You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानच्या तुरुंगांमध्ये म्हाताऱ्या गुन्हेगारांची संख्या का वाढत चालली आहे?
- Author, एड बटलर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या 20 वर्षांपासून 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
हिरोशिमामधील एका घरात तुरुंगातून सुटका होऊन आलेल्या लोकांनी आपला एक गट स्थापन केला आहे. तिथे 69 वर्षीय तोशिओ तकाटा यांनी मला सांगितलं की ते गरीब होते म्हणून कायदा मोडला. त्यांना कुठेतरी मोफत आसरा घ्यायचा होता. अगदी तुरुंगात रहावं लागलं होतं तरी त्यांना चालणार होतं.
"माझं अगदी पेन्शन मिळण्याचं वय झालं आणि मला पैसे कमी पडू लागले. तेव्हा मला ही कल्पना सुचली की आपल्याला तुरुंगातही राहता येईल," ते सांगत होते. "त्यामुळे मी एक सायकल घेतली, पोलीस स्टेशनला नेली आणि त्यांना सांगितलं की बघा, मी ही चोरली आहे."
आणि ही योजना यशस्वी ठरली. हा तोशिओ यांचा पहिला गुन्हा होता. तेव्हा ते 62 वर्षांचे होते. जपानमधील न्यायालयं एखादा छोटा गुन्हाही अतिशय गंभीरपणे घेतात. त्यामुळे तोहिओ यांना एक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.
छोट्या चणीचे, बारीक शरीरयष्टी असलेले आणि हसतमुख असलेले तोशिओ अगदी कट्टर गुन्हेगारासारखे दिसतात. मात्र स्त्रियांना चाकूच्या धाकावर घाबरवतील इतकेही धोकादायक नाहीत. मात्र पहिल्यांदा शिक्षा भोगून आल्यावर त्यांनी अगदी हेच केलं.
"मी एका बागेत गेलो. मला त्यांना कोणतीही इजा पोचवायची नव्हती. मी त्यांना फक्त सुरा दाखवला. मला अशी अपेक्षा होती की त्यांच्यापैकी कुणीतरी पोलिसांना फोन करेलच. झालंही तसंच. त्यातील एकीने पोलिसांना फोन केला आणि मी तुरुंगात गेलो."
अशा पद्धतीने तोशिओ यांनी गेल्या आठ वर्षांतील अर्धा काळ तुरुंगात घालवला आहे.
त्यांना तुरुंगात रहायला आवडतं का, असं मी विचारताच त्यांनी तिथे रहायचा आणखी एक आर्थिक फायदा सांगितला. तुरुंगात असतानाही त्यांची पेन्शन सुरूच असते.
"मला तिथे आवडतंच असं नाही. पण मी तिथे फुकटात राहू शकतो," ते म्हणतात. "मी जेव्हा बाहेर जातो, तेव्हा मी बचत केलेले पैसे असतातच. त्यामुळे हे तितकं वेदनादायी नाही."
तोशिओ यांचं प्रकरण तिथल्या गुन्हेगारी विश्वातील एक लाट दर्शवितं. जपानमधला समाज हा खरंतर कायदा पाळणारा आहे. मात्र 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांकडून होणाऱ्या गुन्ह्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.
1997मध्ये या वयोगटातील 20 पैकी एका व्यक्तीला शिक्षा व्हायची. आता दर पाच पैकी किमान एक व्यक्ती तुरुंगात आहे. या वयोगटातील गुन्हेगारांची ही वाढ तर या वयोगटातल्या लोकसंख्येच्या वाढण्याच्या दरापेक्षाही जास्त आहे. जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश वयोवृद्ध आहेत, हा भाग वेगळा.
गरिबीमुळे गुन्हेगारी
किको (नाव बदललं आहे.) हे आणखी एक उदाहरण. ही स्त्री देखील छोट्या चणीची आणि छान नीटनेटकी होती. त्यांनी मला सांगितलं की गरिबीमुळे त्या गुन्हेगारीकडे वळल्या.
"माझं माझ्या नवऱ्याशी पटत नव्हतं. मला रहायला कुठे जागा नव्हती. त्यामुळे चोरी हाच माझ्यासाठी एकमेव पर्याय होता," त्या सांगतात. "80 पेक्षा जास्त वयाच्या बायका ज्यांना अगदी चालताही येत नाही. त्यासुद्धा असे गुन्हे करतात, कारण त्यांना अन्न, पाणी मिळत नाही."
