Iran Plane Crash: इराणचे नेते अयातुल्लाह अली खामेनी आज का करत आहेत नमाजाचं नेतृत्व?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे आज देशाची राजधानी तेहरानमध्ये होणाऱ्या शुक्रवारच्या नमाजचं नेतृत्त्वं करत आहेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी नमाजाचं नेतृत्त्वं करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इराणच्या लष्कराने गेल्या आठवड्यामध्ये युक्रेनचं एक प्रवासी विमान पाडलं होतं. त्यानंतर देशामध्ये निदर्शनं होत आहेत. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय आणि इराणचं नेतृत्त्वं दडपणाखाली आहे.

बुधवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी देशाला राष्ट्रीय एकात्मतेचं आवाहन केलं. यासोबतच विमान नेमकं कसं पाडलं, याचे तपशील देण्याचे आदेश रुहानी यांनी लष्कराला दिले आहेत.

इराण सरकार आणि लष्करामध्ये असा संघर्ष एरवी फार पाहायला मिळत नाही.

युक्रेन इंटरनॅशन एअरलाईन्सचं कॅनडाला जाणारं बोईंग 737-800 विमान तेहरानमधून उड्डाण केल्याच्या काही वेळातच कोसळलं. या घटनेत विमानातील सर्व 176जण ठार झाले.

यामागे इराणचा हात असल्याचं तेहरानच्या नेत्यांनी 3 दिवस फेटाळलं. पण आंतरराष्ट्रीय दबाव आल्यानंतर आपणच चुकून 'क्रूझ मिसाईल' समजून हे विमान पाडल्याचं इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सनी कबूल केलं. यामुळे इराण आणि अमेरिकेतला तणाव आणखीन वाढला.

80 वर्षांचे अयातुल्लाह खामेनी हे या शुक्रवारच्या नमाजचं तेहरानच्या मोसल्ला मशिदीत नेतृत्वं करणार असल्याचं इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने म्हटलं होतं.

'इराण देश पुन्हा एकदा त्यांच्या एकात्मतेचं आणि भव्यतेचं दर्शन घडवेल,' असं अधिकारी म्हणाल्याचं या वृत्तसंस्थेने म्हटलंय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

यापूर्वी 2012मध्ये देशाने इस्लामिक क्रांती स्वीकारल्याच्या 33व्या वर्षानिमित्त खामेनी यांनी तेहरानमध्ये नमाजचं नेतृत्व केलं होतं.

ज्यावेळी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला देशाला एखादा संदेश पोहोचवायचा असतो, त्यावेळीच राजधानीत शुक्रवारच्या प्रार्थनांचं नेतृत्त्वं केलं जातं, असं वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर निअर ईस्ट पॉलिसीचे मेहदी खलजी सांगतात.

इतरवेळी ही जबाबदारी उत्तम वकृत्व कौशल्य असणाऱ्या मौलवींकडे सोपवली जाते.

खामेनी रिव्होल्यूशनरी गार्डची पाठराखण करणार?

कासरा नाजी, (बीबीसी पर्शियन) याचं विश्लेषण

गेल्या वेळी अरब स्प्रिंग म्हणजेच अरब उठावादरम्यान इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी शुक्रवारच्या नमाजचं नेतृत्व केलं होतं. यावेळी त्यांनी अरब जगात प्रचलित असणाऱ्या अरेबिक भाषेत संवाद साधत भाषण केलं होतं.

अरब जगतात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी या इस्लामिक क्रांती आहेत, असं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते चूक होते.

आता अयातुल्लाह अली खामेनी हे त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्डची पाठराखण करण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. युक्रेनचं विमान पाडल्यामुळे इराणमधून या लष्करावर प्रचंड टीका होतेय.

आपली सत्ता वाचवण्यासाठी खामेनी विद्यार्थी आणि आंदोलकांवरील कारवाई कठोर करण्याचं जाहीर करतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येतेय.

रिव्होल्यूशनरी गार्डला पाठिंबा देण्यासाठी अधिकृत पाठिंबा असणारे देशव्यापी मोर्चे शुक्रवारी काढण्याचं आवाहन सरकारने केलं होतं.

आपल्या ताकदीचं प्रदर्शन घडवण्यासाठी तेहराणमध्ये सरकारतर्फे मोठी तयारी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त समर्थक रस्त्यावर उतरावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पण आपल्या सरकारमुळे दारिद्र्य आलं हे नेत्यांनी मान्य करावं, असं अनेक सामान्य इराणी नागरिकांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)