You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुस्लीम समुदायाच्या भावना ‘वराह नववर्षामुळे’ दुखावतील?
जगभरात नव्या चांद्रवर्षाच्या (लुनार न्यू इयर) स्वागतासाठी तयारी सुरू झाली आहे. मात्र हे वर्ष थोडं वेगळं आहे. चीनी ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षाचा पशू डुक्कर आहे.
लुनार न्यू इयरच्या स्वागताच्या जल्लोषात तुम्हाला हा प्राणी सगळीकडे दिसेल.
सजावटीमध्ये खेळणी, भेटवस्तू आणि जाहिरातींमध्येही हा प्राणी दिसू लागतो.
परंतु या वर्षीचा प्राणी डुक्कर असल्यामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे.
चीनी ज्योतिषशास्त्राच्या कॅलेंडरमध्ये शेवटचा प्राणी डुक्कर आहे. मात्र मुसलमानांमध्ये या प्राण्याला खाणं निषिद्ध आहे तसंच त्याला अपवित्र समजलं जातं.
मुस्लीमबहुल देशांमध्ये लुनार नववर्षाचं स्वागत करण्यात अडथळे येतील?
बहुतांश चीनी-मलेशियन कुटुंबांप्रमाणे चाऊ परिवारालाही लुनार नववर्षाच्या स्वागतावेळेस व्यापार करण्याची चांगली संधी असते. हे कुटुंब मलेशियाच्या जोहोर प्रांताच्या बातू पहाट शहरात राहाते.
चाऊ यून यांच्यासाठी हे वर्ष विशेष महत्त्वाचं आहे. कारण त्यांची पत्नी आणि मुलीचा जन्म वराहवर्षामध्येच झाला आहे.
चाऊ एका बिस्किट कारखान्यात फ्लोर मॅनेजर आहेत.
ते म्हणतात, "आम्ही घर डुकराच्या शुभचिन्हांनी सजवणार आहोत. आमचे नातलग, मित्र, शेजारी भले कोणत्याही धर्माचे असोत ते आमच्या घरी येतील. सण सर्वांसाठीच आहे."
त्यांच्या साथीदारांना वाईट वाटेल याची त्यांना काळजी वाटत नाही. उलट नव्या वर्षावरुन कोणताही विवाद होणार नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते आनंदात आहेत.
मात्र गेल्या वर्षीचा प्राणी कुत्रा होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचं त्यांना आठवतं.
मलेशिया बहुसांस्कृतिक देश असला तरी त्याचा मुस्लीम हा अधिकृत धर्म आहे. तसेच तेथे मुसलमानांचा अपमान झाल्यासंबंधी अनेक घटनांवरुन देशभरामध्ये असहिष्णूता वाढल्याचे दिसून येते.
त्यामुळेच मुस्लीम समुदाय नाराज होऊ नये म्हणून अनेक दुकानदारांनी कुत्र्यांचा फोटो वापरलेला नाही. नववर्षाच्या सुटीचा आनंद घेणाऱ्या चीनी समुदायाकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नाही असं चाऊ यांना वाटतं.
ते म्हणतात, "मलेशियात अनेक धर्माचे लोक राहातात. इथं केवळ मुस्लीम राहात नाहीत. तर इथं चीनी आणि भारतीय समुदायही आहेत. तसंच ख्रिश्चन, हिंदू, ताओ आणि बौद्धांसारखे धर्मही येथे आहेत. त्यामुळेच आपण एकमेकांच्या भावनांचा आणि सोहळ्यांचा सन्मान केला पाहिजे."
मात्र या वर्षभरात सेन्सॉरशिपची भावना कायम राहील असं त्यांना वाटतं.
चीनी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक प्राण्याची स्वतःची वैशिष्ट्ये आणि लक्षणे असतात. डुक्कर वर्षात जन्मलेल्या मुलांना बुद्धीमान, दयाळू आणि विश्वासू मानलं जातं.
एखाद्या प्राण्याचं स्वागत केलं नाही तर काय फरक पडतो का?
क्वालालंपूरमधील चीनी ज्योतिषतज्ज्ञ जोय याप म्हणतात, "हा काही काळजीचा मुद्दा नाही."
ते बीबीसीला म्हणाले, "गेल्या वर्षाची तुलना केल्यावर यावर्षाच्या सोहळ्याबाबत संवेदनशीलता दिसत नाही. एखादी वस्तू तुम्ही मांडून ठेवली किंवा नाही यावरून नशीबावर कोणताही परिणाम होत नाही. रंग, प्रतिकं हे सर्व महत्त्वपूर्ण नाही.
खरं सांगायचं झालं तर कर्मानंच तुमचं भाग्य उजळत असतं. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे."
'या डुकरांना' मुस्लीम खाऊ शकतात
जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्येच्या इंडोनेशियामध्ये लुनार न्यू इयरच्या वेळेस राष्ट्रीय सुटी असते. यावेळी शहरांमध्ये रोषणाई केली जाते, रंगीबेरंगी मिरवणुका निघतात.
जकार्ताची मेरी ओलिविया म्हणते, तिच्या मुस्लीम मित्रांनी वराहप्रतिमांचे स्वागत केले आहे.
ती म्हणते, "मी अनेक इंडोनियन मुस्लिमांमध्ये राहून मोठी झाली आहे. त्यांना डुकराचा मुद्दा चिंतेत टाकणारा वाटत नाही. हा प्राणी इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा हा प्राणी अधिक प्रसन्न दिसतो असं तिला वाटतं."