काही महिन्यांपूर्वी या बीबीसी प्रतिनिधीने माजी गुन्हेगारांसाठी असलेल्या एका हॉस्टेलमध्ये संपर्क साधला होता. तेव्हा किको यांना पुन्हा अटक झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. एक दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून सध्या किको शिक्षा भोगत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांमधल्या गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्यपणे दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये जाऊन चोरी करण्याचंच प्रमाण सर्वाधिक. ज्या दुकानात ते नेहमी भेट देतात, तिथेच साधारण दोन हजारपर्यंतच्या खाण्याच्या वस्तू चोरतात.
मायकेल न्यूमन ऑस्ट्रेलियात जन्मलेला लोकसंख्यातज्ज्ञ टोकियोतील एका लॅबमध्ये Custom Products Research Group या गटात काम करतात. त्यांच्या मते जपानमध्ये मिळणारी पेन्शन अत्यल्प असते. त्यावर जगणं अतिशय कठीण आहे.
2016 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात ते स्पष्ट करतात की फक्त आरोग्य, घरभाडं आणि खाण्याच्या खर्चामुळेच तिथले लोक कर्जबाजारी होतील. विशेषत: उत्पन्नाचा दुसरा कोणताच स्रोत नसेल तर.
आधीच्या काळात मुलं पालकांची काळजी घ्यायचे. पण आपल्या मूळ गावी रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आणि पालकांना त्यांच्या पद्धतीने गुजराण करावी लागते.
"पेन्शनधारी नागरिकांना त्यांच्या मुलांवर ओझं व्हायचं नाहीये. त्यामुळे पेन्शनवर गुजराण होत नसेल तर तुरुंगात जाणं हा एकमेव मार्ग आहे, असं त्यांना वाटतं," ते सांगतात.
वारंवार गुन्हा करणं हा तुरुंगात जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तिथे तीन वेळेला जेवण मिळतं आणि त्याचं बिलही द्यावं लागत नाही.
न्युमन सांगतात की या वयातील लोकांच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढतंय. कदाचित हा त्यांना परतफेडीचा मार्ग वाटत असावा.
जपानमधील सामाजिक परिस्थिती
'With Hiroshima' हे जपानमधील एक पुनर्वसन केंद्र आहे. तिथेच या प्रतिनिधीने तोशिओ तकाटांची भेट घेतली होती. त्यांच्या मते जपानच्या कुटुंब व्यवस्थेतील बदलांमुळेच या गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असावी. तसंच त्यांच्या मते आर्थिक कारणांपेक्षा मानसिक कारणं त्यासाठी जास्त जबाबदार आहेत.
शेवटी काय तर लोकांमधील नातेसंबंध आता बदलले आहेत. लोक आता एकटे एकटे राहू लागलेत. त्यांना समाजात फारसं स्थान नाही. ते एकटेपणाचा सामना करू शकत नाही. असं कनिची येमाडा हे 85 वर्षीय गृहस्थ सांगतात. ते लहान असताना हिरोशिमावर अणुबाँबहल्ला झाला होता. त्यावेळी ते अगदी लहान होती. त्यांच्या घरातला राडारोडा त्यांनी स्वच्छ केला होता.
"जे व्यक्ती गुन्हा करतात त्यांच्या आयुष्यात काही महत्त्वाची घटना घडलेली असते. काहीतरी निमित्त होतं. बायको किंवा मुलांचा मृत्यू होतो आणि हे दु:ख ते पचवू शकत नाही. आपली काळजी घेण्यासाठी कोणी असेल किंवा आधार देण्यासाठी कोणी असेल तर लोक असं गुन्हे करत नाहीत."
दारिद्र्यामुळे तोशिओ यांना गुन्हेगारीकडे वळावं लागलं हा एक कारण आहे असं कनविची येमडा सांगतात. एकटेपणा हे त्यांच्या अडचणीचं मूळ आहे. त्यामुळेच असे गुन्हे पुन्हा पुन्हा करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. तुरुंगात त्यांना मित्रमैत्रिणी मिळतील म्हणूनही ते गुन्हेगारीकडे वळले असतील असाही अंदाज ते व्यक्त करतील.
