अणुयुद्धाच्या दिशेने? - अमेरिका आणि रशियाने स्थगित केला 'हा' मोठा करार

गेला बराच काळ रशियाला ताकीद दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी अखेर Intermedia Range Nuclear Force म्हणजेच INF करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयानंतर रशियानेही या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्रध्यक्ष वाल्दिमिर पुतिन यांनी रशिया नवीन क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरू करणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

शीतयुद्धादरम्यान अण्वस्त्रांसंबंधी केलेल्या या कराराला आणि जागतिक आण्विक निशस्त्रीकरणाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

रशियाने INF कराराचे अनेकदा उल्लंघन केल्याचा आरोप डोनल्ड ट्रंप यांनी सातत्याने केला आहे.

हा करार आज शनिवारी स्थगित होईल. ट्रंप प्रशासनानुसार जर रशिया या कराराचे उल्लंघन करत राहिला तर अमेरिका सहा महिन्यांमध्ये या करारातून बाहेर पडेल.

'या करारात स्वाक्षरी करणाऱ्या सर्वांनी शेवटपर्यंत आपल्या शब्दावर ठाम राहणं महत्त्वाचं होतं' असं ट्रंप यांनी मत व्यक्त केलं होतं. तर पुतिन म्हणाले, "आमच्या अमेरिकन सहकाऱ्याने या करारातील स्वतःचा सहभाग मागे स्थगित केला आहे, आम्हीही आमचा सहभाग स्थगित ठेवत आहोत. या संदर्भातील आमचे सर्व पर्याय पहिल्यासारखेच चर्चेला खुले असतील."

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ म्हणाले, "रशियाने गेली अनेक वर्षं या कराराचं उल्लंघन करून अमेरिका आणि युरोपाची सुरक्षा धोक्यात आणली."

ट्रंप म्हणाले, "करारातील एक पक्ष त्याचे पालन करत नाही. आम्ही त्याचे पालन करत आहोत. मात्र दुसरा पक्ष (रशिया) त्याचे पालन करत नसल्यामुळे (आता) आम्हीही कराराचे पालन करणार नाही. सर्वांना एका व्यापक करारात समाविष्ट करणं आणि हा नवा करार अधिक चांगला असेल अशी मला आशा आहे, मात्र सर्वांना त्याचं पालन करावं लागेल."

मात्र अमेरिकेच्या निर्णयावर रशियानं टीका केली आहे. "आंतरराष्ट्रीय कायदेशीर वचनबद्धतेचे अमेरिकेनं उल्लंघन केलं आहे," अशी प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली असून अमेरिकेचे आरोप निराधार असल्याचं रशियानं म्हटलं आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता मारिया जखारोवा म्हणाल्या, "आपले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नव्हते."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, "रशिया या कराराचं कथित उल्लंघन केल्याचं आम्ही ऐकत असतो. परंतु असं उल्लंघन कधी झाल्याचा पुरावा एखाद्या ट्वीटपलिकडे ते काहीच उपलब्ध करू शकत नाहीत हे रशियन मंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे. पुराव्यादाखल एक साधा तुकडाही मिळालेला नाही की उपग्रहाचे छायाचित्रही मिळालेले नाही."

हा करार स्थगित करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला NATOने देखील पाठिंबा दिला आहे.

1987 साली तत्कालीन सोव्हिएत महासंघाचे राष्ट्रपती मिखाइल गोर्बाचेव्ह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती.

जमिनीवरून मध्यम अंतरावर मारा केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचे परीक्षण आणि वापर रोखण्याचे काम INF समूह करतो. या क्षेपणास्त्रांचा टप्पा 500 ते 5,500 किमी इतका असतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)