस्थिती आहे ते पाहून आणि वैद्यकीय टीमशी तसंच हवामान विभागाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल."
कॅनडाची खेळाडू युजीन बोचर्डलाही सामना अर्धवट सोडून जावं लागलं. तसंच रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि जर्मनीच्या लॉरा सिगमंड यांच्यातला प्रदर्शनीय सामनाही खराब वातावरणामुळे रद्द झाला होता.
जेव्हा मॅच रद्द झाली तेव्हा लॉरा सिगमंडची शारापोव्हावर 7-6, 6-5ने आघाडी होती.
"शेवटी शेवटी मला एकदम खोकल्याची उबळ यायला लागली. गेल्या काही आठवड्यांपासून मी आजारी होते, त्यामुळे असं होत असावं, असं आधी मला वाटलं. नंतर लॉरा अंपायरला तेच सांगू लागली तेव्हा मला कळलं की तिलाही त्रास होतोय," शारापोव्हा म्हणाली.
बीबीसीचे टेनिस खेळाविषयीचे प्रतिनिधी रसेल फ्युलर सांगतात, "जेव्हा खेळाडू मेलबर्नमध्ये येतात तेव्हा त्यांच्या फारशा तक्रारी नसतात. मात्र ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांची काही चूक नाही.
"खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येईल, असं मंगळवारी जाहीर केलं असतानाही खेळाडू कसे खेळायला गेले हेच आश्चर्य आहे. इतकी घाई करण्याची खरंतर काहीच गरज नाही.
"बुधवारी हवेचा रोख बदलणार आहे, पावसाचाही अंदाज आहे. मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी तीन फेऱ्या संपायला त्यांना बराच वेळ मिळणार आहे," असंही फ्युलर यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)