सचिन तेंडुलकर : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिरंग्यासह मारलेली व्हिक्टरी लॅप सर्वोत्तम क्षण

मास्टर ब्लास्टर फलंदाज आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघसहकाऱ्यांच्या साथीने वानखेडे मैदानावर प्रेक्षकांना केलेल्या अभिवादनाला लॉरियस पुरस्कार मिळाला आहे.

2000-2020 या दोन दशकांच्या कालावधीत क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून सचिनला गौरवण्यात आलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेत मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केलं. 'कॅरिड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असं त्याला शीर्षक देण्यात आलं.

गेल्या दोन दशकातला क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण यासाठी चाहत्यांना आवाहन करण्यात आलं होतं. सचिनच्या संघसहकाऱ्यांसह व्हिक्टरी लॅपला चाहत्यांनी सर्वाधिक मतदान केलं.

माजी टेनिसपटू बोरिस बेकर यांनी सचिनला पुरस्कार मिळत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांच्या हस्ते सचिनला सन्मानित करण्यात आलं.

"वर्ल्ड कप जिंकण्याच्या भावनेचं शब्दात वर्णन करता येणार नाही. असं किती वेळा घडतं जेव्हा संपूर्ण देशाचं एका गोष्टीवर एकमत होतं. वर्ल्ड कप विजयाचा आनंद प्रत्येक भारतीयाने साजरा केला. त्यांना तो क्षण आपलासा वाटला. खेळांची जादू किती प्रभावी आणि सर्वव्यापी आहे याची जाणीव यानिमित्ताने झाली. खेळ आपल्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडवू शकतात याचा प्रत्यय त्या विजयाने दिला. तो क्षण माझ्या मनात कोरला गेला आहे," अशा शब्दात सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरलं. तेव्हा मी 10 वर्षांचा होता. वर्ल्ड कप विजयाचं महत्त्व तेव्हा उमगलं नाही. परंतु तेव्हाही प्रत्येक भारतीय एकत्र येऊन आनंद साजरा करत होता. मीही त्यात सामील झालो. हे काहीतरी विलक्षण आहे हे समजत होतं. हा क्षण आपणही अनुभवायला हवा असं वाटलं. तेव्हापासूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली."

"2011 वर्ल्ड कप विजय हा माझ्या आयुष्यातला संस्मरणीय क्षण आहे. वर्ल्ड कप जेतेपदाचा करंडक उंचावण्याचं स्वप्न मी 22 वर्ष जगलो. परंतु मी कधीही आशा सोडली नाही. समस्त देशवासियांचा प्रतिनिधी म्हणून मी वर्ल्ड कप करंडक उंचावला," अशा शब्दात सचिनने या क्षणाचं वर्णन केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)