You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रावर `विक्रम लँडर'चं हार्ड लॅंडिंग झालं होतं; नासाकडून फोटो उपलब्ध
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने इस्रोच्या चांद्रयान 2 उतरलेल्या ठिकाणाचे काही नवे हाय रिझोल्यूशन फोटो प्रसिद्ध केले आहेत आहेत. नासाने हे फोटो त्यांच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
नासाने 26 सप्टेंबर रोजी हे फोटो ट्वीट केले आहेत. त्यापुढे असे लिहिले आहे की, ``आम्ही भारताच्या चांद्रयान 2च्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाचे फोटो काढले आहेत. हे फोटो अंधारात काढले आहेत, त्यामुळे आम्हाला लँडरचा पत्ता लागलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा प्रकाश वाढेल तेव्हा आणखी फोटो मिळवता येतील.''
चांद्रयान 2 च्या विक्रम लँडर सात सप्टेंबरला चंद्रावर आदळलं म्हणजेच हार्ड लँडिंग झाल्याची माहिती नासाने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.
विक्रम दिसलं नाही
हे फोटो `ल्यूनार रिकॉन्सेस ऑर्बिटर कॅनेरा' (एलआरओसी)मधून घेतले गेले आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा कॅमेरा लँडिंग साइटवरून गेला होता. तेव्हा 150 किलोमीटरच्या अंतरावरून फोटो घेण्यात आले आहेत.
आमच्या टीमला आतापर्यंत लँडर कुठे आहे ते दिसलेलं नाही, पण त्याचे काही फोटोही मिळालेले नाहीत, असंही नासाने म्हटलं आहे. तसंच फोटो घेतले त्यावेळी अंधार होता, त्यामुळे विक्रम लँडर अंधारत मोठ्या सावल्यांमध्ये कुठेतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही नासाने वेबसाइटवर म्हटलं आहे.
विक्रम कुठे उतरलं त्याचा पत्ता लागलेला नाही
स्पेसक्राफ्ट नक्की कुठे उतरलं याची माहिती हाती लागली नसल्याचंही नासानं सांगितलं आहे. भारताच्या चांद्रयान 2च्या विक्रम लँडरला 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरायचं होतं. भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा पहिला प्रयत्न केला होता, तो यशस्वी होऊ शकला नाही. विक्रम लँडरने सपाट जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षेनुसार ते साध्य झाले नाही आणि त्याचा इस्रोबरोबर असलेला संपर्क तुटला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)