'Smash Brahmanical Patriarchy': ट्विटर CEO अडकले 'ब्राह्मण्यवादी पितृसत्ते'च्या वादग्रस्त ट्रेंडमध्ये?

फोटो स्रोत, @Annavetticad
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
Smash Brahmanical Patriarchy म्हणजे ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक व्यवस्थेला हाणून पाडा.
ब्राह्मण्यवाद आणि पितृसत्ताक हे दोन अवजड असे वाटणारे शब्द जिथेही वापरले जातात, तिथे हमखास काही ना काही वाद होतोच. नुकतंच अशाच एका वादाला निमित्त ठरले ट्विटरचे CEO जॅक डॉर्सी, ज्यांनी याच आशयाचं एक पोस्टर हातात धरून फोटो काढला आणि ट्विटरवर तो शेअर करण्यात आला.
जॅक डॉर्सी यांनी नुकतीच काही भारतीय महिला पत्रकार, लेखिका आणि विचारवंतांबरोबर एक बैठक घेतली, ज्यात काही चर्चा झाली आणि त्या बैठकीनंतर काढलेला हा फोटो समोर आला.
मग Brahmanical Patriarchy या शब्दावर मोठा वाद निर्माण झाला आणि सोशल मीडियावरील अनेकांनी आरोप केला की हा सगळा प्रकार ब्राह्मणांच्या विरोधात किंवा त्यांच्याप्रतिच्या द्वेषातून आला आहे. वाद इतका वाढला की #Brahmins आणि #Brahmnicalpatriarchy हा हॅशटॅग वापरून हजारो लोकांनी ट्वीट केले आणि त्यानंतर ट्विटरला त्याबद्दल स्पष्टीकरणही द्यावं लागलं.
ट्विटर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटलं की, "ट्विटरवर स्त्रियांना येणारे अनुभव समजून घेण्यासाठी आम्ही नुकतंच काही महिला पत्रकारांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. चर्चेत भाग घेणाऱ्या एका दलित कार्यकर्तीने हे पोस्टर जॅक यांना भेट म्हणून दिलं होतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"त्यामुळे या पोस्टरवरील विधान हे ट्विटरचं किंवा ट्विटरच्या CEOचं निवेदन नाही तर ट्विटरसारख्या सार्वजनिक मंचावर होणाऱ्या चर्चेत प्रत्येक पक्षाला पाहण्याची, ऐकण्याची आणि समजण्याची संधी मिळेल, याचा आम्ही प्रयत्न करतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्यानंतर ट्विटरच्या कायदा आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांनीही माफी मागितली. "मला याबद्दल फार वाईट वाटतंय. हे खरं म्हणजे आमचे विचार नाहीत. आम्हाला तो फोटो भेट म्हणून मिळाला होता आणि आम्ही त्याबरोबर एक खासगी फोटो काढला होता. आम्हांला थोडं सतर्क रहायला हवं होतं. ट्विटर सर्व लोकांसाठी एक निष्पक्ष व्यासपीठ होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्ही त्या प्रकरणी अयशस्वी ठरलो आहोत. भारतीय युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही नक्की यापेक्षा चांगलं करायला हवं."

फोटो स्रोत, @vijaya
पण यावरच प्रकरण शांत होत नाहीये. लोकांच्या ट्वीट्सचा ओघ सतत सुरूच आहे. त्यामुळे ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा खरच लोक म्हणतायत तसा ब्राह्मणांविरुद्ध कट आहे का?
स्त्रीवादी साहित्य आणि लेखांमध्ये ब्राह्मण्यवादी पितृसत्ता, या शब्दाचा वापर समाजात महिलांची स्थिती आणि जातीव्यवस्था एकमेकांत कशा गुंतल्या आहेत, हे दाखवण्यासाठी होतो.