"जर साप आणि डुकराची तुलना केली तर डुक्कर अधिक प्रेमळ वाटतात, त्यासाठी लोक सजावटीचं सामान खरेदी करून त्यानं घर सजवतात."
बेकरीचं काम करणाऱ्या वलेरिया रीटा यांनी नववर्षासाठी खास मिठाया बनवायला सुरूवात केली आहे.
त्यामध्ये डुक्करासारख्या दिसणाऱ्या बिस्किटांचाही समावेश आहे.
त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून रिटा सांगते, "यावर्षी तिनं डुकराच्या आकाराची मिठाई बनवायचा निर्णय घेतला आणि प्रीऑर्डरचा कोटा दोन आठवड्यांतच पूर्ण केला".
त्यांचे अनेक ग्राहक मुसलमानही आहेत.
ती सांगते, "ते नववर्षाचा उत्साह साजरा करणाऱ्या चीनी सहकारी, मित्रांसाठी बिस्किटं खरेदी करतात. काही लोकांनी डुक्कर पसंत असल्यामुळं स्वतःसाठीही ऑर्डर दिली आहे."
काही लोकांची स्थिती मात्र वेगळीच आहे. यामध्ये 24 वर्षीय रंग्गा सस्त्राजाया यांचा समावेश आहे. त्या बोगोरमध्ये राहातात.
त्यांनी डुकरासारखी दिसणारी खेळणी आणि सजावटीचं इतर सामान खरेदी केलं आहे पण त्याचा वापर खुलेपणानं करण्याची त्यांना थोडी भीती वाटत आहे.
"काही लोक सांस्कृतिक विविधतेला स्वीकारत नसल्यामुळं इंडोनेशियन लोकांच्या भावना दुखावतील" असं त्यांना वाटतं.
त्या म्हणतात, "मी स्वतः डुकराचे चित्र असलेले कपडे वापरू शकते किंवा घरातील सजावटीसाठी वापरू शकते. मात्र सार्वजनिक स्वरुपात त्यांचे प्रदर्शन करताना मी सावधगिरी बाळगेन. कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत."
या सणावर टीका करणारे लोकही आहेत. फोरम मुस्लीम बोगोर (एफएमबी) ही पश्चिम जावामधील एक कट्टरपंथीय इस्लामी संघटना आहे.
हा उत्सव रद्द करण्याची मागणी करणारं एक पत्र त्यांनी प्रसिद्ध केलं आहे.
"मुसलमानांसाठी हे अनुचित आहे कारण यामुळं इस्लामी श्रद्धा कमजोर होऊ शकते", असं या संघटनेचं मत आहे.
त्यांच्याबरोबर पीपी आणि पीएफकेपीएमसारख्या संघटनांनीही चीनी समुदायाद्वारे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सोहळ्यावर टीका केली आहे.
इंडोनेशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे तज्ज्ञ थंग जु-लान अशा भावना "असहिष्णू राजकीय व्याख्येमुळे तयार झाल्या आहेत", असं म्हणतात.
अशाच राजकीय व्याख्यांमुळं दोन वर्षांपूर्वी जकार्ता हादरून गेलं होतं.
दोन वर्षांपूर्वी इंडोनेशियातील चीनी वंशाचे माजी गव्हर्नर बासुकी अहोक जहाजा पुरनामा यांच्याविरोधात मोठी निदर्शनं झाली होती.
ख्रिश्चन धर्माच्या अहोक यांना ईशनिंदेच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि या खटल्याला इंडोनेशियाच्या धार्मिक सहिष्णुतेची परीक्षा मानलं जातं.
जु-लान बीबीसीला म्हणाले, "अहोक प्रकरणावर इंडोनेशियात झालेल्या गव्हर्नर निवडणुकांचा परिणाम होता. तेव्हापासून अशाप्रकारे भावना भडकावल्या जात आहेत.
सध्य़ा घडत असलेल्या घटनांची अत्यल्प माहिती असल्यामुळेच असहिष्णुतेची समस्या अजूनही जिवंत आहे. आपल्याला जितकं कमी समजतं, आपण तितकेच जास्त असहनशील असतो."
लुनार न्यू ईयर साजरं करण्याला संस्कृतीपेक्षा धार्मिक महत्व जास्त आहे असं इंडोनेशियाच्या मुस्लिमांना वाटतं.
अर्थात इंडोनेशियाच्या एका नेत्यांनी चीनी समुदायाच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
वेगवेगळया सांस्कृतिक वारशांच्या, धर्म आणि परंपरांना मानणाऱ्या लोकांना इंडोनेशियाचे धार्मिक व्यवहार मंत्री लुकमान हाकिम सैफुद्दिन पाठिंबा देतात.
या मुद्द्यांचा सन्मान झाला पाहिजे असं सैफुद्दिन यांचं मत आहे.
ते म्हणाले, "या सणांबद्दल असणारी मतं बाजूला ठेवून त्या परंपरांचा सन्मान करण्याचं आवाहन मी करतो."
(बीबीसीचे सिंगापूरमधील वार्ताहर हेदर चेन, इंडोनेशियातील वार्ताहर क्रिस्टिन फ्रॅंसिका आणि जकार्तामधून आयोमी अमीनदोनी यांनी पाठविलेला रिपोर्ट)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)