तोशिओ या जगात एकटे आहेत हे सत्य आहेच. त्यांच्या पालकांचं निधन झालं आहे. त्यांच्या दोन मोठ्या भावांबरोबर त्यांचा कोणताच संबंध नाही. ते तोशिओ यांच्या फोनला प्रतिसादही देत नाही. त्यांच्या दोन माजी बायकांबरोबर काहीही संपर्क नाही. दोघींबरोबरही त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना तीन मुलंही आहेत.
तोशिओ यांना बायका पोरं असती तर परिस्थिती वेगळी असती का असा प्रश्न मी त्यांना विचारला. माझ्या प्रश्नाला त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं.
"ते जर मला आधार द्यायला असते तर मी हे सगळं केलं नसतं." तोशिओ सांगतात.
प्रत्यक्ष तुरुंगातील परिस्थिती
जपान सरकारने तुरुंगाची क्षमता वाढवल्याचं निरीक्षण मायकेल न्युमन नोंदवतात. तसंच महिला सुरक्षारक्षकांची संख्याही वाढवली आहे. कारण गेल्या काही काळात महिला गुन्हेगारांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसंच तुरुंगातील लोकांचा वैद्यकीय खर्चही वाढला आहे.
तसंच तिथल्या तुरुंगात आणखी काही बदल झाले आहेत. टोकियोच्या बाहेर फुचू येथे मला दिसलं की तेथील एक तृतीयांश कैदी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
जपानच्या तुरुंगात परेड असते. परेड आणि आरडाओरडही असते. पण या कवायतीची अंमलबजावणी करणं दिवसेंदिवस कठीण होतंय. प्रत्येक तुकडीत एक-दोन ज्येष्ठ नागरिक होते. एक कुणीतरी कुबड्या घेऊन होता.
"आम्हाला इथल्या सोयीसुविधा सुधारायच्या आहेत." असं तुरुंगातील शिक्षण विभागाचे प्रमुख मसाता येझावा सांगतात. "आम्ही जिन्यांवर हात धरायला रेलिंग लावलं आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रसाधनगृहं बांधली आहेत. वृद्ध गुन्हेगारांसाठी वेगळे वर्ग भरतात."
त्यांनी एक वर्गात दाखवलं. The Reason I was Born, All about the meaning of life या एका लोकप्रिय गाण्याचं कराओके वाजवण्यात आलं. तिथल्या कैद्यांनाही गाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. त्यांच्यापैकी तर काही कैदी खूप भावूक झाले.
"खरं आयुष्य, खरा आनंद तुरुंगाच्या बाहेर आहे, हे दाखवायला आम्ही गातो," यझावा सांगतात. "तरी त्यांना असं वाटतं की तुरुंगातलं आयुष्य चांगलं आहे आणि ते इथेच पुन्हा पुन्हा परत येतात."
पण न्युमन यांच्या मते कोर्टाची फी भरण्यापेक्षा वृद्ध पालकांची काळजी घेणं खिशाला परवडणारं असतं.
"आम्ही खरंतर निवृत्ती घेतलेल्या लोकांसाठी एक खूप मोठं निवृत्ती संकुल उभं करण्याची योजना उभारली होती. तिथे लोकांना अर्धी पेन्शन द्यावी लागेल. मात्र त्यांना मोफत खायला मिळेल, रहायला मिळेल आणि आरोग्यसुविधाही मिळतील. तसंच स्वातंत्र्य मिळावं म्हणून वेगवेगळे उपक्रमसुद्धा असतील. सरकारला जितका खर्च होईल, त्यापेक्षा ही रक्कम बराच कमी असेल," ते सांगतात.
एखाद्या छोट्या गुन्ह्यासाठी जपानी कोर्टाने दिलेला तुरुंगवासही न्युमन यांना जाचक वाटतो.
जपान तुरुंगसेवेतील अधिकारी मासायुकी शो म्हणतात, "अगदी ब्रेडचा एक तुकडा जरी चोरला तरी त्यांना तुरुंगात पाठवली जाईल, अशी तरतूद आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे न करताही जगता येतं, हे त्यांना शिकवावं लागेल."
तोशिओ तकाटा हा धडा शिकले की नाही, हे माहिती नाही. जेव्हा या प्रतिनिधीने त्यांना विचारलं तेव्हा ते आणखी एक गुन्हा करण्याच्या नियोजनात होते.
"हा आता शेवटचा," ते म्हणतात. "मला आता हे पुन्हा करायचं नाही. मी आता लवकरच 70 वर्षांचा होईन. त्यामुळे मी आता हे करणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)