दक्षिण कोरियात जेव्हा रक्ताची नदी वाहते

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमाभागात असलेल्या नदीत अक्षरशः रक्ताचे पाट वाहत आहेत. हे रक्त आहे डुकरांचं. दक्षिण कोरियात आफ्रिकन स्वाईन फ्लू पसरण्याच्या भीतीने स्थानिक प्रशासनाने गेल्या आठवड्यात तब्बल 47 हजार डुकरांची कत्तल केली.

पावसामुळे सीमाभागातल्या डंपिंग ग्राउंडमधून रक्त वाहून ते जवळच्याच इमजीन या छोट्याशा नदीत मिसळलं गेलं.

आफ्रिकन स्वाईन फ्लू डुकरांना होणारा प्राणघातक आजार आहे. यावर उपाय नाही. आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झालेली डुकरं बचावण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. मात्र, मानवाला यापासून धोका नाही.

नदीतून वाहणाऱ्या रक्तामुळे इतर जनावरांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता नसल्याचं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे. कत्तलीआधी सर्वच डुकरांना स्वाईन फ्लूरोधक लस दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

अधिक प्रदूषण होऊ नये, यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केल्याचंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण आशियात प्रसार

गेल्या आठवड्यातच ही कारवाई करण्यात आली. दोन्ही कोरियाच्या सीमाभागातल्या डंपिंग ग्राउंडवर अनेक ट्रकमध्ये डुकरांचे अवशेष तसेच पडून होते.

या डुकरांना दफन करण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅस्टिक कंटेनर बनवायला उशीर झाल्याने डुकरांना लगेच दफन करता आलं नाही.

दक्षिण कोरियात नुकताच आफ्रिकन स्वाईन फ्लूचा प्रसार झाला होता. दक्षिण आणि उत्तर कोरियाला वेगळं करणाऱ्या नागरी भागातून आलेल्या डुकरांमुळे दक्षिण कोरियात या आजाराचा प्रसार झाला असावा, असा अंदाज आहे.

उत्तर कोरियात गेल्या मे महिन्यात स्वाईन फ्लूचं पहिलं प्रकरण उजेडात आलं. हा आजार दक्षिण कोरियात पसरू नये, यासाठी दक्षिण कोरियाने अनेक उपाय योजले होते. सीमा भागात कुंपणही घातलं.

हे क्षेत्र ओलांडून येणाऱ्या कुठल्याही प्राण्याला मारण्याचा अधिकार दक्षिण कोरियाला आहे.

मात्र, अनेक उपाय करुनही दक्षिण कोरियात 17 सप्टेंबरला स्वाईन फ्लूचं पहिलं प्रकरण समोर आलं. आतापर्यंत 13 डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. दक्षिण कोरियात एकूण 6,700 पिग फार्म आहेत.

चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्ससह आशिया खंडातल्या मोठ्या भागात स्वाईन फ्लूचा फैलाव झाला आहे. याला अटकाव घालण्यासाठी एकट्या चीनने तब्बल 12 लाख डुकरांची कत्तल केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)