You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अडगळीत सापडलेल्या चित्राला मिळाली कोट्यवधी डॉलर्सची किंमत
एखादं चित्र गेली अनेक वर्षं कोणालाच मिळत नसेल आणि ते एका फ्रेंच बाईंच्या स्वयंपाकघरात सापडावं. ते 2.4 कोटी युरो म्हणजे 2 कोटी डॉलर्सला विकलं जाणं हे सगळं कल्पनिक वाटतं ना? पण हे खरंच घडलं आहे. इतकी मोठी रक्कम मिळवून या चित्रानं एक विक्रम केला आहे.
शिमाबूए या चित्रकारानं काढलेलं हे ख्रिस्ताचं हे चित्र गेल्या महिन्यामध्ये उत्तर फ्रान्समध्ये सापडलं.
लिलावात या चित्राला 60 लाख युरोंची किंमत मिळेल असं वाटत होतं.
पण लिलावात या चित्राला अपेक्षेपेक्षा चौपट किंमत मिळाली.
उत्तर फ्रान्समधील एका अनामिक व्यक्तीनं हे चित्र खरेदी केलं. मध्ययुगीन चित्राला एवढी किंमत मिळाल्याने एक विक्रम प्रस्थापित झाला असं एक्टन ऑक्शन हाऊसनं स्पष्ट केलं आहे.
लिलाव करणारे डॉमिनिक ली कोएंट म्हणाले, शिमाबूएनं काढलेलं दुर्मिळ चित्र बाजारात येतं तेव्हा अशा धक्क्यांसाठी तुम्ही तयार राहिलंच पाहिजे.
फ्रान्समधील कॉंपियान शहरामधील एका घरातल्या स्वयंपाकघरात हॉटप्लेटच्या वर हे चित्र टांगलेलं होतं. ते लिलाव करणाऱ्या एका व्यक्तीला दिसलं. या चित्राचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि त्यांनी या चित्राची किंमत तज्ज्ञांना विचारण्याचा सल्ला दिला.
कोण होता शिमाबूए?
या चित्राची किंमत फारशी नसावी असं त्या चित्राच्या मालकाला वाटत होतं. शिमाबूएच्या इतर चित्रांमधील आणि या चित्रामधील समान धागे शोधून काढण्यासाठी इन्फ्रारेड किरणांचा वापर करण्यात आला. शिमाबूएला चेन्नी दे पेपो अश नावानंही ओळखलं जातं.
त्याचा जन्म फ्लॉरेन्समध्ये झाला. 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 14 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तो कार्यरत होता. मध्ययुगाचा काळ आणि सुधारणावादाचा काळ याच्यामधल्या काळात तो कार्यरत होता.
आता लिलाव झालेलं चित्र लहानसं आहे. त्याचा आकार 20 ते 26 सेंमी असा आहे.
हे चित्र म्हणजे पॉलीप्टिकचा एक भाग होतं. पॉलीप्टिक हे एक मोठं चित्र होतं. ते अनेक तुकड्यांमध्ये विभागलं गेलं होतं. साधारणतः 1280 च्या सुमारास तयार करण्यात आलं असावं. त्यात ख्रिस्त आणि त्याला सुळावर चढवण्याच्या प्रसंगाचं चित्रण केलं आहे.
शिमाबूएच्या याच चित्रमालिकेतील आणखी दोन प्रसंग लंडन येथील नॅशनल गॅलरी आणि न्यूयॉर्कमधील फ्रिक कलेक्शनमध्ये आहेत. शिमाबूएवर बायझेंटाइन कलाशैलीचा प्रभाव होता. पॉपलर लाकडावर ती काढली जायची आणि सोनेरी रंगाच्या बॅकग्राऊंडवर ती काढली जायची.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)