फोटो स्रोत, @Dalitdiva
स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्व धर्माची आणि धर्माची व्याख्या करणारे लोक मानत नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी दलित आणि स्त्रीवादी कार्यकर्ता अनेक उदाहरणं देतात. ते सांगतात की शास्त्रांमध्ये असं म्हटलंय की महिलांनी आधी वडील, मग नवरा आणि त्यानंतर मुलाच्या छत्रछायेखाली रहायला हवं किंवा त्यांनी स्त्रियांचं रक्षण करावं, असं त्याचं मत आहे.
व्यापक प्रमाणावर या व्यवस्थेला ते ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक, असं म्हणतात.
प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका उमा चक्रवर्ती यांनी Economic and Political Weekly मध्ये लिहिलेल्या Conceptualizing Brahmanical Patriachy in India या लेखात उच्च जातींमध्ये असलेल्या मान्यता आणि परंपरांतून महिला आणि त्यांच्या लैंगिकतेवर ताबा मिळवण्याच्या प्रथेला ब्राह्मण्यवादी पितृसत्ता म्हटलं आहे.
लेखक कांचा इलैया यांचा दृष्टिकोन
ब्राह्मण्यवादी पितृसत्ता हा शब्दाची व्याख्या आणखी खोलात समजून घेण्यासाठी पितृसत्ता या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.
पितृसत्ताक पद्धतीत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचा दबदबा असतो. मग ते घराण्याचं नाव असेल किंवा सार्वजनिक जीवनातलं त्यांचं वर्चस्व, तसं पाहिलं तर संपूर्ण जगावर पितृसत्ताक पद्धतीचा दबदबा आहे. मात्र ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत, ही भारतीय समाजाची देणगी आहे.
ब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धती समजून घेण्यासाठी भारतीय इतिहासात डोकावण्याची गरज आहे. वैदिक काळात जेव्हा हिंदू धर्मात कट्टरता आली, तेव्हा महिला आमि क्षुद्र (तथाकथित खालची जात) यांचा दर्जा कमी केला गेला.
महिला आणि क्षुद्रांना सारखीच वागणूक देण्याची सुरुवात झाली. त्यांना अस्पृश्य आणि कमी दर्जाचं मानलं जाऊ लागलं. याचा उल्लेख मनुस्मृती आणि इतर प्राचीन धर्मग्रंथात केला गेला.
ब्राह्मण समाजाचे लोक ही धारणा तयार करण्यात सगळ्यांत आघाडीवर होते. त्यातूनच ब्राह्मण्यवादी पितृसत्ताकतेची सुरुवात झाली.

फोटो स्रोत, AFP/Getty
ब्राह्मण कुटुंबाची स्थिती कुटुंबातील स्त्रियांपेक्षा काही वेगळी नव्हती. आजही गावागावांमध्ये ब्राह्मण किंवा तथाकथित उच्चवर्णीय स्त्रियांना पुन्हा लग्न करण्यासाठी, घटस्फोट घेण्यासाठी किंवा बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नाही. महिलांच्या लैंगिकतेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न ब्राह्मण आणि सवर्ण समुदायांमध्येच जास्त आहे.
दलितांमध्ये पितृसत्ताक पद्धत नाही, असं नाही. मात्र त्यांच्या मते दलित-बहुजन पितृसत्ताक पद्धत आणि ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धतीत फरक आहे.
दलित पितृसत्ताक पद्धतीत महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. मात्र ब्राह्मण्यवादी पितृसत्तेच्या तुलनेत ते अधिक लोकतांत्रिक आहे. मात्र ब्राह्मण्यवादी पितृसत्ता संपूर्णपणे स्त्रियांवर नियंत्रण मिळवू पाहते, मग ते त्यांचे विचार असो वा शरीर.
जर एका दलित महिलेला नवऱ्याने मारहाण केली तर आरडाओरडा करून ती दहा लोकांना गोळा करू शकते. मात्र ब्राह्मण बाई मार खाल्लयावर आपल्या खोलीत जाऊन रडते, कारण तिथे तिच्या घराण्याची अब्रू पणाला लागली असते.
'हा विचारांचा विरोध आहे'
महिला अधिकार कार्यकर्त्या आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या कविता कृष्णन सांगतात की ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत एक विचारसरणी आहे. तिचा विरोध म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाजाचा विरोध नाही.
कृष्णन म्हणतात, "ही पद्धत फक्त ब्राह्मणांमध्ये आहे, असं नाही. ती दुसऱ्या जातीत आणि दलितांमध्ये सुद्धा आहे. ब्राह्मण्यवादी मानसिकता दुसऱ्या जातींना ही जाणीव करून देते की तुमच्या खालीसुद्धा कुणीतरी आहे आणि तुम्ही त्यांचा छळ करू शकता."
त्यांच्या मते एखादा व्यक्ती स्वत:ला ब्राह्मण समजतो म्हणजे नक्की काय समजतो या प्रश्नापासून याची सुरुवात व्हायला हवी.

