ट्विटर घालणार राजकीय जाहिरातींवर पूर्णपणे बंदी

A thumbprint

फोटो स्रोत, Getty Images

'जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायची कला कमवावी लागते, ती विकत घेऊन चालणार नाही.' असं म्हणत ट्विटर आता जगभरामध्ये राजकीय जाहिराती घेणं बंद करणार आहे.

"इंटरनेटवरून जाहिरात करणं हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असलं तरी यामुळे राजकारणासाठी काही मोठे धोके निर्माण होतात," असं ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्से यांनी ट्वीट केलंय.

पण या उलट राजकीय जाहिरातींवर आपण बंदी घालणार नसल्याचं फेसबुकनं नुकतच म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पण ट्विटरने राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचं ठरवल्याने त्याचा अमेरिकेत 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या 2020साठीच्या प्रचार मोहीमेचे प्रमुख ब्रॅड पार्स्कल यांनी ही बंदी 'ट्रंप आणि कन्झर्व्हेटिव्ह पक्षाची मुस्कटदाबी करण्यासाठी' घालण्यात आल्याचं म्हटलंय.

तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठीचे दावेदार मानले जाणाऱ्या जो बायडन यांचे प्रवक्ते बिल रूसो यांनी म्हटलंय, "देशाची सार्वभौमता आणि जाहिरातींतून मिळणारे डॉलर्स यांच्यामध्ये पैशांचा विजय न होणं हे दिलासादायक आहे. असं क्वचितच घडतं."

ट्विटरच्या या भूमिकेबद्दल बोलताना फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या धोरणांचं समर्थन केलंय.

"एखाद्या लोकशाहीत खासगी कंपन्यांनी राजकारणी किंवा बातम्या सेन्सॉर करणं योग्य आहे, असं मला वाटत नाही," पत्रकारांसोबतच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये बोलताना झकरबर्ग यांनी सांगितलं.

Twitter CEO Jack Dorsey arrives at the "Tech for Good" Summit in Paris, France May 15, 2019.

फोटो स्रोत, Reuters

15 नोव्हेंबरला ट्विटरच्या या बंदीविषयीचा तपशील जाहीर करण्यात येईल आणि ट्विटरने घातलेली ही बंदी 22 नोव्हेंबरपासून अस्तित्त्वात येईल.

बंदीबाबत डॉर्से यांचं म्हणणं काय?

काही ट्वीट्सच्या माध्यमातून डॉर्से यांनी आपलं म्हणणं मांडलंय.

इंटरनेटवरच्या राजकीय जाहिरातींमुळे 'नागरी जीवनासमोर संपूर्णपणे नवी आव्हानं' उभी राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

'स्वयंचलित प्रणालीकडून या संदेशांचं करण्यात येणारं नियंत्रण, मायक्रो- टार्गेटिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट समूहाकडे जाहिरातींचा रोख असणं, पडताळण्यात न आलेली चुकीची माहिती आणि डीप फेक्स' ही नवीन आव्हानं असल्याचं डॉर्से यांनी म्हटलंय.

Mark Zuckerberg

फोटो स्रोत, Facebook

"आमची प्रणाली वापरून लोकांनी चुकीची माहिती पसरवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं आम्ही म्हणणं योग्य ठरणार नाही. पण जर कोणी आम्हाला पैसे देऊन लोकांना त्यांच्या राजकीय जाहिराती बळजबरीने पहायला लावल्या...तर त्यामार्फत ते त्यांना हवं ते म्हणू शकतात!"

सध्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या बाजूने हे धोरण असल्याच्या आरोपाविषयी बोलताना डॉर्से म्हणतात, "राजकीय जाहिरातबाजी न करताही अनेक सामाजिक मोहिमांना प्रचंड मोठी मान्यता मिळालेली आहे."

मतदार नोंदणीसाठीच्या जाहिरातींवर या बंदीचा परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हिलरी क्लिंटन यांच्याकडून स्वागत

ट्रंप यांच्या विरोधात 2016ची अध्यक्षीय निवडणूक हरलेल्या माजी डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी या ट्विटर बॅनचं स्वागत केलंय. आणि फेसबुकनेही आपल्या धोरणांचा पुन्हा विचार करावा असं आवाहन केलंय.

सोशल मीडिया विश्लेषक कार्ल मिलर याविषयी म्हणतात, "आपल्यामुळे एखाद्या संस्थेची वा यंत्रणेची होत असलेली हानी लक्षात घेऊन पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या टेक कंपनीने एक पाऊल मागे घेतलंय. आता फेसबुक याबाबत काय करणार?"

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वॉशिंग्टन डीसीमधल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या कंपनीच्या राजकीय जाहिरतींवर बंदी न घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.

फेसबुकवर सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याबाबत आपण विचार केला होता, पण याचा सध्या पदांवर असलेल्या राजकारण्यांना आणि मीडिया ज्यांना कव्हर करतो अशांना फायदा होईल, असं आपल्याला वाटल्याचं झकरबर्ग यांनी सांगितलं.

जो बायडन यांच्या आणखी एका प्रवक्त्याने फेसबुकवर टीका केली होती. ट्रंप यांच्या 2020साठीच्या प्रचारमोहीमेअंतर्गत एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामुळे जो बायडन आणि त्यांच्या मुलाविषयीचा वाद निर्माण झाला होता. पण हा व्हीडिओ काढून टाकायला फेसबुकने नकार दिला होता.

"आपल्या माध्यमाचा वापर करून मुद्दामून चुकीच्या माहितीचा प्रसार एखाद्या सोशल मीडिया कंपनीने होऊ देणं, हे स्वीकारार्ह नाही," असं टी. जे. डक्लो म्हणाले होते.

डोनाल्ड ट्रंप यांची अध्यक्षपदी पुन्हा नेमणूक होण्याला झकरबर्ग यांनी व्यक्तीशः पाठिंबा दिल्याचा खोटा दावा करणाऱ्या एका जाहिरातीसाठी डेमोक्रॅटिक उमेदवार सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांनी पैसे मोजले होते. ही माहिती खोटी असूनही जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी जाहिरात तयार करण्यात आली होती.

फेसबुकला राजकारण्यांच्या भूलथापांची कल्पना असूनही ते असं करण्याची परवानगी देत असल्याचा निषेध म्हणून आपण असं केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम

अध्यक्षपदासाठीच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहिरातींवर सुमारे 6 अब्ज डॉलर्सचा खर्च केला जाण्याचा अंदाज आहे. पण यापैकी बहुतेक पैसे टीव्ही जाहिरातींसाठी वापरले जातील आणि फक्त 20 टक्के पैसा डिजिटल जाहिरातींसाठी खर्च होईल असा कँटर या अॅडव्हर्टाजिंग रिसर्च कंपनीचा अंदाज आहे.

पण आपला संदेश मोफतच पसरवला जाईल, असं राजकीय धोरणकर्ते गृहित धरत असल्याचं बीबीसीच्या पॉलिटिकल एडिटर लॉरा कुएनस्सबर्ग यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)