जीव धोक्यात घालून गरोदर फायर फायटरचा मोहिमेत सहभाग

"कोण काय म्हणतं याची मला पर्वा नाही. मी अग्निशमन दलातली कर्मचारी आहे आणि मी हे काम सुरूच ठेवणार," असं 23 वर्षांच्या केट रॉबिन्सन विलियम्सनं ठणकावून सांगितलं. केट ही ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स भागात फायर फायटर (स्वयंसेवक) आहे.

केट ही गरोदर आहे. गरोदर असूनही केट आगीशी झुंज देत आहे, आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहे. त्यामुळे तिच्या मित्र-मैत्रिणींनी आणि आप्तेष्टांनी चिंता व्यक्त केली आहे. 'पण जोपर्यंत माझ्याकडून हे काम करणं शक्य होईल तोपर्यंत मी हे काम करतच राहील,' असं केटनं सांगितलं.

सध्या केटला तिसरा महिना सुरू आहे आणि तिने नुकताच ऑस्ट्रेलियातल्या एका जंगलात झालेल्या मोहिमेत सहभाग घेतला आणि आगीत सापडलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्याचं काम धाडसानं केलं. तिच्या या कृत्यामुळे काही जण प्रभावित झाले आहेत तर काही जण मात्र तिला टोमणेदेखील मारत आहेत.

त्या लोकांना उत्तर म्हणून तिने म्हटलं की "ऑस्ट्रेलियात आग लागलेली असताना मी माझ्या हातावर हात ठेवून बसणं शक्य नाही. हे माझं कामच आहे आणि ते मी करणारच." तिने इन्स्टाग्रामवर आपला एक गणवेशातला फोटो टाकला आणि त्यावर कॅप्शन लिहिली की "काही जणांना माझं काम करणं यासाठी खुपतं की मी स्त्री असूनही हे काम करते."

ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत तीन जण मृत्युमुखी पडले आणि 200हून अधिक घर जळाली. या लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे कोण काय म्हणतं याचा विचार करणं हे माझं काम नाही असं केट सांगते.

आपल्या हितचिंतकांना तिने सांगितलं की माझं काळजी करू नका. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी हे काम करत आहे. त्यांनी योग्य काळजी आणि उपकरणांच्या साहाय्याने काम करण्याचा मला सल्ला दिला आहे.

तिच्या या फोटोला काही जणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 'तू आमचं प्रेरणास्थान आहेस,' असं देखील तिला काही जणांनी म्हटलं आहे.

केट सांगते की गेल्या त्यांच्या घरातल्या तीन पिढ्या अग्निशमन दलात काम केलं आहे. केटची आई आणि आजी या दोघींनी अग्निशमन दलाच्या स्वयंसेवकाचं काम केलं होतं.

"माझी आई जेव्हा माझ्यावेळी गरोदर होती तेव्हा तिने स्वयंसेवकाचं काम केलं होतं. मी लहान होते तेव्हा माझ्या आजीनं माझ्यासाठी फायर फायटरचा एक लहानसा ड्रेसही शिवला होता,'' असं केट सांगते.

माझ्या आईने अग्निशमन दलासाठी स्वयंसेवक म्हणून 30 वर्षं तर आजीने 50 वर्षं काम केल्याचं ती अभिमानाने सांगितलं.

तिचे पती आणि सासरची मंडळीही अग्निशमन दलात स्वयंसेवकाचं काम करतात. भविष्यात आपल्या बाळानेही हे काम करावं अशी तिची इच्छा आहे. अर्थात हा निर्णय बाळालाच घ्यायचा आहे हे सांगण्यास ती विसरली नाही.

हे काम करताना तुला भीती नाही वाटत का असं म्हटल्यावर तिने तत्काळ उत्तर दिलं "नाही."

ती पुढे म्हणाली "मी कालसुद्धा एका मोहिमेत भाग घेतला. तिथली घरं फारच भयंकररीत्या जळून खाक होत होती. आम्ही आग आटोक्यात आणायचा प्रयत्न करत होतो. मी हे काम कायमच करत आले आहे.

एनएसडब्ल्यू राज्यात साधारणपणे 60 लाख लोकं राहातात. आमचे अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही आग बुधवारी सिडनीच्या उपनगरीय भागातही पसरली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)