महात्मा गांधी: कधीकधी वाटतं नव्या पाकिस्तानी राजकर्त्यांपेक्षा गांधीजी परवडले असते - ब्लॉग

    • Author, मोहम्मद हनीफ
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, पाकिस्तान

पाकिस्तानातल्या जनतेला गांधीविषयी काय वाटतं, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. एकवेळ वाटलं सांगून टाकावं की आमच्या स्वतःच्याच घरात इतक्या भानगडी आहेत की गांधींविषयी विचार करायला वेळच नाही.

नंतर आठवलं की आम्हाला शाळेत गांधी हिंदू होते, एवढंच शिकवलं होतं. त्यामुळे पुढचं तुम्हीच समजून घ्या.

सोबतच सांगितलं होतं की गांधी धूर्त होते, पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होते. भारतमातेची पूजा करायचे. आम्ही मुस्लिमांनी हिंदूंवर शतकानुशतके राज्य केल्याचा सूड त्यांना उगारायचा होता.

आमचे बापू होते कायदे-आजम. आमचे कायदे-आजम लंडनमध्ये शिकलेले निष्णात वकील होते. त्यांनी गांधींना धोबीपछाड देत त्यांच्याकडून पाकिस्तान पटकावला.

थोडं मोठा झाल्यावर गांधी सिनेमा बघितला. तेव्हा कळलं की हिंदूंचा हा बापू एक फकीर होता. हिंदुस्तानच्या स्वांतत्र्य चळवळीआधी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनाही आव्हान उभं केलं होतं. या सिनेमावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा आक्षेप होता की सिनेमा बनवणाऱ्या गोऱ्या दिग्दर्शकाने हिंदूंच्या बापूला हिरो बनवलं. मात्र, आमच्या कायदे-आजमला खलनायकाच्या श्रेणीत बसवलं.

गांधी आणि जिन्ना यांची जुनी छायाचित्रं बघून आम्हाला खूप आनंद होतो. या छायाचित्रांमध्ये आमच्या कायदे-आजमने वस्तराच्या धारेपेक्षा धारदार असलेला लंडनमध्ये शिवलेला कोट घातला आहे आणि हातात विलायती सिगरेट आहे. पाकिस्तानातल्या एका विद्वानाने म्हटलं होतं की पाकिस्तानात जेव्हा पन्नास हजार रुपयांची नोट छापली जाईल, तेव्हा त्यावर हा फोटो असेल.

या छायाचित्रांमध्ये महात्मा गांधींनी आपलं धोतर अर्धवट वर उचललं आहे. हातात काठी आहे. काही-काही छायाचित्रांमध्ये दोन्ही बापू हसत आहेत. पुढे त्यांच्या हिंदुस्तान आणि पाकिस्तानात काय घडणार आहे, याची जराही कल्पना त्यांना असती तर कदाचित ते दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडले असते.

एका छायाचित्रात महात्मा गांधी हात उचलून वाद घालताना दिसतात. जणू म्हणत आहेत की आम्हाला सोडून जाऊ नका. आमचे बापू कायदे-आजमने विलायती सिगरेटचा झुरका घेत असा काही चेहरा केला आहे जणू म्हणत आहे, "यार, गांधी तू आता लवकर आटप. आता आपण म्हातारे झालो आहोत. फाळणी तर होणारच."

आमचे कायदे-आजम इतकी फाडफाड इंग्रजी बोलले की गोऱ्यांनीही मान्य केलं की हिंदू आणि मुसलमान दोन संप्रदाय आहेत. दोन देश बनवा आणि इथून पळ काढा. बाकी कापाकापीची तयारी आम्ही स्वतःच केली. आमचे बापू जिंकले, महात्मा गांधी हरले.

हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर दुसऱ्याच वर्षी दोन्ही बापू निवर्तले. एकाचं टीबीने निधन झालं तर दुसऱ्यावर त्यांच्याच एका हिंदू बांधवाने गोळी झाडली.

लहानपणी आम्हाला गांधींचा द्वेष करायला शिकवण्यात आलं होतं. त्यांच्याबद्दल पाकिस्तानातल्या तत्कालीन प्रसिद्ध उर्दू कवीने अर्वाच्य भाषेत लिहिलं होतं.

पूर्वी पाकिस्तानात 'गांधी' शिवी होती

ज्या गांधीला आम्ही हिंदू मानायचो त्यांना तिकडे नवे हिंदू म्हणायचे, "तुम्ही इतके भोळे हिंदू आहात की या नव्या हिंदुस्तानात तुमच्यासाठी जागा नाही. तुम्ही आता केवळ नोटांवरच झळकाल."

हिंदुस्तानात सध्या त्या लोकांची सत्ता आहे जे गांधींच्या मारेकऱ्याला आपला हिंदू मानतात. पूर्वी पाकिस्तानात गांधींचं नाव शिवीसारखं होतं. आता हिंदुस्तानातही तीच परिस्थिती आहे.

तिथल्या आमच्या बांधवांना वाटत असेल की ज्यांनी स्वतःच्या बापूला, गांधींना सोडलं नाही, तिथे आमची काय गत. इकडे आम्ही थेट बोलत नाही. मात्र, कधी कधी मनात विचार नक्कीच येतो की या नव्यांपेक्षा गांधीजी परवडले असते.

( मोहम्मद हनीफ हे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. या लेखातील मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)