Brexit: युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर, 47 वर्षांचं नातं संपुष्टात

ब्रिटन आणि युरोपीय युनियन हे औपचारिकरीत्या वेगळे झाले आहेत. भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे चार वाजता ब्रिटन युरोपीय युनियनमधून बाहेर पडलं आहे. युरोपियन युनियनचा ब्रिटन 47 वर्षं सदस्य होता.

ब्रिटनमधील नागरिकांमध्ये यावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

ब्रेक्झिटची घोषणा करण्यापूर्वी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्हीडिओवरून एक संदेश दिला. त्यांचं म्हणणं होतं की ज्या लोकांनी 2016 मध्ये ब्रेक्झिटचं नेतृत्व केलं त्यांच्यासाठी ही नवी पहाट असेल.

बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे की आपल्या देशासाठी हा अभूतपूर्व क्षण आहे. याने आपल्या देशाच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. ब्रेक्झिट शक्य झाल्यामुळे ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यांचा लाभ घ्यावा.

आपल्यातलं सामर्थ्य ओळखून पुढं जाण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले.

या निर्णयामुळे अनेक जण चिंताग्रस्त आहेत आणि आपलं नुकसान झालं अशी त्यांच्यामध्ये भावना आहे असं देखील जॉन्सन म्हणाले.

पुढे ते म्हणाले एक तिसरा असाही गट आहे जो सर्वाधिक त्रस्त होता. हा राजकीय तिढा कधी संपणार की नाही असं त्यांना वाटत होता. मी सर्वांच्या भावना समजू शकतो. एक सरकार म्हणून या देशातील सर्व प्रकारच्या लोकांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याची आमच्यावर जबाबदारी आहे.

ब्रिटनचा झेंडा काढला

ब्रिटनमध्ये सध्या ब्रेक्झिटच्या समर्थनात आणि विरोधात रॅली निघत आहेत. ब्रसेल्समध्ये युरोप युनियनच्या मुख्यालयातून ब्रिटनचा झेंडा हटवण्यात आला आहे.

लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन म्हणाले की युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला प्रगती तर साधायचीच आहे पण त्याच वेळी युरोपियन युनियनशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. त्याच बरोबर अमेरिकेसोबतच्या मुक्त व्यापाराच्या अमिषाला बळी पडू नये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)