फोटो स्रोत, TWITTER
त्या पुढे म्हणतात, "ब्राह्मण हा एक भरभक्कम शब्द आहे आणि त्यावर इतिहासाचा दबाव आहे. त्यांचं खालच्या जातींवर मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. महिलाही या वर्चस्वाला बळी पडल्या आहेत."
"आता तुम्ही विचाराल की जर कुणी गर्वाने 'मी दलित आहे', असं म्हणू शकतं तर मग 'मी ब्राह्मण आहे' का नाही? या दोन गोष्टी एकसारख्या यासाठी नाहीत, कारण दलितांची ओळख आधीपासून दाबली गेलेली आहे. ब्राह्मणांचं मात्र तसं नाही," कविता सांगतात.
ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे, याचा आधी स्वीकार करायला हवा आणि ही पद्धत बंद करायला हवी, असंही त्यांना वाटतं. सगळेच ब्राह्मण्यवादी याच्याशी सहमत आहेत, असंही नाही.
'मूठभर लोकांचं कारस्थान'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि भाजपचे खासदार राकेश सिन्हा ही पद्धत म्हणजे 'युरोपातील काही लोकांचं कटकारस्थान' असल्याचं मानतात. ते म्हणतात, "भारतीय समाज आधीपासूनच प्रगतिशील आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चलण्यावर विश्वास ठेवतो. एकीकडे आम्ही जातिविरहीत समाजाचे स्वप्न पाहतो आमि दुसऱ्या बाजूला हे लोक जातीव्यवस्थेला चुकीच्या पद्धतीने दाखवून समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत."
राकेश सिन्हा यांच्या मते ट्विटरच्या CEOचं अशा पद्धतीने फोटो काढणं म्हणजे भारतीयांप्रति नकारात्मकता दाखवण्यासारखं आहे.

फोटो स्रोत, Biswaranjan mishra
ते म्हणाले, "प्रत्येक समाजात काही न काही त्रुटी असतातच. भारतीय समाज आपल्या समाजातील त्रूटी सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. काही मूठभर लोक एका जातीपुढे एक नकारात्मकतेचं विशेषण तयार करून, तेच समाजाचं योग्य चित्र आहे, असं सांगत आहेत."
पोस्टर तयार करणारी महिला काय म्हणते?
हे पोस्टर डिझाईन करणारी कलाकार आणि हक्कांसाठी काम करणारी तेनमौली सुंदरराजन यांनी बीबीसीला सांगितलं, "हे पोस्टर माझ्याकडे दोन वर्षांपासून आहे. आता ट्विटरचे CEO आपल्या हातात तो पोस्टर घेतलं तर वाद निर्माण झाला आहे. याचा विरोध करणारे कदाचित घाबरले आहेत की त्यांचं पितळ जगासमोर उघडं पडेल."
जॅक डॉर्सी यांना हे पोस्टर देणाऱ्या संघपाली अरुणा यांचं म्हणणं आहे की त्या स्वत: दलित आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर होणारा भेदभावाची कल्पना आहे. "भारतातल्या पितृसत्ताक पद्धतीचं मूळ ब्राह्मण्यवादात आहे आणि म्हणून पितृसत्ताक पद्धत संपवण्यासाठी ब्राह्मण्यवाद संपवण्याची गरज आहे."
संघपाली म्हणते, "ब्राह्मण्यवाद पितृसत्तेच्या विरोधाकडे ब्राह्मण समुदायाचा विरोध म्हणून बघायला नको. म्हणून त्याचं राजकारण व्हायला नको."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








